हजारो वर्षांपूर्वी, एका तरुण स्त्रीने तिचे जीवन कायमचे बदलल्याचे जाणवल्यानंतर आनंदाने नाचण्यास सुरुवात केली असे मानले जाते: तिचे जीवन निराकार आणि सर्वव्यापी असीम चेतनेपासून उद्भवले आहे. त्या चैतन्याच्या स्तुतीपर परमानंदाची उत्स्फूर्त अभिव्यक्ती म्हणजे ‘या देवी सर्व भूतेषु’ हा श्लोक आज ओळखला जातो.

श्लोकाचे रचयीता ऋषी वाक यांनी मानवी अस्तित्वाचा प्रत्येक पैलू टिपला आहे आणि त्याचे श्रेय देवी मातेला दिले आहे. ऋग्वेदात उगम पावलेला हा नामजप नवरात्रीत केल्या जाणाऱ्या सर्व पवित्र मंत्रांचा अविभाज्य भाग आहे. एक साधा पण तेवढाच गहन मंत्रजप, त्याचे महत्त्व आणि श्लोकांचा अर्थ जाणून घेऊया.
या देवी सर्व भूतेषुचे महत्त्व
गुरुदेव श्री श्री रविशंकर सुंदररित्या स्पष्ट करतात की, “सूक्ष्म सृष्टीला नियंत्रित करणारे हे ६४ मंत्र आहेत. ऐहिक आणि आध्यात्मिक स्तरावर त्याचे अनेक फायदे आहेत. ते जणू एखाद्या व्यक्तीच्या जागृत चेतनेचा भाग आहेत. या नऊ रात्री त्या दैवी तरंगांना पुन्हा जागृत करण्यासाठी आणि आपल्या जीवनाची सर्वात गहिरी अनुभूती घेण्यासाठी साजऱ्या केल्या जातात.”

गुरुदेव म्हणतात, “जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचा जप करतो (संदर्भ – दैवी मातेच्या स्तुतीपर समर्पित मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यम चे ७०० श्लोक), “ या देवी सर्व-भूतेषु भ्रान्ति रुपेण संस्थिता; नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः (अर्थ: हे दैवी माते! भ्रांति म्हणून प्रकट होणाऱ्या तुला मी नमन करतो, जे सर्व प्राणिमात्रांमध्ये भ्रमाचे तत्व आहे). हे खूपच रोचक आहे. हे तुम्हाला जगात दुसरीकडे कुठेही सापडणार नाही. देवी मातेची पूजा केवळ सौंदर्य आणि कृपा म्हणून केली जात नाही तर ती भूक, माया, क्रोध देखील आहे!”
“देवी आपल्यात कोणत्या रुपाने आहे?” गुरुदेव स्पष्ट करतात. “ती अनेक रूपांमध्ये आणि अनेक भावनांच्या रुपात उपस्थित आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीत विशिष्ट तेज दिसते, तेव्हा ते देवीचे प्रकटीकरण असते. जेव्हा तुम्ही संपूर्ण शांती, अंतःकरणातील शांतता अनुभवता, केवळ तात्पुरती शांतता नव्हे, तर संपूर्ण तृप्ती आणि समाधान अनुभवता, ती देवी असते. आणि जेव्हा तुम्हाला अस्वस्थता जाणवते तेव्हा ती देखील देवीच असते. म्हणून जर कोणी अस्वस्थ झाले तर तुम्ही म्हणता ‘अरे, देवी या व्यक्तीमध्ये अस्वस्थतेच्या रूपात प्रकट झाली आहे!’ त्याचप्रमाणे, भूक, भ्रम, गोंधळ – हे गुण देखील देवीचे प्रकटीकरण आहेत! हे मन जे द्वैतामध्ये अडकले आहे, ते या दैवी मंत्रोच्चारांनी त्यातून बाहेर येते. जेव्हा आपण चांगले आणि वाईट, योग्य आणि अयोग्य या द्वैतांच्या पलिकडे जाऊन परमात्म्याला बघतो, तेव्हा आपण त्याच्या पलिकडे जाऊन एका चेतनेशी जोडले जाऊ शकतो. तेव्हा आपल्याला गहन अचल शांतता लाभते.”
