त्वचेचे सौंदर्य खुलविण्याचे १२ नैसर्गिक उपाय | 12 Tips for glowing skin in Marathi

“सौंदर्य हे मनात दडलेले असते. ते वस्तुत, व्यक्तीत अथवा पाहणाऱ्याच्या दृष्टीत नसते. ते प्रत्येक व्यक्तीच्या दृदयात असते,” असे श्री श्री रविशंकर म्हणतात. ते म्हणतात हे ह्रदयातील सौंदर्यच तुमच्या चेहऱ्यावरील तेजात परावर्तीत होते.

सौंदर्य हे त्वचेच्या पलीकडे असते. तरी पण आपली त्वचा आपले सौंदर्य अभिव्यक्त करते.

आपण द्रव्य पदार्थ आणि चेतनेने बनलेले आहोत. अर्थात आपली त्वचा हे फक्त बाहेरील दृश्य आवरण नसून ती सजीव असते! ती शरीराच्या इतर अवयावांसाराखीच असते व तिची काळजी व निगा राखावी लागते. सौंदर्य खुलविण्याचे जितके उपाय उपलब्ध आहेत ते केवळ शारीरिक बाबींकडे लक्ष देतात पण ते शरीरातील प्रत्येक पेशी आतून कशी उजळेल आणि उर्जा व सौंदर्य कसे उत्सर्जित करेल याचे गुपित सांगत नाहीत.

वाढत्या वयाबरोबर आपली त्वचा निस्तेज होत जाते. ताण, दुर्लक्ष आणि सुरकुत्या, काळी वर्तुळे, शुष्क चट्टे, पिटीका, थकवा आणि निस्तेजपणा चेह-यावर दिसू लागतो.

तथापि असे अगदी साधे पण नैसर्गिक उपाय तजेलदार त्वचेसाठी आहेत की जे तुमची त्वचा नितळ आणि पुनरुज्जीवित करतात.

प्राचीन आयुर्वेदात सौंदर्याचे गुपित सांगितले आहे. आयुर्वेदिक उटणी व लेप सौम्यपणे त्वचेचे पोषण करतात आणि तिला श्वास घ्यायला मोकळीक मिळते. त्यातही ती बनवण्यासाठी लागणारे घटक स्वयंपाकघरातच मिळतात.

तुमचा परिपूर्ण सौंदर्य लेप:

  • बेसन – २ चमचे
  • चंदन पावडर
  • हळद पावडर – अर्धा चमचा
  • कापूर – चिमुटभर
  • पाणी / गुलाबजल / दूध


बेसन, चंदन पावडर, हळद पावडर आणि कापूर यांचे पाणी अथवा गुलाबजल अथवा दूध वापरून थोडे घट्ट मिश्रण बनवा. ते एकसारखे तुमच्या चेहऱ्यावर लावा. २० मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुवून काढा. तुमचा अनुभव आणखी चांगल्या परिणामांसाठी कापसाच्या दोन पट्ट्या गुलाबपाण्यात भिजवून डोळ्यांवर ठेवा. तो आणखी सुधारावा असे वाटत असेल तर सौम्य वाद्यसंगीत ऐका. वीस मिनिटांनंतर काय घडते? तजेलदार त्वचा आणि शांत मन!

थोडे धावा, थोडे जॉगिंग करा आणि सूर्यनमस्काराच्या काही फेऱ्या जलद गतीने करा म्हणजे तुमचे रक्ताभिसरण सुधारेल. थोडा घाम निघणे तुमच्यासाठी चांगले आहे. काही वेळाने पाण्याने शरीर साफ करा जेणेकरून त्वचा स्वच्छ होईल.

श्वानासन करताना तुम्ही तुमच्या श्वासोश्वासाचे निरीक्षण केले आहे का? योगाभ्यासाचे सौंदर्य शरीर व श्वासोश्वासाच्या लयीकडे लक्ष देण्यात आहे. ज्या वेळी तुम्ही श्वास सोडता त्या वेळी शरीरातील अपायकारक घटक बाहेर फेकले जातात. योगासने आणि लक्षपूर्वक केलेला श्वासोश्वास शरीराच्या शुद्धीकारणाला गती देतात आणि तुमच्या त्वचेला तजेला व स्फूर्ती देतात ज्यामुळे तुमचा चेहरा ताजातवाना दिसतो.

असे काही दिवस असतात का की तुम्ही कोणतेही लोशन लावले तरी तुमची त्वचा कोरडीच राहते? कधी-कधी तुम्ही आणि तुमचे मित्र-मैत्रिणी एकाच प्रकारचे उत्पादन वापरत असता पण त्याचा परिणाम मात्र सारखा नसतो? येथे तुम्हाला तुमच्या शरीराच्या प्रकृतीचा प्रभाव मान्य करावा लागेल. आयुर्वेदाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही खालील दोन किंवा तीन तत्वांचा संयोग असते: वात, पित्त आणि कफ.

