सूर्यनमस्कार व त्याचे फायदे (Benefits of surya namaskar in Marathi)

सूर्याशिवाय सजीव सृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा दाता हा सूर्यच. सूर्यनमस्कार हा एक १२ आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम आहे. हा योगाभ्यास शरीर, मन व श्वासाला एकत्र आणतो. ध्यानात जाण्याची ती पहिली पायरी आहे.

वार्म-अप व योगासने यांना सांधणारा हा एक चांगला दुवा आहे. रिकाम्या पोटी हा कधीही केला तरी चालतो. तथापि सकाळची वेळ यासाठी सर्वोत्तम असते कारण त्यामुळे तुमच्या शरीराचे पुनरुज्जीवन घडते व मन प्रसन्न होते. पुढील दिवसाला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज होता. दुपारी केल्यास शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. संध्याकाळी केल्यास आराम मिळण्यास मदत होते. सूर्यनमस्कार जलद केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते व वजन कमी होण्यास मदत होते.

दिवसाची सुरुवात सूर्यनमस्कारने का करावी?

सूर्यनमस्कार ऊर्जादायी, ध्यानदायी व आरामदायी असतात. ते शरीराला लवचिक बनवतात व त्यांमुळे रक्ताभिसरण सुधारते. चांगले रक्ताभिसरण झाल्यास केस पांढरे होत नाहीत, ते गळत नाहीत, त्यांत कोंडा होत नाही व त्यांचे आरोग्य सुधारते. शरीरातील महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते. आपल्या अस्थिसंस्था व पचनसंस्था सुधारतात. त्याबरोबरच वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांचे संतुलन साधले जाते.

 

 

मुलांनी सूर्यनमस्कार का घालावेत?

सूर्यनमस्कार केल्याने मन शांत व एकाग्र बनते. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात, सूर्यनमस्कार हे मुलांच्या दिनक्रमाचा एक भाग असावेत. त्यामुळे सहनशक्ती वाढते व चिंता आणि अस्वस्थपणा कमी होतो, मुख्यतः परीक्षेच्या कालावधीत. सूर्यनमस्कारांचा नेहमी सराव केल्यास शारीरिक ताकद व जोम वाढतो. भावी खेळाडूंसाठी हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. ज्यामुळे स्नायूंची शक्ती तसेच मणका व इतर अवयवांची लवचिकता वाढते. अगदी पाच वर्षांचे मुल देखील रोज सूर्यनमस्कार करणे सुरु करू शकते.

स्त्रियांनी सूर्यनमस्कार का घालावेत?

असे म्हणतात की जे कित्येक महिने डाएटिंग करून होत नाही, ते सूर्यनमस्कारांनी साध्य होते. स्वास्थ्याविषयी जागरूक असणाऱ्या महिलांसाठी हे एक वरदानच आहे कारण सूर्यनमस्कारांनी जास्तीचे उष्मांक तर वापरले जातातच परंतू पोटाच्या स्नायूंना ताण पडल्याने शरीर सहजगत्या सोप्या व स्वस्त पद्धतीने सुडौल बनते. सूर्यनमस्कारांतील काही आसनस्थिती ग्रंथीचे, जसे कंठग्रंथीचे (जी वजन नियंत्रित करते), कार्य सुधारतात व संप्रेरकांचा स्त्राव वाढल्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतात. मासिक पाळीतील अनियमितता देखील सूर्यनमस्कारांनी नियमित होते. सुलभ प्रसूतीसाठी सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कारांनी तुमचा चेहरा सतेज तर राहतोच पण सुरकुत्या पडण्यास प्रतिबंध होऊन तुम्ही चिरतरुण व उत्साही राहता.

सूर्यनमस्कारांनी अंतर्ज्ञान क्षमता विकसित करा

आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर एका देवतेचे नियंत्रण असते असे प्राचीन ऋषी मानत. आपली नाभी सूर्याशी जोडली आहे. म्हणून योगी सूर्यनमस्कार सकाळी करण्यास सांगतात. यावेळी व्हिटामिन ‘डी’ देणारे सूर्यकिरण नाभीवर पडतात. सूर्यनमस्कार व ध्यानाच्या नियमित सरावाने नाभीचा आकार बदामाच्या आकारापासून ते हाताच्या तळव्या इतका होऊ शकतो. नाभीचे हे प्रसरण, ज्याला दुसरा मेंदू म्हणतात, तुमची अंतर्ज्ञान क्षमता आणि स्पष्टता व केंद्रित दृष्टीकोन वाढवते. याविरुद्ध नाभीचे आकुंचन होणे म्हणजे नैराश्य व नकारात्मक विचारांनी घेरले जाणे.

सूर्यनमस्कारांच्या बहुविध फायद्यांमुळे शरीर आरोग्यदायी व मन शांत होते. म्हणूनच त्यांचा नियमित सराव करावा असे योगतज्ञांचे म्हणणे आहे. येथे सांगितलेल्या सूर्य नमस्कारासाठीच्या युक्त्या तुमचा सराव सुधारतील व त्याचे चांगले परिणाम दिसतील.

 

योगाभ्यासाने शरीर व मनाचे स्वास्थ्य खूपच सुधारत असले तरी ती औषधांना पर्यायी होऊ शकत नाहीत. योगासने ही श्री श्री योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच शिकली पाहिजेत. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपचार घेणाऱ्या व्यक्तींनी योगासने डॉक्टरांचा व श्री श्री योगशिक्षकांच्या सल्ल्यानंतरच करावीत. आपल्या भागातील जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रावर श्री श्री योग शिबिर कधी आहे ते शोधा. अभ्यासक्रमांविषयी माहिती हवी असेल अथवा तुम्हाला काही सांगायचे असेल तर ह्या इमेल आयडी वर लिहा: info@srisriyoga.in