तुमचं ध्यान होतंय की तुम्हाला झोप येत आहे? - ध्यान व झोपेमधील फरकावर एका तज्ञाचे विचार

जून १, २०१८

पहिल्यांदा ध्यान करणाऱ्यांना सुरुवातीला असे वाटू शकते की ते झोपत आहेत, जेंव्हा त्यांना प्रत्यक्ष ध्यान लागलेले असते. हे स्वाभाविक आहे, कारण ध्यानाशी ओळख होईपर्यंत आपण विश्रांतीला झोपेशी जोडत असतो. 

अस्तित्वाची स्वच्छता - ताण आणि थकवा मोकळा करा 

खरंच.. कधी कधी ध्यान करताना आपल्याला झोपू पण लागू शकते, पण ते ठीक आहे. ध्यान करताना झोप येऊ नये यासाठी प्रयत्न न करणे हे महत्वाचे आहे. त्या ऐवजी ध्यानसमयी जे निद्रा आणि कंटाळा येतात ते तणाव आणि थकवा यापासून मुक्त होण्याच्या प्रक्रिया आहेत हे जाणावे. आपल्यापैकी काही जणांना ध्यानात असताना अथवा ध्यानानंतरदेखील  झोप व थकवा यातून जाणे अतिशय गरजेचे असेल. शरीरशुद्धी होत आहे हे दर्शवणारी ही  लक्षणं आहेत असे मानणे योग्य होईल. 

ध्यान करताना जर तुम्हाला आडवे पडावे आणि झोपावे असे खूप वाटू लागले तर तसे करा (पण झोपायला हवेच असे वाटल्याशिवाय अजिबात आडवे होऊ नका!!). जेंव्हा जाग येईल तेंव्हा उठून बसा आणि आणखी ५ मिनिटे ध्यान करा. तुमच्या शरीराने आधीचा थकवा भरून काढला असेल, त्यामुळे उठल्यावर केलेले ५-१० मिनिटांचे ध्यान सुद्धा फायदेशीर ठरेल. 

झोप आणि ध्यान यातील फरक 

काही दिवस ध्यान नियमित केले की ध्यान व झोप या वेगवेगळ्या अवस्था आहेत हे लक्षात येते. झोपेतून जागे होताना थोडे कंटाळवाणे वाटते. पण शांत खोल ‘न-मन’ अवस्थेतून बाहेर येताना मन प्रगल्भ असते आणि शांत व आनंदी वाटते.

त्याचबरोबर गाढ झोपेतील आणि ध्यानातील श्वासोच्छवास यात फरक असतो. ध्यानाच्या खोल अवस्थांमध्ये श्वासोच्छवास खूपच मंद होतो, काही वेळापुरता अनावश्यक होऊन बंदसुद्धा  होऊ शकतो. झोपेमध्ये श्वासोच्छवास थोडासाच कमी होतो. 

ध्यान करताना तुम्हाला झोप लागली होती की खोल ध्यान याचा फार विचार करू नका. असे केल्याने ध्यान लागण्याच्या निर्मळ प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ केल्यासारखे होईल. "जे काही होईल ते चांगलेच आहे " असा विचार करणे हे उत्तम. 

ध्यानामधली सजगता आणि निद्रेमध्ये सजगतेचा अभाव  हा ध्यान व निद्रेमधील महत्वाचा फरक आहे. पण ध्यानामधली सजगता ही जागृतावस्थेतील सजगतेपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असते. हा फरक जाणण्यासाठी आणि निद्र व ध्यानातील फरक समजून घेण्यासाठी मन,  बुद्धी, चित्त व अहंकार हे जाणिवेचे चार प्रकार जागृतावस्थेत, स्वप्नात व निद्रेत कसे काम करतात; शिवाय ध्यानात अनुभवली जाणारी चौथी अवस्था -तुर्यावस्था- यातही ते कसे असतात हे समजून घेणे उचित आहे. 

जागृतावस्थेत मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळेच काही ना काही प्रमाणात कार्यरत असतात. स्वप्नावस्थेत फक्त चित्त कार्यरत असते. खोल निद्रावस्थेत चारीही निष्क्रिय असतात - अस्तित्व  कुठलिही कृती न करता विश्राम करते.  

मन, जे ज्ञानेंद्रियांकडून माहिती घेत असते, ते ध्यानावस्थेत पूर्ण शांत व निष्क्रिय होते. अहंकार सुद्धा निष्क्रिय होतो. बुद्धी व चित्त मात्र सूक्ष्मपणे कार्य करत राहतात. ध्यान झोपेसारखेच आहे, मात्र ते बुद्धीच्या सूक्ष्म जाणिवेसह आहे. आणि तुर्यावस्थेत आपल्या खऱ्या स्वभावाच्या उत्स्फूर्त जाणिवेसह आहे. 

सखोल स्वच्छतेसाठी ध्यानात झोकून द्या 

गुरुदेव श्री श्री रविशंकर सांगतात की झोकून देण्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे ज्यात सगळं काही सुटतं आणि तुम्ही जाणीव नसलेल्या अवस्थेत जाता - ही अवस्था म्हणजे झोप. ही एक तामसिक अवस्था आहे, ज्यात ज्ञान उपलब्ध नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये विश्राम मिळतोच, पण सोबत अगदी सूक्ष्म प्रमाणात उद्देश किंवा भावना असतात - हेच ध्यान. 

ध्यान व निद्रा या दोन्ही अवस्थांमध्ये चयापचयाचा,  श्वासोच्छ्वासाचा आणि इतर शारीरिक कृतींचा वेग मंदावतो. दोन्हीमुळे ताण हलका होतो, पण ध्यानामुळे मिळणारी विश्रांती झोपेमुळे मिळणाऱ्या विश्रांतीपेक्षा कैक पटींनी जास्त असते. त्यामुळेच आपल्या अस्तित्वावर खोलवर रुतलेले ठसे किंवा संस्कार ध्यानात पुसले जातात. 

तरीही ध्यान झोपेच्या पलीकडचे आहे. ते चैतन्यस्थित्य आहे, जाणीवपूर्वक स्वत्वाबद्दल सजग होणे आहे. तीच चेतना जागृतावस्थेत, स्वप्नावस्थेत आणि झोपेतसुद्धा असते आणि सर्व या अवस्थांची साक्षी असते. 

जरी निद्रेमध्ये जाणीव त्याच्या कुठल्याही "रूपात" कार्यरत नसली तरी ती झोपेची साक्षी असते. त्यामुळेच "झोप चांगली झाली " हे तुम्हाला कळते. 

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे खूप सुंदर शब्दात सांगतात, " जागृतावस्था आणि निद्रा हे सूर्योदय आणि अंधारासारखे आहेत आणि स्वप्ने ही मधल्या संधिप्रकाशासारखी आहेत. ध्यान हे त्यांच्या पलीकडे अवकाशात गेल्यासारखे आहे; जिथे सूर्यास्त नाही, सूर्योदय नाही, काहीच नाही!"

(ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स प्रशिक्षकख्रिस डेल यांच्या लेखणीतून)