योगशास्त्राप्रमाणे आहाराविषयी १० चांगल्या सवयी! (Yoga diet in Marathi)

कार्तिक (वय ३०), माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा अभियंता आहे. छायाचित्रकला हा त्याचा छंद आहे. आठवड्यातील ४०-४५ तास तो काम करतो. जरी त्याला शरीरसंवर्धनाची आवड असली तरी त्याची दिनचर्याच अशी आहे की त्याला व्यायाम करण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. तासनतास संगणकावर बसल्यामुळे, मधल्यावेळात क्वचितच विश्रांती मिळत असल्यामुळे आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करायचे असल्यामुळे त्याला पाठदुखी, थकवा आणि बद्धकोष्ठता झाली आहे. ज्या वयात अंग मोडून काम करायचे असते नेमक्या त्याच वयात अशा व्याधी जडणे ही खचितच चांगली गोष्ट नाही. बरेच लोक या मताशी सहमत होतील की रोज योग्य व चांगला व्यायाम केल्याने अशा व्याधी दूर होतात पण तेवढे करणे पुरेसे नाही. परिपूर्ण आहार निवडणे आणि त्याचे पालन करणे देखील गरजेचे आहे. तणावपूर्ण जीवनशैली असूनसुद्धा, योग्य आहार निवडल्याने जोखीम कमीतकमी होऊ शकते.

फक्त योग्य आहार निवडणेच पुरेसे आहे कां?

नाही. योग्य आहारा बरोबरच, तो कसा घ्यावा हे देखील महत्वाचे आहे. यासाठी काही ठराविकच मार्गदर्शक तत्वे पाळण्या सोबत  काय आणि किती खावे तसेच काय खाऊ नये याची माहिती असावी.

१) आपण काय खातो हे पहा.

तुमचा सध्याच्या आहाराविषयी निरीक्षणे नोंदवा. तुम्ही जास्त काय खाता? तुमच्या आहारात जास्त उष्मांक (कॅलरीज) आहेत कां आणि त्या वापरण्याएवढे श्रम तुम्ही करता कां? जर पहिल्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल आणि दुसऱ्या प्रश्नाचे नकारार्थी असेल तर तुम्हाला कमी चरबीयुक्त व पचनास हलका आहार निवडणे योग्य ठरेल. काही मिनिटे काही मुलभूत योगासने करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल.

२) हिरव्या पालेभाज्यांची निवड करा.

आहारात हिरव्या पालेभाज्यांच्या समावेश करा. त्यांच्यात प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि तंतू असतात. त्या बनविण्यास सोप्या असतात तसेच भूक वाढविणाऱ्या असतात. आणि हो ! आयुर्वेदिक पाककृतींचे एक शिबीर तुम्ही केलात तर तुमचा मेनू वाढू शकतो.

३) पाणी कधी प्यावे ते जाणून घ्या.

आपण शाळेत शिकलोच आहोत की आपले शरीर ८०% पाण्याने बनले आहे. हे महत्वाचे आहे की आपल्या शरीराला लागणारे क्षार रोज आपण पित असलेल्या पाण्यातून मिळतात. जेवताना पाणी प्याल्यास पचनास वेळ लागतो. म्हणून जेवणाअगोदर अर्धा तास आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

४) आहारात पुरेशी प्रथिने असावीत.

प्रथिने शरीराला आवश्यक असतात. त्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. ब्रोकोली, सोयाबीन, मसूर आणि पालक या रोजच्या खाद्यान्नात प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. कमी स्निग्ध, दुग्धजन्य पदार्थांत प्रथिने भरपूर असतात. रोज योग्य प्रमाणात शरीराला प्रथिने मिळतील असे पहा.

५) अन्न चावून खा.

गायीला रवंथ करताना तुम्ही पहिले आहे कां? गाय अन्न ४०-६० वेळा चावून खाते.

अन्नाला पचविण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग म्हणजे ते चावून खाणे. बरेच लोक अन्न घाईघाईने खातात तसेच त्यांचा कल अन्न चर्वण न करता खाण्याकडे असतो. आपण जे खातो ते पचवले जातेच परंतु चर्वण न केलेले अन्न पचण्यास वेळ लागतो आणि ते आपली पचनसंस्था थकवण्यास कारणीभूत ठरते. याउलट चावून बारीक केलेले अन्न लवकर पचते. आणि चर्वनासाठी शरीर ऊर्जा वापरते ज्यामुळे कॅलरीज वापरल्या जातात.

