‘नव’ या संस्कृत मूळ शब्दाचे दोन अर्थ आहेत- ‘नऊ’ आणि ‘नवीन’. जसा साप वेळोवेळी आपली कात टाकतो, तसेच नवरात्री म्हणजे आपल्यासाठी जुने ठसे पुसत जळमटं टाकून देण्याची आणि आपली चेतना नवीकोरी करण्याची वेळ आहे. ‘रात्री’ म्हणजे विश्रांती देणारी रात्र. आपल्याला तीन प्रकारच्या दु:खांचा सामना करावा लागतो. एक आतून निर्माण होणारे दु:ख, दुसरे बाहेरून उद्भवणारे दुःख. तिसरा प्रकार सूक्ष्म आहे आणि या दोघांच्या मधला आहे. रात्र आपल्याला या तीनही त्रासांपासून मुक्त करते आणि मन, शरीर आणि चेतना यांना विश्रांती देते. तुम्ही झोपल्यावर काय होते? तुम्ही तुमच्या सर्व चिंतांपासून मुक्त असता.

तर नवरात्रीत शरीर आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळण्यासाठी काय करावे?

नवरात्रीच्या काळात तुमचे मन दैवी चेतनेत लीन झाले पाहिजे. बाळाच्या जन्मासाठी जसे नऊ महिने लागतात, तसेच हे नऊ दिवस म्हणजे आईच्या पोटात विश्रांती घेऊन नवीन जन्म घेण्यासारखे आहे. या नऊ दिवस रात्रीत, आपण पुन्हा आपल्या मूळ स्त्रोताकडे जायला हवे. हा वेळ स्वतःला विचारण्यासाठी वापरा, “माझा जन्म कसा झाला?”, “मी कोण आहे?, “माझे मूळ स्रोत काय आहे?”

नवरात्र म्हणजे मनाला आपल्या उगमाकडे नेण्याचा काळ आहे. उपवास, प्रार्थना, मौन आणि ध्यान याद्वारे साधक आपल्या खऱ्या स्त्रोताकडे परत येतो. उपवासाने शरीर शुद्ध होते, मौन वाणी शुद्ध करते आणि चलबिचल करणाऱ्या मनाला विश्रांती देते आणि ध्यान साधकाला त्याच्या अस्तित्वात गहिरे घेऊन जाते.

छोट्या छोट्या गोष्टींच्या पलीकडे जा

या पवित्र दिवसांमध्ये, लहान गोष्टींमुळे तुमचे लक्ष तुमच्या ध्येयापासून विचलित होणार नाही याची काळजी घ्या. आपले मन इतके अवघड आहे की ते आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर खेचते आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकवते. उदाहरणार्थ, आपल्या समोर कोणी शिंकले किंवा शेजारी घोरत असेल तरी हे कारण मनाला कुरकुर आणि तक्रार करण्यासाठी पुरेसे आहे. जेव्हा आपण आपल्या मनाप्रति आणि त्याच्या नकारात्मक विचारांच्या किंवा भावनांच्या चक्रात अडकण्याच्या प्रवृत्ती बद्दल सजग होतो तेव्हा आपण शहाणे बनतो. तेव्हाच आपण आपल्या खुज्या, चलबिचल करणाऱ्या मनावर विजय मिळवू शकतो.

या नऊ दिवसांत मन तीन गुण- तमस किंवा आळस, निस्तेजपणा आणि जडता (पहिले तीन दिवस) यातून जाते. रजस किंवा अस्वस्थता आणि क्रियाकलाप (तीन दिवसांनंतर) आणि सत्व किंवा शुद्धता, ऊर्जा आणि हलकेफुलकेपणा (शेवटचे तीन दिवस). त्यामुळे जरी कोणताही वाद उद्भवला तरीही, ते सर्व बाजूला ठेवा आणि आपल्या निरागसतेकडे परत या.

अज्ञाताची भावना

हे संपूर्ण ब्रह्मांड त्या देवी नावाच्या ऊर्जेपासून बनलेले आहे. हे संपूर्ण विश्व त्या स्पंदनशील आणि चमकत्या चेतनेपासून बनलेले आहे आणि आपली सर्व शरीरे ही अदृश्य चेतनेच्या महासागरात तरंगणाऱ्या शिंपल्यासारखी आहेत. आपण ते पाहू शकत नाही, परंतु आपण ते अनुभवू शकतो. त्यामुळे या नऊ दिवसांत तुम्ही अज्ञाताची अनुभूती घ्यायला हवी. या नऊ दिवसांत केल्या जाणाऱ्या सर्व पूजा आणि विधींचा अर्थ जरी आपल्याला कळत नसला तरी आपण आपले हृदय आणि मन मोकळे ठेवून बसले पाहिजे आणि त्यातून निर्माण होणारी स्पंदने अनुभवली पाहिजेत.

उपवासामुळे तुम्हाला हलके वाटते

नवरात्र साजरी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सहसा उपवास आणि प्रार्थना करणे आणि नंतर शेवटी मेजवानी करणे. हे तुम्हाला हलके पोट ठेवण्यास मदत करते, त्यामुळे तुम्ही तुमच्या साधनेत आणि ध्यानात गहिरे उतरु शकता.

मी प्रत्येकाला काहीही न खाता उपवास करण्याचे सुचवणार नाही. तुम्ही मोजकेच अन्न घेऊ शकता, फळे घेऊ शकता आणि कमी खाऊ शकता. समजा तुम्ही संपूर्ण जेवण घेत असाल तर तुम्ही त्याच्या अर्धे किंवा पाव भाग घेऊ शकता. दिवसभर अधूनमधून काही खात रहाणे टाळा. उपवास करताना, तुम्ही भरपूर पाणी प्यावे, आणि स्वतःला उत्साही ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात ताजी फळे, आणि इतर सात्विक अन्न खावे.

