प्रश्न : मंत्राचा जप (नामस्मरण) करण्याचे महत्व काय आहे?
श्री श्री : जेव्हा कुणी तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहते तेंव्हा तुम्हाला कसे वाटते? जर कुणी तुम्हाला म्हटले की ‘तुम्ही गाढव आहात’ तर तुम्हाला कसे वाटते? त्याने तुम्हाला काय होते? त्याने काय निर्माण होते? राग!ते तुम्हाला हादरवून टाकतात. नकारात्मक तरंग उठतात, तुम्हाला राग येतो. तुमच्या पोटात, डोक्यात काहीतरी होऊ लागते. जर एखादा वाईट शब्द तुमच्यात इतक्या शरीरक्रियात्मक प्रतिक्रिया घडवू शकतो तर मग एखादा छानसा शब्द, वैश्विक शक्तीने भरपूर असा एखादा जपाचा मंत्र तुमच्या शरीरावर काहीच परिणाम करणार नाही?
मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे. तसे नाही आहे, परिणाम हा होतोच. मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच त्याला ‘मंत्र कवच’ म्हणतात. मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते.
कधी कधी तुम्हाला काही लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते. तुम्हाला त्यांच्या कडून चांगले तरंग मिळत असतात. कधी कधी तुम्हाला असे लोक भेटतात की तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटते. असे का होते माहिती आहे का? व्यक्तीच्या भोवतालचे नाकारात्मक तरंग त्यांना अनाकर्षक बनवतात. मंत्र या अनाकर्षक तरंगाना जास्त सकारात्मक, आकर्षक बनवतात. हाच मंत्र जपण्याचा फायदा आहे.
आज, तुम्ही जर न्यूयॉर्कला गेलात तर तुम्हाला अशी अनेक ठिकाणे दिसतील की जिथे लोक जप शिकतात. लोक संध्याकाळी एक तास मंत्र जप (नामस्मरण) करण्याच्या क्लासला जातात. ते ‘ओम नम: शिवाय, ओम नमो नारायणा, श्रीराम जयराम जय जय राम’ असा जप करतात. अर्थात त्यांचे उच्चार वेगळे असतात. चीनमध्ये ते ‘राधे राधे’ च्या ऐवजी ‘लाधे लाधे’ म्हणतात. तैवानमध्ये ७,००० ते ८,००० लोक मिळून ‘राधे गोविंद’ च्या ऐवजी, ‘लाधे गोविंद’ असे गात असतात. याने परिणाम होतो हे लोकांनी अनुभवले आहे.आणि खरेच तो होतो !
मग हे कधी करावे? जर तुम्ही प्राणायाम आणि ध्यानाच्या नंतर जप केला त्याचा जास्त चांगला परिणाम होतो. जर तुम्ही उतावीळपणाने केलात तर त्याचा तितकासा परिणाम होत नाही.