६) फास्ट फूड व शीतपेये यांपासून दूर राहा.

फास्ट फूड तुमच्या जिभेचे चोचले पुरवते पण ते तुमच्या शरीराला घातक आहेत. तसेच त्यात ट्रान्सफॅट सारखी घातक चरबीयुक्त घटक असू शकतात. शीतपेयांत अतिरिक्त प्रमाणात साखर असते. जिचे अतिसेवन लठ्ठपणा, मधुमेह आणि दंतविकार उत्पन्न करू शकते. शीतपेयांऐवजी ताक, लिंबू सरबत घेणे कधीही श्रेयस्कर.

७) घरी बनवलेले पदार्थ खा.

घराशेजारील हॉटेलमधून पिझ्झा मागवण्यापेक्षा तुमच्या आवडीचे पदार्थ घरी बनवा. तुमचे रात्रीचे जेवण तुम्ही सूर्यफुल किंवा शेंगतेल वापरण्या ऐवजी ऑलिव्ह ऑईल वापरून बनवा. ते आरोग्यदायी आहे. स्वयंपाक घरीच बनवल्यामुळे तुम्ही एक चांगली बचत करता. त्यामुळे तुमचा  चांगला वेळ तुम्ही आपल्या कुटुंबासमवेत घालवता.

८) जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे.

आपल्यापैकी बरेच लोक जेवताना मोबाईलवरून मेसेजेस पाठवत असतात किंवा टीव्हीवर कार्यक्रम बघत असतात. ते किती खात आहेत याकडे त्यांचे लक्ष नसते. तुमचे पोट जरी भरले असेल तरी तुमचा मेंदू तुम्हाला सांगत असतो की अजून खा,अजून खा. शेवटी तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवता. परंतु जर तुमचे लक्ष खाण्याकडे असेल तर तुम्ही जरुरीपुरतेच खाता. पुढच्यावेळी तुम्ही जेवण कराल तेंव्हा टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल फोन थोड्या वेळासाठी दूर ठेवा.

९) सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नका.

सकाळचा नाश्ता हे सर्वात महत्त्वाचे अन्न आहे. कारण त्यावर शरीर पुढील संपूर्ण दिवसाची तयारी करत असते. म्हणून एक परिपूर्ण व सकस नाश्ता घेऊनच दिवसाची सुरुवात करा.

१०) खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन होऊ द्या.

जसे काय खावे आणि किती खावे, हे जाणणे महत्वाचे आहे. तसेच आपली पचनशक्ती सशक्त बनवणे महत्वाचे आहे. जेवणानंतर काही मिनीटे वज्रासनात बसल्याने पचनशक्ती वाढते. या आसनामुळे ओटीपोटातील रक्ताभिसरण वाढते आणि पचनशक्ती सुधारते.

आहाराविषयी चांगल्या सवयी तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत करतात. आणि म्हणूनच प्राचीन ऋषी सात्विक आहार घेत असत. सात्विक आहाराचे फायदे तुम्हाला येथे शिकायला मिळतील. लक्षात ठेवा, तुम्ही जे खाता तसे तुम्ही बनता. म्हणून योग्य आणि चांगले तेच खा.

श्री श्री योग हा कार्यक्रम अशा प्रकारे बनविला आहे जेणेकरून तुम्हाला योग्य आहार निवडण्यास व योगाभ्यासाचा सराव करण्यास मदत होईल व तुमची जीवनशैली सुधारेल. चांगल्या आहारविषयक सवयी बरोबर योगाभ्यास केल्यास तुम्ही जीवनाच्या सर्व क्षेत्रांत उत्साहाने, समर्पितपणे आणि लक्षपूर्वक काम करू लागाल.

आजाराने तुम्हाला जखडून ठेवले आहे कां? किंवा भावनिक त्रासामुळे तुमच्या वैयक्तिक व कार्यालयीन जीवनात वादळ उठले आहे कां? तर मग खाली दिलेला फॉर्म भरा आणि जाणून घ्या योगाभ्यासामुळे तुमच्या जीवनशैलीत कमीतकमी बदल घडवून समस्या सहजपणे कशा सोडवता येतील.

Interested in yoga classes?