जम्बुकेश्वर मंदिर (जल तत्त्व)

जल तत्व | तिरूवनैकवल, त्रिची, तमिलनाडू

त्रिची येथील जंबुकेश्वराचे मंदिर जल तत्वाचे प्रतिक आहे. येथे भगवान शिवाची ‘अप्पू लिंगम’ या जल तत्वाच्या रुपात आराधना केली जाते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाच्या खालून एक पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो. या जल प्रवाहात लिंग बुडालेले असते, ज्यामुळे जल तत्वाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

आख्यायिका अशी आहे की, अखिलांडेश्वरी रूपातील देवी पार्वती तपश्चर्या करण्यासाठी जंबूकारण्यात पोहोचली. तेथे तिने ‘अप्पू लिंगम’ नावाचे जल लिंग निर्माण करून त्याची आराधना सुरु केली. तेथे भगवान शिव प्रसन्न होऊन तिला शिव ज्ञान, जे अत्युच्च ज्ञान आहे, त्याची दीक्षा दिली. येथे भगवान शिव आणि पार्वतीदेवी यांचे गुरु शिष्याचे नाते निर्माण झाल्याने अन्य मंदिरांप्रमाणे शिवरात्री दिवशी शिव पार्वतीच्या विवाहाचा गिरीजा कल्याणम् विधी येथे होत नाही. येथे दोन्ही देवतांच्या मूर्ती एकमेकासमोर आहेत.

अशी श्रद्धा आहे की, या मंदिरामध्ये पार्वतीदेवीने शिवाची आराधना केली असल्याने आज देखील येथील पुजारी अखिलांडेश्वरी रुपात म्हणजे स्त्री वेशात पूजा करतात. इतर साधक देखील नियमित ही प्रथा पाळतात.

कथासार

प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार भगवान शिव हे आद्य आणि सर्वोच्च गुरु आहेत. जल हे ज्ञानाचे प्रतिक असून त्याचा प्रवाह ज्ञान ग्रहण दर्शवते. म्हणून जंबूकेश्वराचे मंदिर हे ज्ञान आणि ज्ञान ग्रहण याचे उत्तम प्रतिक आहे.

अशी श्रद्धा आहे की, जो कोणी या मंदिरात पूजा अर्चा करेल त्याला ज्ञान आणि बुद्धिमत्ता प्राप्त होईल.

 

 जंबुकेश्वर मंदिराची ५ वैशिष्ट्ये   

  • हे मंदिर १८०० वर्षापूर्वी बांधलेले असून याची उभारणी कोसेनगन्ना चोला यांनी केली आहे.
  • हे मंदिर भारतातील तेरावे सर्वात मोठे मंदिर असून १८ एकर मध्ये पसरलेले आहे.
  • मंदिराच्या भिंतींवर चोला साम्राज्य कालीन शिलालेख आहेत.
  • येथे दररोज दुपारी होणारी ‘उची कला पूजा’ प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये पुजारी साडी नेसून पार्वतीदेवीचे प्रतिनिधी बनून अप्पू लिंगमवर अभिषेक करतात.
  • अप्पू लिंगम खाली वाहत असणाऱ्या जल प्रवाहामुळे ते लिंग कधीही सुकत नाही.