तरुणांकरीता ध्यानाचे ७ मंत्र:शांत व्हा आणि अशक्यप्राय गोष्टी सहजपणे करा (Meditation for youth in Marathi)

व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व साहसे बहुदा वयाच्या १६ ते २५ यावर्षांमध्ये घडतात.वादळांना तोंड देणे आणि यशाची शिखरे गाठणे हे अत्यावशक आहे.त्या वयात इतक्या वेगाने निर्णय घेतले जातात,शब्द बोलले जातात,कृती घडून येते कि पहिलं पाऊल अचूक पडणे अत्यावश्यक असते.आपला मित्र परिवार हे आपले सर्वात जवळचे प्रभावशाली वर्तुळ असते.म्हणून आयुष्याच्या या टप्प्यात ध्यान (जो आपल्या आनंदाचे सर्वात मोठे आणि एकमेव उगमस्थान आहे) हा आपला सर्वात चांगला मित्र ठरू शकतो.

#१ सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा :

“मी अतिशय आक्रमक आणि हिंसक होतो आणि कॉलेजमध्ये वरचेवर भांडण करायचो.मला कुणी मित्र नव्हते.ह्या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे तेच कळत नव्हते.ध्यान करण्याने मी शांत झालो.आता मला भरपूर मित्र आहेत ज्यांच्या विषयी मला आपुलकी वाटते आणि आता मी अजिबात हिंसक होत नाही.” – राजेश नायर.

निसर्गतः प्रत्येक व्यक्ती मनमिळाऊ असते.जर आपण तसे नसलो तर त्याचे कारण आहे तणाव आणि दबाव. ध्यानामुळे तणाव कमी होण्यात मदत होते आणि आणि आपला खरा स्वभाव (आनंद) बहरून येण्यास मदत होते. मित्र बनवणे आणि त्यांना टिकवणे सोपे होते. इतरांची काळजी घेणे हा आपला स्वभाव बनतो.

# २ तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणा :

“मला गायक बनायचे होते,मला पराकोटीची महत्वाकांक्षा होती पण मला माझ्या क्षमतेवर नेहमीच शंका असायची. ध्यानाच्या नियमित सरावाने मला ' मी हे करू शकते ' हा आत्मविश्वास मिळाला.आज एका अश्या संगीताच्या बँडमध्ये आहे जो जवळजवळ दर आठवड्याला कार्यक्रम करतो."- सजल जाजू

तरुण म्हणून आपल्याला आपली स्वप्नांनी आणि महत्त्वाकांक्षेने आकाशापर्यंत पोचायचे असते.ध्यान आपल्याला आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला आणि त्या स्वप्नांचे संगोपन करून त्यांना वास्तवात आणायला क्षमता आणि आत्मविश्वास देते.

# ३ चौकटीच्या बाहेर विचार करा :

“ध्यानाच्या दैनंदिन सरावाने मला माझ्यातील सुप्त प्रतिभांचा शोध लागला.माझ्यातील सृजनशीलतेच्या क्षेत्राला मी पकडू शकले आहे आणि मी चौकटीच्या बाहेर विचार करू लागले आहे.ध्यानामुळे माझ्या प्रत्येक कामात एक लाभदायक स्पर्श प्राप्त होतो.”–दिव्या सचदेव

जेव्हा आपण मोबाईलच्या दुकानात जातो तेव्हा आपल्याला सर्वात अद्यावत फोन हवा असतो कारण तो इतरांमध्ये उठून दिसतो.जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा सृजनतेचा उदय होतो आणि आपण नव्या जोमाने विचार करू लागतो,वेगळेपणाने विचार करू लागतो आणि चमकू लागतो.