नवरात्रीच्या दरम्यान उपवास करण्याची शिफारस केली जाते कारण ते शरीर शुद्ध करते, पचन सुधारते आणि सकारात्मकता वाढवते. जेव्हा आपण उपवास करतो, तेव्हा चंचल मन स्थिर होते आणि ध्यान करणे आणि आपल्या मूळ स्त्रोतापर्यंतच्या आंतरिक प्रवासात प्रगती करणे सोपे होते.

लक्षात ठेवा आपण उपवास ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी नाही तर आपले शरीर शुद्ध करण्यासाठी करतो. जेव्हा शरीर शुद्ध होते तेव्हा मन अधिक निर्मळ आणि शांत होते.

मंत्रजाप

आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नवरात्रीच्या सर्व दिवसांमध्ये मंत्रजाप केला जातो. शेवटच्या दिवशी जेव्हा यज्ञ केले जातात (तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन पाहू शकता), तुम्ही फक्त मंत्रांच्या कंपनांमध्ये स्नान करायला हवे. त्याला मंत्रस्नान म्हणतात.

यज्ञांच्या दरम्यान उच्चारलेले शक्तिशाली मंत्र सूक्ष्म सृष्टी समृद्ध करतात आणि संपूर्ण जगाला लाभ देतात, परंतु जेव्हा यज्ञांमध्ये भाग घेणारे साधक गहिऱ्या ध्यानात जातात तेव्हाच.

मौन पाळणे

नवरात्र ही आत्म चिंतनाची वेळ आहे, मौनाच्या साह्याने मूळ स्त्रोताकडे परत जाण्याची वेळ आहे. जेव्हा मन सतत बाहेरच्या जगात गुंतलेले असते तेव्हा ते थकून जाते. मौनात तुम्ही ऊर्जा वाचवत असता.

मौन असताना, तुम्ही तुमचे मन अंतर्मुख करत असता, जिथे मन लेसर किरणांसारखे तीक्ष्ण होते.

मौनासोबत ध्यान

जेव्हा तुम्ही सुरुवातीला मौन करता, तेव्हा तुम्ही बोलत नसले तरी मन सर्वत्र फिरत राहते. पण जेव्हा तुम्ही मौनासोबत ध्यान करता, गहिरी डुबकी मारता तेव्हा तुमचे मन खूप केंद्रित होते. मग तुमची आंतरप्रज्ञा सुधारते, स्मरणशक्ती चांगली होते आणि बुद्धी तीक्ष्ण होते आणि तुमच्या शरीराला निश्चित ताकद मिळते. हे मौन मार्गदर्शनात केले पाहिजे. तुम्ही इतर सर्व कामे करत असताना मौन बाळगले तर ते फारसे प्रभावी होणार नाही. दर सहा महिन्यांनी आपण मौन साधायला हवे.

मौन म्हणजे काहीही करण्याबाबतची काही प्रमाणात असलेली अनास्था. हा मनाचा आपला आंतरिक प्रवास आहे. ही आंतरिक शांतता आपल्या आध्यात्मिक आणि बौद्धिक वाढीसाठी खूप महत्त्वाची आहे. आंतरिक शांतता आपल्याला जगाच्या कोलाहलापासून मुक्त करते. आणि शेवटी ती एकत्वाची शांतता आहे – संपूर्ण विश्वासह एकरुपता. एकरुपता हे मौन साधनेचे ध्येय आहे.

नवरात्रीचा प्रत्येक दिवस देवीच्या काही विशिष्ट गुणांशी निगडीत असतो आणि जेव्हा आपण देवी मातेच्या या पैलूचे चिंतन करतो तेव्हा हे गुण आपल्या चेतनेमध्ये देखील प्रज्वलित होतात.

होमाच्या जादूमध्ये मनसोक्त भिजा

शेतकरी शेत नांगरतो, बी पेरतो, पाणी देतो, खत घालतो आणि कीड आणि तणांची काळजी घेतो हे तुम्हाला माहिती आहे. परंतु, अन्न कसे पिकवले जाते याबद्दल ग्राहक क्वचितच चिंतित असतो. तो फक्त त्याची चव चाखतो. त्याचप्रमाणे, वैदिक पंडित शास्त्रांनुसार जे पूजाविधी आणि होम किंवा यज्ञ करतात आणि हे मंत्र व होम स्पंदने निर्माण करतात.

बुद्धीला कदाचित या मंत्रांचा अर्थ कळत नसेल पण मंत्रांचा आपल्या चेतनेवर गहिरा सुखदायक आणि चैतन्यदायी प्रभाव असतो. जी कंपने निर्माण होतात त्याचा फायदा अस्तित्वाच्या सर्व सूक्ष्म थरांना होतो. ही ऊर्जा परोपकार निर्माण करते, मानवजातीचे कल्याण करते, वाईट कर्म पुसून टाकते, जगात सुसंवाद वाढवते आणि इच्छा पूर्ण करते. हे आपल्याला आत्म-साक्षात्काराच्या जवळ आणते आणि आपल्याला भौतिक यश मिळवून देते.

आपले कार्य फक्त आपले हृदय आणि मन उघडे ठेवून बसणे आणि या स्पंदनांमध्ये चिंब भिजणे आहे. आपण फक्त प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद घेतले पाहिजेत. योग्य स्वरात, भक्तीभावाने केलेले सर्व मंत्रजाप चेतनेचे शुद्धीकरण आणि उन्नती करतात. आपण फक्त त्याचा आनंद घेतला पाहिजे.