Ajam Nirvikalpam Lyrics with Meaning

अजं निर्विकल्पं निराकारमेकं । निरानंद मानंद मद्वैत पूर्णं ।

परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं । परब्रह्म रूपं गणेशं भजेम ॥१॥

जगत्कारणं कारणज्ञानरूपं । सुरादिं सुखादिं गुणॆशं गणॆशं ।

जगद्व्यापिनं विश्ववंद्यं सुरॆशं । परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥२॥

गुणातीतमानं चिदानंदरूपं । चिदाभासकं सर्वगं ध्यानगम्यं ।

मुनिध्यॆयमाकाशरूपं परॆशं । परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥३॥

साधनेच्या दृष्टीने गणपती हा मूलाधार चक्राचा अधिपती आहे. आदि शंकराचार्य यांनी केलेले गणपतीचे वर्णन हे अतिशय अद्भुत वर्णन आहे. आदि शंकराचार्य यांनी गणपतीच्या स्वरूपाचे जे वर्णन करताना परब्रह्माचे स्वरूप समोर ठेवले आहे.


अजं निर्विकल्पं निराकारमेकं । निरानंद मानंद मद्वैत पूर्णं ।

परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं । परब्रह्म रूपं गणेशं भजेम ॥१॥

अजं निर्विकल्पं निराकारमेकं

म्हणजे गणपती कधी जन्माला आला नाही. तो अज आहे आणि निर्विकल्पं आहे. आणि निराकार आहे. त्याच्यातील चैतन्य एकच आहे जे सर्वव्यापी आहे. ही अनुभूती तेव्हाच येते जेव्हा मूलाधार चक्र जागृत होते. या चैतन्यशक्तीला गणपती मानले गेले आहे. गणपतीचे जे बाह्य रूप, ज्याला आपण ‘गजानना’ समजतो, त्याच्यामागे मोठे रहस्य दडलेले आहे. ज्ञानाचे, विद्येचे अधिपती आहे गणपती. आणि ज्ञान-विज्ञान तेव्हाच उमजते जेव्हा माणूस आंतरिकपणे जागृत होतो. जेव्हा जडत्व असते तेव्हा ज्ञानाचा, विद्येचा अभाव असतो आणि जीवनात चैतन्य किंवा कोणतीही प्रगती नसते. तर जर चैतन्याला जागृत करायचे असेल तर चैतन्याचे अधिदेव आहेत श्री गणेश यांची भक्ती केली पाहिजे. गणपतीला कोणी परके न समजता आपल्या आंतरिक शक्तीचे केंद्र मानले गेले आहे. आपल्या अंतर्मनात गणपतीची स्थापना करा. आपली जी सात चक्रे आहेत त्यातील सर्वात प्रथम चक्र आहे मूलाधारचक्र ज्याचा अधिपती आहे गणपती. त्यावर लक्ष केंद्रित करून ध्यान करण्याची एक प्रक्रिया, एक विधी आहे.

ध्यानं निर्विषय मन - ध्यान करताना मनात काही विषय नसतो – काही बाह्य विषय किंवा स्थूल विषय मनात नसतो. तेव्हा सूक्ष्मविषयाचे अवलोकन केले जाते. निराकार रूप आणि तरी सुद्धा साकार रूप असलेल्या गणेशाची प्रार्थना जी आदि शंकराचार्य यांनी केली ती अतिश्लाघनीय व अतिमधुर आहे. शंकराचार्य म्हणतात.

जे निराकारापर्यंत पोहोचू शकत ते गणेशाच्या साकाररूपाचा आधार घेत हळूहळू निराकारापर्यंत पोहोचू शकतात. जो साकाररुपी गणेश आहे, जो गजवदन आहे, त्याची पूजा करीत करीत निराकार परमात्म असलेल्या गणपतीपर्यंत पोहोचण्याची अद्भुत कला आपल्या भारतात आहे.

