घरी योग करण्यासाठी मार्गदर्शन I The Ultimate Guide for Yoga at Home

तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ अजून वाढवून हवा आहे कां? आपणास नेहमी सुडौल रहावे असे वाटते कां? तजेलदार त्वचा, तेजस्वी डोळे, न ढळणारे स्मित या गोष्टींची अभिलाषा आहे कां?

“होय! होय! होय! हे सारे आणि अजून बरेच काही मला हवे आहे!”

‘अजून बरेच’ ! ‘बरेच’ हा शब्द जीवनाप्रती तुमचा उत्साह दर्शवितो आणि स्वतःसाठी जास्त वेळ हवाय ही तुमची मनातली सुप्त इच्छाही दाखवितो. तुम्हाला आणखी वेळ हवा आहे ही इच्छा हे दर्शवते की तुम्ही जीवनाप्रती निष्काळजी नाही आहात. तुम्ही इतके तरबेज आहात की वेगवेगळ्या भूमिका अतिशय शिताफीने जगत आहात. तथापि ही शिताफी आपल्या शरीरात कधी पाठदुखीच्या रुपात, कधी शरीर, मनाचा थकवा  तर कधी ताण तणावाच्या रुपात दुष्परिणाम करते.

योग ही शरीर आणि मनाला ऊर्जेने भारून टाकणारी निसर्गाची देणगीच आहे. एखाद्या बाळाचे काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तुम्हाला जाणवेल की ते बाळ विविध आसने सहजपणे करणारा परिपूर्ण योगीच आहे. पण आपण जसे मोठे होऊ लागतो तसे ह्या प्राचीन तंत्रापासून आपली नाळ तुटू लागते आणि मग निरोगी आयुष्य जगण्यासाठी परत योगाकडे वळावे लागते.

घरी योगाभ्यास करताना ह्या गोष्टी पाळा I Do's for yoga practice at home

१. प्रबळ विचार करा

२. योग प्रशिक्षक शोधा

३. ग्रुपमधील योग सराव उत्साहदाई असतो

४. योगा मॅट खरेदी करा

५. योगासाठी वेळ नक्की करा

६. योगासाठी योग्य जागा नक्की करा

प्रबळ विचार करा I Create a powerful thought

डोळे बंद करा आणि निरोगी शरीर व मनाचा प्रबळ विचार मनात आणा.  आणि बघा तुमच्या आयुष्यात ते घडायला लागेल. लक्षात ठेवा की एक निरोगी शरीरच निरोगी आणि आनंदी मनाला धारण करू शकते. तुम्ही जसा विचार करता  तसेच तुम्ही बनता.

योग प्रशिक्षक शोधा I Find a yoga trainer

होय. योग हा श्वास प्रक्रिया आणि आसनांचा विषय आहे. पण ते शिकायला काही दिवस खर्ची घालणे, रोज एक तास तरी देणे हा योग शिकण्याचा एकमेव मार्ग आहे. तुमच्या श्वास प्रक्रियांबद्दलच्या शंका, आसनाची अचूक स्थिती, प्रत्येक आसनाचे फायदे या साऱ्यांची योग्य उत्तरे उत्तम योग प्रशिक्षक देऊ शकतो.

ग्रुपमधील योग सराव उत्साहदाई असतो I Group dynamics

योगाच्या क्लासमुळे तुम्ही इतर शिबिरार्थींशी मिळून मिसळून असता.  आणि ग्रुप मध्ये योग शिकणे मजेशीर असते. ग्रुप मध्ये योगाभ्यास करताना तुम्ही इतरांना प्रोत्साहित करू शकता  तसेच तुम्ही इतरांद्वारे प्रेरित होऊ शकता.

योगा मॅट खरेदी करा I Buy a yoga mat

तुम्ही अशी योगा मॅट खरेदी करा ज्यावर तुम्ही सारी आसने सुलभपणे करू शकाल, ते तुम्हाला आरामदाई वाटेल. चांगली योगा मॅट आसने करताना योग्य प्रकारचा नरमपणा आणि आराम देईल

योगासाठी वेळ नक्की करा I Create a yoga time

जेंव्हा तुम्ही तुमच्याकडे मोकळा वेळ असेल आणि कसलाही अडथळा येणार नाही अशी वेळ योगाभ्यासासाठी निवडणे योग्य होईल. खरेतर सकाळची वेळ सर्वोत्तम आहे  कारण त्यावेळी सारी सृष्टी तुमच्या भेटीसाठी उगवतीला येत असते. तुमच्या थकल्याभागल्या नसांना ताजेतवाने होण्यासाठी आणि पेशी पेशीमध्ये नवा जोम भरण्यासाठी सकाळचा योगाभ्यास तुमच्या ऊर्जेत भर टाकतो आणि दिवसभर चैतन्यदाई राहाल. तथापी सकाळचा वेळ तुम्हाला जमत नसेल तर योग केंव्हाही करणे उत्तम आहे. तुम्ही अगदी ऑफिसमध्ये योग केलात काय आणि संध्याकाळी केलात काय, सकाळच्या सरावाप्रमाणेच आरोग्याचे फायदे तुम्हाला लाभतील हे नक्की.

