नाडी शोधन प्राणायाम Nadi shodhan pranayama in Marathi | अनुलोम विलोम प्राणायाम | Anulom Vilom

 

नाडी शोधन प्राणायाम ही अतिशय सुंदर अशी श्वसन प्रक्रिया आहे जिचा फक्त काही मिनिटांचा सराव मन स्थिर, आनंदी आणि शांत ठेवण्यास मदत करतो. तसेच संचित ताण आणि शीण घालवण्यासाठी मदत होते. या प्राणायामाला नाडी शोधन असे म्हटले जाते कारण ते शरीरातील अवरोधित शक्तीमार्ग मोकळे करण्यास मदत करते ज्यामुळे मन शांत होते. याला अनुलोम विलोम असेही म्हटले जाते.

(नाडी = सूक्ष्म शक्ती मार्ग; शोधन = स्वच्छ करणे; प्राणायाम = श्वसन प्रक्रिया

नाडी शोधन प्राणायाम कसा करावा ?

alternate nose breathing

१. पाठीचा कणा ताठ ठेवून आरामात बसा आणि खांदे सैल सोडा. चेहऱ्यावर मंद स्मित हास्य असू द्या.

२. तुमचा डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा, तळवा आकाशाकडे उघडा ठेवा किंवा चीन मुद्रेत (अंगठा आणि  तर्जनीचे टोक एकमेकांना हळुवारपणे स्पर्श करत ठेवावे).

३. उजव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा यांची टोके भुवयांच्या मध्यभागी ठेवा, अनामिका आणि करंगळी डाव्या नाकपुडीवर आणि अंगठा उजव्या नाकपुडीवर. आपण अनामिका आणि करंगळी डावी नाकपुडी बंद करण्यासाठी किंवा उघडण्यासाठी वापरणार आहोत आणि अंगठा उजव्या नाकपुडीसाठी.

४. तुमचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवा आणि डाव्या नाकपुडीतून हळुवारपणे श्वास सोडा.

५. आता डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या आणि नंतर अनामिका आणि करंगळीने डावी नाकपुडी बंद करा. उजव्या         नाकपुडीवरील अंगठा काढून उजव्या बाजूने श्वास सोडा.

६. उजव्या बाजूने श्वास घ्या आणि डाव्या बाजूने सोडा. अशाप्रकारे तुम्ही नाडीशोधन प्राणायामाचे एक चक्र पूर्ण केले आहे. आळीपाळीने एकेका नाकपुडीने श्वास घेणे व सोडणे चालू ठेवा.

७. अशाप्रकारे आळीपाळीने दोन्ही नाकपुड्यामधून श्वास घेऊन ९ चक्रे पुर्ण करा. प्रत्येकवेळी श्वास  सोडल्यावर त्याच नाकपुडीने श्वास घेण्याचे लक्षात ठेवा. प्राणायामाच्या संपूर्ण वेळी डोळे बंद ठेवा आणि  कोणताही जोर किंवा प्रयत्नांशिवाय लांब, खोल आणि सहज श्वास चालू ठेवा.

नाडी शोधन प्राणायाम मन तणावमुक्त करण्यास मदत करते आणि ध्यानावस्थेत जाण्यास तयार करते. म्हणून नाडीशोधन केल्यावर थोडा वेळ ध्यान करणे ही उत्तम कल्पना आहे. पद्मसाधनेचा भाग  म्हणूनही या प्राणायामाचा सराव करू शकतो.

नाडी शोधन प्राणायामाचे फायदे

  • मन शांत आणि स्थिर करण्यासाठी अतिशय उत्तम असे श्वासाचे तंत्र
  • आपल्या मनाची ही प्रवृत्ती आहे की ते नेहमी भूतकाळाबद्दल पश्चाताप किंवा गौरव करते आणि  भविष्यकाळाबद्दल चिंतीत होते. नाडी शोधन प्राणायाम मनाला परत वर्तमानकाळात आणतो.
  • बऱ्याचशा अभिसरण आणि श्वसनाच्या समस्यांवर चिकित्सेप्रमाणे काम करते.
  • शरीर आणि मनातील संचित ताणताणाव प्रभावीपणे घालवण्यास आणि तणावमुक्त होण्यास मदत करते.
  • मेंदूच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धांमध्ये मिलाफ घडवून आणण्यास मदत करते जे आपल्या  व्यक्तिमत्वाच्या तार्किक आणि भावनिक बाजूंशी परस्परसंबंधित आहे.
  • नाडी, सूक्ष्म शक्तीमार्ग शुद्ध आणि संतुलित करण्यास मदत करते ज्यामुळे शरीरात सहज प्राण  (जीवनशक्ती) प्रवाह सुनिश्चित होतो .
  • शरीराचे तापमान संतुलित ठेवते.

नाडी शोधन प्राणायामाचा सराव करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

  • श्वासावर जोर देऊ नका आणि प्रवाह हळुवार आणि नैसर्गिक ठेवा. तोंडातून श्वास घेऊ नका. श्वास  घेताना कोणताही आवाज करू नका. तसेच उज्जाई श्वासाचा उपयोग करू नका.
  • नाकावर आणि कपाळावर बोटे अतिशय हळुवारपणे ठेवावीत. कोणताही जोर देण्याची गरज नाही.
  • जर तुम्हाला नाडी शोधन प्राणायामाच्या  सरावानंतर थकल्यासारखे आणि झोप आल्यासारखे वाटले तर  तुमच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाच्या वेळेवर लक्ष द्या. बाहेर जाणारा श्वास आतमध्ये घेणाऱ्या  श्वासापेक्षा लांब असावा.

विसंगती

काहीही नाही. तुमच्या श्री श्री योगा प्रशिक्षकाकडून हा प्राणायाम शिकल्यावर तुम्ही दिवसातून २-३ वेळा रिकाम्या पोटी याचा सराव करू शकता.

 

योगसाधना शरीर आणि मन यांच्या विकासात अनेक आरोग्यदायी फायदे करून देते पण हा  औषधांना पर्याय नाही. प्रशिक्षित श्री श्री योगा शिक्षकाच्या देखरेखेखाली योगासने शिकणे आणि सराव करणे महत्वाचे आहे. कोणत्याही वैद्यकीय परिस्थितीत योगासनांचा सराव डॉक्टरांच्या व श्री श्री योगा शिक्षकाच्या सल्ल्याने करावा. श्री श्री योगासाठी तुमच्या जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रात श्री श्री योगा शिक्षक शोधा. तुम्हाला अजून माहिती हवी आहे किंवा अभिप्राय द्यायचा आहे? info@srisriyoga.in वर आम्हाला लिहा.