परब्रह्म रूपं गणेशं भजेम

अशा गणेशाचे पूजन करा जो सर्वव्यापी आहे.


जगत्कारणं कारणज्ञानरूपं । सुरादिं सुखादिं गुणॆशं गणॆशं ।

जगद्व्यापिनं विश्ववंद्यं सुरॆशं । परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥२॥

जी चैतन्यशक्ती या समस्त संसाराचे मूळ कारण आहे, ज्यातून सर्वकाही निर्माण झाले आहे, ज्यामध्ये सर्वकाही टिकून आहे आणि ज्या शक्तीमध्येच सर्वकाही विलीन होणार आहे ती कारणरुपी शक्तीच परमात्मा, परब्रह्मस्वरूप श्री गणपती आहे.

जगत्कारणं कारणज्ञानरूपं

या जगताच्या कारणाविषयी जाणून घेणे हेदेखील एक ज्ञान आहे. ते सूक्ष्म ज्ञानसुद्धा गणेश आहे. ज्ञातासुद्धा तोच आहे आणि ज्ञानसुद्धा तोच आहे. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे तीन भाग असतात. आपण गणपतीची ज्ञेय बनून पूजा करतो. ही उत्तम पूजा नव्हे. ज्ञेयवस्तू म्हणजे बाहेरची वस्तू होय. यात आत्मज्ञान अनुपस्थित असते. द्वैताची दृष्टी उपस्थित असते. कारण हे ज्ञानरुपी आहे. ते म्हणजे बघणाराच ते चैतन्य आहे.

हे ज्ञान सर्वांना समजण्यायोग्य नाही असे ऋषीमुनींच्या ध्यानात आले. निरनिराळ्या स्तरातील लोकांकरिता निरनिराळ्या कहाण्या बनविल्या गेल्या. ही केवळ लोकांना समजावण्याची एक पद्धती ज्यायोगे प्रत्येकाचा काही फायदा होईल.

सर्वात प्रथम गणपतीची मूर्ती बनवितात. मग त्यामुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतात. म्हणजे, “माझे प्राण, माझा जीव यातील गणपती थोडाकाळ या मूर्तीमध्ये येऊन स्थापित होवो. म्हणजे मग आम्ही थोडा वेळ यांच्याबरोबर खेळू शकू, पूजा करू शकू.” पूजा तर एक खेळच आहे. पूजा म्हणजे आपल्या मनातील भाव व्यक्त करण्याची एक अद्भुत कला होय. एका भक्ताला देवाबरोबर खेळायची इच्छा आहे. भक्त कधी मागणी करत नाही. जर भक्ताने मागणी केली तर त्याची मागणी ही त्याच्या भक्तीपेक्षा मोठी होऊन जाते. म्हणूनच भक्ताला केवळ ईश्वरच हवा असतो, नाहीतर मग त्याला प्रभूबरोबर थोडेसे खेळायचे असते.

आपल्या आत असलेली ती निर्गुण निराकारअनंत शक्ती आहे त्या शक्तीला साकाररुपात खेळण्याकरिता आवाहन करतात ती गणपतीची पूजा होय. गणपतीची मूर्ती मातीने बनविली आणि मग म्हणतात, ‘गणपतीचे प्राण, माझे प्राण. त्याचा जीव, माझा जीव’. मग प्रार्थना करतात, “हे प्रभू, जो सदैव माझ्या आत असतो थोडा काळ या मूर्तीमध्ये येऊन स्थापित व्हावे. कारण माझी तुझ्याबरोबर खेळण्याची इच्छा आहे. जे तू माझ्याबरोबर केलेस, माझ्यावर मेहरबानी केलीस त्या सर्वाचे मी तुला प्रदर्शन करू इच्छितो.” ईश्वराने आपल्याला पाणी दिले आपण देवाला पाण्याचा अभिषेक करतो, देवाने आपल्याला फळे दिली तर आपण देवाला फळाचा नेवैद्य दाखवतो, फुले दिली तर आपण फुले वाहतो, सूर्य आणि चंद्राने देव नित्य आपली आरती करीत असतो त्याप्रमाणे आपणसुद्धा एक कापूर जाळून देवाला ओवाळून आरती करतो. याप्रकारे एक भक्त आपल्या आतील भाव व्यक्त करतो अशा प्रकारे पूजेचा विधी असतो. पूजा झाल्यानंतर भक्त म्हणतो, “हे ईश्वरा, आता पुन्हा माझ्या आतमध्ये स्थापित व्हावे.” यालाच विसर्जन असे म्हणतात. ‘विशेष प्रकारे पुन्हा सृजन करणे म्हणजेच विसर्जन होय.’