यांपैकी प्रत्येक प्रकारच्या प्रकृतीच्या व्यक्तींचे काही विशेष गुणधर्म असतात. ते तुमचे शरीर व व्यक्तिमत्व कसे असेल ते ठरवतातच परंतु तुमची त्वचा कशी असेल हे देखील ठरवतात. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमची बहुतांशी वात प्रकृती असते. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा सामान्य असते. कफ प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा तेलकट असते. जर तुम्हाला तुमची प्रकृती माहित असेल तर कोणता आहार घ्यायचा व कोणता नाही हे ठरवता येते.

आपले शरीर आपण जे खातो यानेच बनलेले असते. साहजिकच ताजे, स्वच्छ आणि रसदार अन्न सेवन केल्याने आपली त्वचा तेजस्वी राखण्यास मदत करतात. प्रथिने, जीवनसत्वे, भरपूर फळे व पालेभाज्यायुक्त असा समतोल आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणे श्रेयस्कर ठरते.

चेहऱ्याचा हळुवार मसाज खूपच फायदेशीर असतो. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार नारायण किंवा दुसरे एखादे तेल निवडा. मोहरी, बदाम अथवा खोबरेल तेल त्वचेचे उत्तम पोषण करतात व तिला खुलवतात.

तुम्हाला असे वाटते का की योग्य प्रकारे श्वासोश्वास केल्याने चेहऱ्यावरील पिटिका व ठिपके नाहीसे होतात? हो, हे खरे आहे! जेंव्हा आपण शांत असतो तेंव्हा ताणतणावाचे बाह्याविष्कार म्हणजे चेहऱ्यावरील पिटिका व ठिपके कमी होतात. सुदर्शन क्रिया, जे एक उत्तम श्वसनाचे तंत्र आहे, साठलेले ताणतणाव शरीर व मनाबाहेर फेकते आणि आपल्याला शांत करते. ज्यामुळे आपल्या प्रकृतीचा समतोल व ताळमेळ राखला जातो.

प्रकाश देणे हा दिव्याचा धर्म आहे. ध्यानामुळे तुमच्या अंतर्मनातील दिवा जास्त उजळ होते. जितके ध्यान जास्त तितका उजाळा जास्त. आपण नेहमी पाहतो की चित्रकार ध्यानी माणसाच्या चित्रात त्याच्या शरीराभोवती वलय रेखाटतात. हा काही कल्पनाविलास नव्हे. हे एक सत्य आहे. ध्यानी माणसाच्या अंतर्बाह्य प्रकाश असतो.

खूप वेळ आणि सतत बोलत राहिल्यानंतर तुम्हाला कसे वाटते? थकल्यासारखे ना? अशा बडबडीमुळे थिल्लरपणाचे ओझे मनावर टाकले जाते. मौनात उर्जेचा संचय होतो. ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आर्ट ऑफ लिव्हिंगचा पार्ट २ हा कोर्स जरूर करा. ध्यानाबरोबर मौनाचा परिणाम किती प्रगाढ असतो याचा अनुभव घ्या. आणि हो, त्याने तुमची त्वचाहि उजळ होतेच!

तुम्ही दुःखी असाल, रागात असाल किंवा कष्टी असाल तर तुमचा चेहरा चांगला दिसणार नाही. म्हणून तुम्हाला अढळ शांती, सुख लाभेल असे पहा. त्याकरिता, ध्यान हाच एक पर्याय आहे. ती आता चैनीची गोष्ट राहिली नाही. ती एक अंगभूत गरज आहे!

जसं आहे तसं जीवनाला स्वीकारले पाहिजे, त्याच्या कटू पैलूंसहित. साधारणपणे सुंदर दिसणे आणि सर्व गोष्टींकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन असणे म्हणजे तरुण दिसणे असा अर्थ काढला जातो. तथापि तुम्हाला जर तुम्ही तरुण असल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही तरुण दिसता देखील ! ध्यान वृद्धावस्था नैसर्गिकपणे दूर ठेवते आणि तारुण्य व ताजेपणा कायम ठेवते. तर मग चला, असे स्वप्न पहा की तुम्ही मनाने १८ वर्षांचे आहात!

तुम्ही उच्च प्रतीचे कपडे, दागिने घातले असतील आणि एक छान बॅगदेखील तुमच्याकडे असेल...तरीदेखील पूर्णता यायला आणखी एका गोष्टीची गरज असतेच. तुमचे स्मित! आपण बराच वेळ, शक्ती, पैसे आपले शरीर आणि दिसणे यांवर खर्च करतो परंतु हृदयातला आनंद कधीच प्रकट करत नाही. तो करणे किती सोपे आहे पहा: तुमचे दोन्हीही ओठ डोळ्यांच्या दिशेने किंचित ताणायचे असतात!

हसा आणि सुंदर दिसा आणि आपल्या भोवतीचे जगही सुंदर बनवा! यात खोटे काहीच नाही, तुम्ही स्वतः हे करून पहा.

प्रेरणा: श्री श्री रविशंकर यांची व्याख्याने.
सहज समाधी ध्यान शिक्षक भारती हरीश आणि आयुर्वेद तज्ञ डॉ. निशा माणिकंठन यांनी दिलेल्या माहितीवर आधारित.