श्री श्री रविशंकर (About Sri Sri Ravishankar in Marathi)

गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांची ओळख :

एक मानवतावादी नेता,अध्यात्मिक गुरु आणि शांतीदूत म्हणून गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांची ख्याती जगभरात आहे.' तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाज ' हे त्यांचे स्वप्न आहे.हे स्वप्न साकार होत आहे ते आर्ट ऑफ लिविंगची  शिबिरे आणि सेवा प्रकल्पांद्वारा.परिणामी जगातील करोडो लोक एकत्रित शांततेने नांदत आहेत.

सुरुवात :

१९५६ साली दक्षिण भारतात जन्मलेले श्री श्री रविशंकर हे एक प्रतिभावान बालक होते.चार वर्षाचे असतानाच त्यांना श्रीमद्भगवद्गीता मुखोद्गत होती.युवावयातच अनेकदा ते ध्यानस्थ अवस्थेत दिसून येत.त्यांचे पहिले गुरु होते सुधाकर चतुर्वेदी,ज्यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत बरीच वर्षे काम केले.त्यांच्याकडे वेद साहित्य आणि भौतिकशास्त्र अशा दोन्ही पदव्या आहेत.

आर्ट ऑफ लिविंग आणि आय.ए.एच.व्ही यांची स्थापना

श्री श्री रविशंकर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा इथे असताना दहा दिवसांच्या मौनावस्थेत असताना त्यांना ' सुदर्शन क्रिया ', एक शक्तिशाली श्वसन प्रक्रिया प्राप्त झाली. कालांतराने सुदर्शन क्रिया ही आर्ट ऑफ लिविंगच्या शिबिरांचे मुख्य गुणवैशिष्ट्य बनली.

श्री श्री रविशंकर यांनी आंतरराष्ट्रीय, नफा न कमावणारी, शैक्षणिक आणि मानवतावादी संस्था म्हणून आर्ट ऑफ लिविंगची स्थापना केली.या संस्थेचे शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व-विकास कार्यक्रम हे तणाव निर्मुलनासाठी आणि निरोगी राहण्यासाठी लागणारी प्रभावी प्रक्रिया शिकवतात.केवळ एकाच प्रकारच्या जनसमुदायाला आवाहन न करता हे कार्यक्रम जगभरात आणि समाजाच्या सर्व पातळ्यांवर उपयुक्त ठरले आहेत.

१९९७ साली त्यांनी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज (IAHV) ही संस्था स्थापन केली.याचे मुख्य कारण होते ते म्हणजे दीर्घकालीन विकासाचे उपक्रम राबवणे आणि आर्ट ऑफ लिविंगबरोबर समन्वय साधून संघर्ष निवारण करणे. भारत,आफ्रिका,दक्षिण अमेरिका आणि जगभरात या दोन्ही संस्थांचे कार्यकर्ते युद्धपातळीवर दीर्घकालीन विकास कामे हाती घेत आहेत.४०,२१२ गावांमध्ये या संस्थेचे काम सुरु आहेत.

सेवाभाव जागवणे व ज्ञानाचे जागतिकीकरण :

एक नावाजलेले मानवतावादी नेता म्हणून श्री श्री रविशंकर यांच्याकडे बघितले जाते.त्यांच्या प्रेरणेने नैसर्गिक आपत्तीग्रस्त,अतिरेकी हल्ल्यात आणि युद्धात बचावलेले,उपेक्षित आणि सतत संघर्षात भरडल्या जाणा-या जमातीतील मुले अशा विविध परिस्थितीतील लोकांना दिलासा देण्याचे काम चालू आहे.त्यांच्या संदेशाच्या सामर्थ्र्याने अध्यात्मावर आधारित एक सेवा कार्याची लाट समस्त कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.जगभर हे कार्यकर्ते आणीबाणीच्या परिस्थितीत या उपक्रमांना पुढे नेत आहेत.

एक अध्यात्मिक गुरु म्हणून श्री श्री रविशंकरजी यांनी योग आणि ध्यान या पुरातन परंपरांना पुनरुज्जीवीत केले आहे आणि २१व्या शतकाला शोभेल अश्या प्रकारे जगासमोर ठेवले आहे.प्राचीन ज्ञानाला पुनरुज्जीवन देण्याच्या पलीकडे जाऊन श्री श्री रविशंकरजी यांनी वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनाची नवीन तंत्रे निर्माण केली आहेत. यात समावेश आहे तो सुदर्शन क्रिया® या प्रक्रियेचा,जिने तणावापासून मुक्ती मिळवण्यात,आंतरिक उर्जेचे स्रोत्र शोधण्यात आणि दैनंदिन जीवनात शांती मिळवण्यात करोडो लोकांना मदत केली आहे. ३१ वर्षांच्या अल्पावधीतच त्यांच्या कार्यक्रमांनी आणि त्यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या उपक्रमांनी १५२ देशांमध्ये जवळजवळ ३७ करोड लोकांचे जीवन लाभान्वित झाले आहे.

शांतीदूत :

जागतिक स्तरावर संघर्ष निवारण व हिंसामुक्तीचा प्रसार जगभरातील सार्वजनिक व्यासपीठे आणि सभांद्वारे केला जातो.शांती हे एकच उद्देश्य असलेले एक तटस्थ व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.म्हणूनच युद्धग्रस्त भागातील लोकांच्या आशांचे प्रतिनिधित्व श्री श्री करतात.इराक,आयव्हरी कोस्ट,काश्मीर आणि बिहार येथे विरोधी पक्षांना वाटाघाटी करण्यास एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले असल्यामुळे त्यांना खास मान्यता मिळाली आहे.(भारतातील कर्नाटक सरकारने) कृष्णदेव राय याच्या राज्याभिषेकाच्या ५००व्या तिथी निमित्त त्यांना स्वागत समितीचे अध्यक्ष नियुक्त केले होते. (भारतातील जम्मू आणि काश्मीर सरकारने) त्यांना अमरनाथ मंदिराच्या बोर्डाचे सदस्य म्हणून नियुक्त केले होते.

विविध उपक्रम आणि भाषणांतून श्री श्री रविशंकरजी  हे सातत्याने मानवी मूल्यांचे प्रबलीकरण करण्यावर जोर देतात.मानवतावाद ही आपली सर्वप्रथम ओळख आहे याची जाणीव करून देतात.सर्वधर्मसमभाव वृद्धिंगत करण्यासाठी आणि बहु-सांस्कृतिक शिक्षणासाठी ते साद घालीत आहेत कारण धर्मांधतेवर हाच उपाय आहे.त्यांच्या प्रयत्नांमुळे आज महत्वाच्या ठिकाणी कायमची शांतता प्रस्थापित झाली आहे.

त्यांच्या कामामुळे जगभरातील करोडो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे.वंश,राष्ट्रीयता आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन “वसुदैव कुटुंबकम” स्थापित करण्याची प्रेरणा जगभर देत आहेत.' सेवाभाव आणि मानवतावादी मूल्ये जोपासल्यास आंतरिक आणि बाह्य शांती,तणावमुक्त-हिंसामुक्त समाजाची निर्मिती सहज शक्य आहे ' हा संदेश त्यांनी दिला आहे.