घरच्या घरी योगाभ्यास करण्याचे ९ उपाय I Yoga for beginners in Marathi

रोज घरी योगाचा सराव करणे आपल्याला अधिक निरोगी, उपयुक्त, शांत आणि प्रसन्न राहण्यास मदतीचे ठरते. आणि हे लाभ आपल्या एकट्याला मिळत नाहीत. योग सराव केल्याने आपण तर प्रसन्न राहतोच. घरी केलेल्या त्या सरावाची ऊर्जा आपल्या आसपासच्या आपल्या कुटुंबियांना देखील सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन ते देखील प्रसन्न राहू लागतात. शिवाय आपल्या घरी आपल्या  सवडीनुसार, कधीही वेळ मिळेल तेंव्हा योग करण्याची संधी उपलब्ध असते, हे वेगळेच.

एकदा श्री श्री योग प्रशिक्षकाकडून या योग प्रक्रिया शिकून त्यात पारंगत झाल्यावर आपण स्वतःच त्याचा सराव रोज घरी करू शकतो. यासाठी काही सूचना ध्यानात घेऊया. एकदा घरी आवडीने योग सराव सुरु केल्याने कदाचित कुटुंबियांना देखील योग शिकून तुमची साथ द्यायला आवडेल.

घरी योगाभ्यास करण्याचे ९ उपाय I 9 tips on how to do yoga at home

१.

आपल्या सोयीची वेळ निवडा :​

सकाळी सकाळी योग सराव करणे सर्वोत्तम, ज्यामुळे पूर्ण दिवसभरासाठी तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते. पण हे जर घडू शकत नसेल तर ते योग टाळण्यासाठी निमित्त ठरू नये. आपला स्वतःचा असा वेळ ठरवा जो आपल्यासाठी सोयीस्कर असेल. ही वेळ सकाळी, थोडे उशिरा, दुपारच्या जेवणापूर्वी किंवा सायंकाळी असू शकते. या वेळेत केलेल्या योगाने सुद्धा आपले मन ताजेतवाने होत दिवसभराचा ताण तणाव दूर होण्यास मदत होते.

२.

सोयीची जागा निवडा :

दैनंदिन योग सरावासाठी आपल्या घरात छोटीशी व्यक्तिगत खोली असली तर अतिउत्तम. काही काळातच आपल्या योग सरावाने त्या खोलीत सकारात्मक स्पंदने तयार होतील, ज्यामुळे आपल्याला आणि कुटुंबियांना चेतनादाई, शांत आणि आराम जाणवू लागेल. तरीपण जर हे शक्य नसेल तर घरात कुठेही असा निवांत कोपरा शोधा जिथे आपण आपली योगा मॅट टाकू शकतो जेथे थोड्या वेळासाठी कुणाचा अडथळा होणार नाही.

मात्र ती जागा स्वच्छ, हवेशीर, फर्निचर आणि धारदार वस्तूंपासून दूर असेल ह्याची खात्री जरूर करून घ्यावी.('योग्याचे घर' मध्ये अधिक जाणून घ्या.)

३.

योगाभ्यास रिकाम्या पोटी करा :

योगासने नेहमी रिकाम्या पोटी करायला हवीत. तुम्ही योगाचा सराव आणि ध्यान जेवण झाल्यावर २-३ तासांनी करू शकता.

४.

साधे, सैल कपडे परिधान करा :

कपडे थोडे सैल, आरामदायक हवेत. शरीराला ताण देणारी काही आसने करताना शरीरावर अगदी अंगाबरोबर बसणारे कपडे अडथळ्याचे ठरू शकतात. तसेच योग करताना अंगावरील दागिने बाजूला काढून ठेवावेत. भडक मेकअप टाळावा.

५.