भक्त म्हणतो, “माझे हृदयकमल जिथून तू आगमन केलेस तिथे आता तू पुन्हा विराजमान व्हावेस.” जसे सणासुदीला दागिन्यांना तिजोरीतून काढून घालतात आणि मग पुन्हा त्यांना तिजोरीत ठेऊन देतात. त्याच प्रकारे एक अमूल्य ज्ञान, एक अमूल्य रत्न, एक अमूल्य तत्त्व जे आपल्या आत दडलेले आहे त्या चेतनेला एका खेळाच्या रूपाने जीवनात आनंदोत्सव साजरा करण्याची प्रक्रिया आहे हा गणेशोत्सव!

तर मग पूजा केल्यानंतर ती मूर्ती असते तिला घेऊन जाऊन विसर्जित करतात. हे तर चांगल्या प्रकारे माहिती असून की ईश्वर केवळ मूर्तीमध्येच नाहीतर तो सर्वव्यापी आहे आणि त्या सर्वव्यापीला साकाररुपात प्राप्त करून त्या साकाराचा सुद्धा आनंद घेण्याचा सण आहे गणेशोत्सव. अशाप्रकारच्या सणांमुळे जीवनात उत्साह आणि भक्ती स्फुरण पावते. नारदमुनी म्हणतात,

पुजाविश्व अनुराग इति पाराशरया

नारदभक्ती सूत्रामध्ये उल्लेख आहे की पराशर ऋषीनुसार, पूजेमध्ये आसक्ती ठेवणे, अनुराग ठेवणे हे भक्तीचे एक लक्षण आहे. म्हणून पूजा करा पण कोणत्या भयाने नाही किंवा कोणत्या लोभाने नाही तर प्रेमाने, भक्तीने करा. बाह्य पुजेपेक्षा मानसिक पूजा श्रेष्ठ आहे. मानसिक पूजेबद्दल आदि शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे अद्वैत चैतन्य शक्तीलाच गणपती मानले. आणि ती गणपती शक्ती जगताचे कारणरुपी आहे.

जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं सुखादिं गुणॆशं गणॆशं

समस्त खऱ्या सुखाची सुरुवात ही या चैतन्यापासून आहे. आपला प्रत्येक कण न कण जेव्हा चैतन्याने भरून जातो तेव्हा जो आनंद ओसंडून वाहू लागतो ती बाहेर दाखवण्यासारखी प्रसन्नता नाही. वरवरचे हसणे ते काही कामाचे नाही. पण ती आंतरिक प्रसन्नता आहे जी सर्व सुखाची सुरुवात आहे. आनंद, उत्साह, प्रेम आणि अशाप्रकारच्या सर्व सकारात्मक भावनांचे स्फुरण तिथूनच होते. सर्वगुणांचा सुद्धा तो स्वामी आहे. आपले आत्मचैतन्य हे गुणांचेसुद्धा अधिपती आहेत. सगळे चांगले गुण आपण हे अभ्यास करून आत्मसात करतो असे म्हंटले तर ते कधीच शक्य होणार नाही. आपल्याला असे मानून चालले पाहिजे की ते सर्व चांगले गुण आपल्यात आहेतच आणि जे दुर्गुण आहेत ते बाहेर आलेला मळ आहे. साधनेमुळे अवगुण नाहीसे होतात. गुण तर आधीपासून आहेतच ते अधिक उजळून निघतात. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा दैवासुर संपत्तीभाग्ययोग मध्ये अर्जुनाला सांगितले, ‘हे अर्जुना, सगळेदैवी गुण तर तुझ्यात आधीपासून आहेतच.’ तर हे मानून चला की तुमच्यात सगळे दैवी गुण आहेत, आणि त्या गुणांचे अधिपती आहे गणपती जो लपून आहे. आता गणपतीची आराधना केल्याने सर्व सद्गुण विकसित व्हायला लागतात.

जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परं ब्रह्मरूपं गणेशं भजेम

संपूर्ण जग तुझ्या अस्तित्वाने व्यापलेले आहे. हे गणपती, प्रत्येकजण तुला पूजितो, जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुझ्यावर श्रद्धा ठेवणारे लोक आहेत. प्रत्येक देशात ईश्वराला निराकार म्हणून मानले जाते. गुणाचे दैवत म्हणून मानले जाते. अशाप्रकारे समस्त जगात तू वंदनीय आहेस. तू परब्रह्मच आहेस.


गुणातीतमानं चिदानंदरूपं । चिदाभासकं सर्वगं ध्यानगम्यं ।

मुनिध्यॆयमाकाशरूपं परॆशं । परब्रह्मरूपं गणॆशं भजॆम ॥३॥

गुणातीतमानं

सर्व गुणांच्या तू पलीकडे आहेस.

चिदानंदरूपं

गणेशाचे स्वरूप कसे आहे? ते आहे सच्चिदानंद आहे. मस्ती आहे, आनंद आहे.

गुणातीतमानं चिदानंदरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम्

ते चैतन्य असेल तरच गणपतीची अनुभूती होऊ शकते. आपल्या स्व: मध्ये थोडी फार जरी जागृती झाली तर आपण त्याला ओळखू शकतो. जड बुद्धी असलेल्यांना तो ओळखू येत नाही.

चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम्

सर्वत्र तो व्याप्त आहे आणि तो केवळ ज्ञानानेच ओळखू येऊ शकते. अशा या महागणपतीला विद्येचा अधिपती म्हणून मानले जाते. कोणतीही पूजा असली तरी पहिला पूजेचा मान गणपतीचा असतो. म्हणजे गणेशतत्त्वाला सर्वप्रथम आपल्या आत जागृत करा. तमोगुणाला सोडून देऊन सत्त्वगुणाकडे जायचे आहे. हा पूजेचा प्रथम चरण आहे.

मुनिध्येयमाकाशरूपं परेशं

तुमचे खरे स्वरूप काय आहे? तर ऋषीमुनी जेव्हा ध्यान करतात तेव्हा त्यांच्या ध्यानचित्तामध्ये जे निरंजन निर्विकल्प आकाश आहे ते चिदाकाश तूच आहेस. तू वस्तू नाहीस, व्यक्ती नाहीस.तू चिन्मयता आहेस, चिदाकाशच आहेस असे आदि शंकराचार्य म्हणतात.

तुझे रुप काय आहे? ऋषीमुनी ज्याचे ध्यान धरतात तो आकाशरूपी तू आहेस, सर्वव्याप्तआहेस. हेच तुझे खरे रूप आहे.

परेशं परं ब्रह्मरूपं गणेशं भजेम

त्या परब्रह्मरुपी गणेशाला मी वारंवार पूजीन, भजीन आणि वारंवार वंदन करेन.

अशाप्रकारे मूर्तीला समोर ठेवा, प्रेमाने तिची पूजा करा आणि मग ध्यानस्थ व्हा. डोळे बंद करून आपल्या आत त्या गणेशतत्त्वाला अनुभवणे हेच पूजेचे रहस्य आहे. हे गणेश चतुर्थीच्या सणाचे फळ आहे ज्यामध्ये आपण आपल्या आत दडलेल्या चेतनेला जागृत करतो.