देवी सर्वव्यापी, कालातीत तसेच नित्य नूतन असल्याचे गुरुदेव सांगतात.
- सर्वव्यापी: देवी प्रत्येकामध्ये चैतन्यस्वरूपात उपस्थित आहे. अशी कोणतीही जागा नाही की जी देवीने व्याप्त नाही.
- प्राचीन आणि नूतन : प्रत्येक क्षण चैतन्याने सळसळत असतो. आपली चेतना एकाच वेळी ‘नित्य नूतन’ (प्राचीन आणि नवीन) आहे. वस्तू एकतर जुन्या किंवा नवीन असतात, परंतु निसर्गात, आपल्याला जुने आणि नवीन एकत्रच अस्तित्वात असलेले दिसेल. सूर्य प्राचीन आणि नवीनही आहे. नदीत प्रत्येक क्षणी ताजे पाणी वाहत असते, तरीही ती पुरातन आहे. त्याचप्रमाणे मानवी जीवन खूप प्राचीन आहे परंतु त्याच वेळी ते नवीन आहे. तसेच, देवी माता – ती कालातीत आणि नवीन देखील आहे!
श्रीमती भानुमती नरसिंहन यांच्याद्वारे ‘या देवी सर्व भूतेषु’ मंत्र
या श्लोकाचे शब्द आणि अर्थ
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
सर्व प्राणीमात्रांमध्ये उपस्थित असलेल्या त्या देवीला विष्णुमाया म्हणतात,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनः पुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्य भिधीयते।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
जी सर्व प्राणिमात्रांमध्ये चैतन्यस्वरूप प्रतिबिंबित होते त्या देवीला,
नमन, तिला नमन, तिला नमन, पुन्हा पुन्हा नमन.
या देवी सर्वभूतेषु बुद्धि-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
सर्व प्राणिमात्रांमध्ये बुद्धीच्या रूपाने विराजमान असलेल्या त्या देवीला,
तिला नमन, तिला नमन, तिला नमन, पुन्हा पुन्हा नमन.
या देवी सर्वभूतेषु निद्रा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये निद्रेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु क्षुधा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
सर्व प्राणिमात्रांमध्ये भुकेच्या रूपात राहणाऱ्या त्या देवीला,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु छाया-रुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये सावलीच्या रूपात (उच्च आत्मस्वरूपात) वावरत आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये शक्तीच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु तृष्णा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये तृष्णेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषू क्षान्ति रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये सहनशीलतेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषू जाति रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये वंशाच्या (सर्वांचे मूळ कारण) रूपात राहते,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषू लज्जा-रुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये विनयशीलतेच्या रूपात वावरत आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु शांति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये शांततेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु श्रद्धा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये श्रद्धेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषू कान्ति रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रेम आणि सौंदर्याच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये सौभाग्यस्वरूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु व्रती-रुपेणना संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये क्रियाशीलतेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु स्मृती-रुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये स्मृतीच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु दया-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये दयेच्या रूपाने विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु तुष्टि-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राणिमात्रांमध्ये समाधानाच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
त्या देवीला जी सर्व प्राण्यांमध्ये मातेच्या रूपात विराजमान आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु भ्राँति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये भ्रांतीच्या रूपात वावरत आहे,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.
इन्द्रियाणा मधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या।
भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः॥
(नमस्कार) त्या देवीला जी सर्व जगतातील प्राणिमात्रांच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवते,
सर्व प्राणिमात्रांमध्ये सदैव व्याप्त असणाऱ्या देवीला वंदन.
चितिरुपेण या कृत्स्नम एतत व्याप्य स्थितः जगत।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
(तिला वंदन) जी चैतन्याच्या रूपाने या विश्वात व्यापते आणि त्यात वास करते,
तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार, पुनःपुन्हा नमस्कार.