योगाभ्यास करण्यापूर्वी हलके व्यायाम करून शरीर सैल,गरम बनवा :​

हे अतिशय आवश्यक आहे, नाहीतर स्नायूंवर अतिरिक्त ताण येण्याचा धोका संभवतो. शरीराला उष्मा देणाऱ्या हालचालींनी सुरुवात करा आणि गहरी योगासने करण्यापूर्वी लवचिकता वाढविणारे, शरीराला ताण देता येईल असे हलके व्यायाम करा.

६.

हे शरीर आपले आहे, त्याची काळजी घ्या :

आपल्या शरीराचा आदर करा आणि चेहऱ्यावर स्मित बाळगत सोप्या व अगदी सहजपणे करता येतील अश्या आसनांनी सुरुवात करा.त्वरित वेगाने किंवा आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण दिल्याने तुम्हाला लगेच फायदे दिसू लागणार नाहीत. उलट यामुळे तुमचा सराव अजूनच कठीण व वेदनादायी होऊ शकतो.

७.

योगाभ्यासामध्ये सातत्य ठेवा :

तुमच्या योग सरावात नियमितता असणे आवश्यक आहे. त्याला तुमच्या रोजच्या दिनचर्येत सामील करा. (वर उल्लेख केल्याप्रमाणे, तुम्ही निवांतपणे योगाचा सराव करू शकाल अशी सोयीची वेळ निवडा.) आणि मग ते सहजपणे तुमच्या सवयीचे होईल.श्री श्री योगाचे वरिष्ठ प्रशिक्षक किशन वर्मा म्हणतात, “दोन तासांच्या इतर व्यायामांपेक्षा केवळ वीस मिनिटांचा नियमित योग सराव अधिक लवकर सकारात्मक परिणाम देऊ शकतो.”

८.

योगाभ्यासामध्ये कुटुंबीय / मित्रांना सामील करून मौज वाढवा :

जेंव्हा तुम्ही एकटेच योगाचा सराव करत असता तेंव्हा ते काही दिवसांनी कंटाळवाणे वाटू शकते किंवा त्याचा आळस येऊ शकतो. यासाठी सराव करताना कुटुंबातील सदस्यांना, आपल्या मित्रांना सोबतीला घ्या आणि फरक पहा. घरी सर्वांनी एकत्र योगाचा सराव करणे हा एक कौटुम्बिक सोहळा ठरू शकतो. योगाचा वेळ परिवारासोबत अजून चांगला कसा साजरा करू शकाल याबध्दल जाणून घ्या.

९.

नेहमी वेगवेगळे योग प्रकार करत रहा :

वेगवेगळी योगासने आणि प्राणायाम हे रोजच्या सरावात हवेच. पण जर वेळ अपुरा पडत असेल तर रोज काही ठराविक आसने करा आणि रविवारी मात्र योगाच्या समग्र पॅकेजने सुट्टी साजरी करा. तसेच, योगासनांच्या अखेरीसयोगनिद्रा जरूर करा.

केवळ काही योगासने करणे म्हणजे योगाचा सराव नव्हे हे लक्षात ठेवा. रोज घरी करण्याच्या योग सरावात काही वेळ प्राणायाम, ध्यान आणि सुदर्शन क्रिया(जर तुम्ही हॅपिनेस प्रोग्राम केला असेल तर) करा.

योगामुळे शरीर आणि मनाचा विकास होतो. याचे अनेक शारीरिक आणि मानसिक लाभ आहेत परंतु योगाभ्यास औषधे आणि कोणत्याही उपचाराला पर्याय होऊ शकत नाही. प्रशिक्षित अशा श्री श्री योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासन शिकणे आणि करणे गरजेचे आहे. काही व्याधी असतील तर योगासन शिकण्यापूर्वी डॉक्टर आणि श्री श्री योग (Sri Sri Yoga) प्रशिक्षक यांना कल्पना द्या. श्री श्री योग शिबीर करण्यासाठी जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर शी संपर्क करा. आर्ट ऑफ लिविंगचे कोणतेही शिबीर करायचे असेल तर आम्हाला info@artoflivingyoga.org ला संपर्क साधा.