# ४ तुम्ही कशामुळेही विचलित होत नाही :

“आधी इतरांच्या वागण्यामुळे आणि माझ्या जीवनात उद्भवणाऱ्या अप्रिय प्रसंगांमुळे मी व्यथित होत असे.परंतु नियमित ध्यान साधना केल्यामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देणे मला कठीण जात नाही.”–करण रॉय

तारुण्यात आपल्या आयुष्यात येणाऱ्या अप्रिय घटनांनी आपण नेहमी अस्वस्थ होतो.या समस्यांमुळे आपली ओढाताण होते. ध्यानामुळे आंतरिक शक्ती मिळते आणि स्वीकारण्याची अशी जाणीव मिळते की त्यामुळे कठीण परिस्थितीला शांत मनाने तोंड देता येते.त्याने जबाबदारीची जाणीव मोठ्या प्रमाणावर होते आणि आपली एक चांगली व्यक्ती म्हणून विकास घडवण्यात मदत होते.आपण पावसाला तर थांबवू शकत नाही,पण जेंव्हा आपल्याकडे छत्री असते तेव्हा आपण आत्मविश्वासाने पुढे जातो.ध्यान हे कठीण काळात छत्रीसारखे आहे.

# ५ ध्यानात धुंद व्हा :

“गेली सात वर्षे मी अखंड धुम्रपान करीत असे.मी ध्यान शिकावे असे एका मित्राने सुचवले.सहज समाधी ध्यानाच्या नियमित सरावाने माझे धुम्रपान पूर्णपणे सुटले आहे.माझ्या दैनंदिन ध्यानानंतर मला तसेच धुंद वाटते जसे धुम्रपान केल्यानंतर वाटायचे.”–अर्जित सिंग

धुम्रपान कमी करण्यास आणि कायमचे सोडण्यासाठी ध्यान एक कायमचा पर्याय म्हणून मदत करते.ध्यान ही आपल्या आरोग्याबद्दलची जागरुकता न हरवता,धुंद होण्याची नैसर्गिक पद्धत आहे.ध्यान हे धुम्रपान किंवा मद्यपान आणि इतर कोणत्याही व्यसनाची तलप दूर ठेवते.म्हणून धुम्रपान बंद करा आणि जगणे सुरु करा!

# ६ तुमच्या ऊर्जेला योग्य दिशा द्या :

“जेंव्हापासून मी ध्यानाचा सराव सुरु केला आहे,दिवसभर मला भरपूर उत्साही आणि ऊर्जावान जाणवते.मी अधिक रचनात्मक कार्य करू शकते आहे आणि काही सेवेचे कार्यसुद्धा करू शकते आहे.”–साक्षी वर्मा

तरुणपणी आपण ऊर्जा, उत्साह आणि सृजनशीलतेचा सागर असतो.ध्यान केल्याने आपल्या स्वतःच्या पूर्ण क्षमतांचा अंदाज येतो.आपण जास्त अभिनव आणि गतिमान बनतो आणि आपली ऊर्जा सृजनशील आणि सकारात्मक कामे करण्याच्या दिशेने वळवण्यात यशस्वी होतो.

# ७ पालकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करा :

“ध्यानाने मला माझ्या पालकांबरोबर अतूट नाते बनवण्यात मदत केली आहे.आता आम्ही एकमेकाच्या सुख-दुःखात सहभागी होतो.एकत्रित ध्यान करण्याने आमचे नाते अजून जास्त खास बनले आहे.”–अभिषेक दावर

जेव्हा आपण ध्यान करतो,तेव्हा आपण आपल्या पालकांबरोबर शांतपणे आणि कौशल्यपूर्वक संवाद साधु शकतो. यामुळे स्पष्टपणे संवाद साधता येतो.आपल्या इच्छा आणि आपल्या पालकांचा सल्ला यात योग्य निवड करून संतुलन साधण्यात ध्यान आपल्याला अधिक जागरूक आणि कुशलसुद्धा बनवते.

श्री श्री रवि शंकर यांच्या ज्ञानचर्चेवरून प्रेरित

श्रेया चुघ आणि राजेंद्र सिंग यांच्या माहितीवर आधारित. श्रेया आणि राजेंद्र हे आर्ट ऑफ लिविंगच्या जगभर चालणाऱ्या तरुणांच्या शिबिराचे प्रशिक्षक आहेत.त्यांनी तरुणांना ध्यान कसे करावे हे शिकवून हजारो तरुणांच्या जीवनात परिवर्तन आणले आहे.