पाठ / कंबरदुखी योगाने बरी करा I (Healing lower back pain naturally in Marathi)

पाठीच्या कण्याचा खालचा भाग संपूर्ण शरीराला आधार देतो. दुखापतीमुळे असो किंवा अनेक तास संगणकावर काम केल्यामुळे असो या भागात काही बिघाड झाला तर संपूर्ण शरीर संस्थेच्या कार्यावर परिणाम होतो. असे म्हणले जाते की शंभरातील ऐंशी लोकांना आयुष्यात एकदातरी पाठ दुखी किंवा दुखापत होते. यावर मात करण्यासाठी योगाच्या मदतीने नैसर्गिकपणे कंबर मजबूत बनवू शकतो.

नियमित योगासने केल्याने आपण नैसर्गिकपणे स्वत:ला स्वस्थ आणि बळकट कसे बनवू शकतो ते बघूया.

१ धनुरासन

या आसनाने कंबर आणि पोटाचे स्नायू बळकट होतात. आणि  संपूर्ण पाठीचा कणा लवचिक होतो.

३ नटराजासन

या आसनाने कंबरेचा भाग तसेच मांड्या, पोटाचे स्नायू ताणले जातात आणि मजबूत होतात. तसेच कणा लवचिक बनतो.

 

३ सेतूबंधासन

या आसनाने पाठीचा खालचा भाग / कंबर मजबूत होते आणि पाठदुखी थांबते.

४  मत्स्यासन

याने कंबरेतील दुखणे हलके होते तसेच खुब्यातील सांध्यातील रक्त प्रवाह सुधारतो

 

५  नौकासन

या आसनाने पोट आणि कंबरेतील स्नायू मजबूत होतात.

६   मार्जारासन

या आसनाने पाठीचा खालचा आणि वरचा भाग ताणला जातो आणि संपूर्ण कणा लवचिक बनतो.

 

कंबर दुखण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे बसण्याची चुकीची पद्धत. पाठीला कुबड काढून बसणे आणि खांदे खाली सैल सोडणे यामुळे कंबरेचे स्नायू कमजोर होऊ शकतात. शरीराची चुकीची ठेवण फक्त बसण्यापुरतीच नाही तर तुम्ही कसे उभे रहाता, कसे चालता आणि अगदी कसे झोपता यावरही तुमची पाठदुखी वाढू शकते. हे टाळण्यासाठी शरीराची ठेवण सुधारण्याचा आवर्जून प्रयत्न करणे आवश्यक आहे. पाठीला कुबड काढून बसणे किंवा चालताना पाठीला बाक येणे टाळा.

कामाच्या ठिकाणी अशी खुर्ची घ्या ज्यात तुम्ही ताठ बसू शकाल आणि पाऊल पूर्णपणे जमिनीवर असतील. तसेच दर तासा - दोन तासांनी उठून थोडेसे फिरून या. यामुळे पाठीतील ताण कमी होण्यास  मदत होईल, पायाचे स्नायू ताणले जातील आणि डोळ्यांनाही विश्रांती मिळेल. ऑफिस योग करण्यानेही दुखणे कमी होऊन आरामात काम करता येईल.

आणखी चांगल्या परिणामासाठी योगासने केल्यानंतर २० मिनिटे ध्यान करावे. यामुळे मन शांत होऊन एकाग्रता वाढेल आणि काम चांगले होईल.

पोहणे, रोज नियमितपणे चालणे यानेही पाठदुखी कमी होण्यास मदत होते. पोहण्यामुळे तुमची संपूर्ण पाठ बळकट होते, विशेषत: जेव्हा तुम्ही बॅक स्ट्रोक आणि क्रॉल पद्धतीने पोहता तेव्हा. तर, रोज ३० मिनिटे पोहून तुम्ही पाठदुखीला दूर ठेऊ शकता. चालण्याचा व्यायामही कंबर मजबूत करण्यासाठी अगदी उत्तम आहे. ज्यांना वेळेसाठी खूपच झगडावे लागते त्यांच्यासाठी प्रत्येक जेवणानंतर ५ ते १० मिनिटे चालणे हा चांगला पर्याय होऊ शकतो. चालताना शरीर ताठ ठेऊन चालावे.

स्थूलपणामुळे कंबरेवर दबाव येतो त्यामुळे पाठदुखी होण्याचा जास्त संभव असतो. त्यामुळेच आरोग्यकारक आहार घेणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर नियमित योगासानांबरोबरच आयुर्वेदिक जीवनशैली अंगीकारल्याने कंबरेचे दुखणे आटोक्यात ठेवण्यास मदत होईल.

ही योगासने करण्याने अतिशय फायदा होत असला तरी पाठीचे)कोणतेही दुखणे किंवा स्लीप डिस्क सारखा त्रास असेल तर योगासने करण्याआधी किंवा कोणताही व्यायाम करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

योगसाधनेमुळे शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण तरीही तो औषधास पर्याय नाही. तज्ज्ञ आणि प्रशिक्षित योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने शिकणे आणि करणे महत्वाचे आहे. जर काही व्याधी असेल तर डॉक्टर आणि योग शिक्षक यांचा सल्ला घेऊन आसने करणे चांगले.​