योगासाठी योग्य जागा नक्की करा I Create a yoga space

स्वतःसाठी योगाची जागा तयार करा. मग ती छतावर असो, बाल्कनीत असो वा सुट्टीच्या दिवशी मोकळ्या मैदानावर असो. अशी ठरविलेली विशिष्ठ जागा आपणास सतत आठवण देत राहील की नियमित, रोज योगाभ्यास करायचाच आहे. जेणेकरून कोणत्याही कारणास्तव योगाभ्यास टाळणे किंवा पुढे ढकलणे, हे घडणार नाही.

योगाभ्यास करताना या गोष्टी टाळा I Don'ts of yoga at home

१. अज्ञानी प्रशिक्षक

२. अवास्तव ताण देणे

३. भरल्या पोटी योग करणे

४. परत परत तेच कपडे वापरणे

५. व्हिडीओ/टीव्ही पाहून योग करणे

अज्ञानी प्रशिक्षक I Amateur trainers

योग हे असे विज्ञान आहे जे तज्ञ प्रशिक्षकांकडून शिकणे योग्य असते. सनसनाटी फसव्या जाहिरातींना बळी न पडता अस्सल आणि अनुभवी प्रशिक्षकाकडूनच योगसाधना शिकत आहात नां, याची खात्री करा.

अवास्तव ताण देणे I Stretching too far

त्वरीत योग शिकण्याच्या, लाभ मिळेल या नादात स्वतःला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त ताण देऊ नये. आपल्या शरीराकडे लक्ष द्या. संथपणे योग करा. कोणताही त्रास जाणवल्यास लगेच आपल्या प्रशिक्षकांना सांगा. पुढील त्रास टाळण्यासाठी पूर्वी काही आरोग्याच्या समस्या असल्यास तसेच काही समस्या निर्माण झाल्यास प्रशिक्षकांशी मोकळेपणाने बोला.

भरल्या पोटी योग करणे I Eating just before yoga

योगाभ्यास सुरु करण्या आधी जड आहार घेणे योग्य नाही. जेवणानंतर आसने आणि प्राणायाम करण्यासाठी दोन ते तीन तासांचे अंतर असणे आवश्यक आहे.

परत परत तेच कपडे वापरणे I Repeating yoga rigs

जिममधील जलद व्यायामापेक्षा योगाभ्यास हा संथ आणि स्थिर प्रकार आहे, तरीही साधकाला घाम येत असतो. म्हणून योग करतेवेळी अस्वच्छ कपडे वापरणे टाळावे, नाहीतर बुरशीजन्य रोगांची बाधा होऊ शकते.

व्हिडीओ/टीव्ही पाहून योग करणे I Video tutorials

योग शिकण्यास सुरुवात करणाऱ्यांनी शिकवणीचे व्हिडीओ/टीव्ही पाहून शिकण्याऐवजी योगाच्या क्लास मध्ये जाऊन योग शिकणे योग्य आहे. तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगा क्लासमध्ये योग शिकल्याने योग तंत्राबद्दल जाणून घेता येईल आणि आपले शरीर, मन आणि चेतनेच्या आरोग्याबध्दल सखोल ज्ञान प्राप्त करून घेता येईल.

योग तुमचे व्यक्तिमत्व आनंदी करण्यास आणि तुमचे व्यावसायिक जीवन सुधारण्यास नक्कीच मदतीचे ठरते. त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल, प्रसन्न राहाल आणि तुम्ही दिसालही छान, असा फायदाच फायदा आहे.

योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे बरेच लाभ होत असले तरीही ते औषधोपचारासाठी पर्याय होऊ शकत नाही. श्री श्री योगा प्रशिक्षकाच्या कुशल मार्गदर्शनाखालीच योगासने शिकणे आणि सराव करणे योग्य आहे. काही आरोग्याच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांचा आणि श्री श्री योगा प्रशिक्षकांच्या सल्ल्यानंतरच योगाभ्यास सुरु करावा. तुमच्या जवळच्या  'आर्टऑफ लिव्हिंगकेंद्रात'श्री श्री योगाकार्यक्रमाबद्दल विचारणा करा. इतर माहितीसाठी तसेच आपले अभिप्राय नोंदवण्यासाठी info@srisriyoga.in वर संपर्क साधा.