सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नका किंवा खाऊ नका! सूर्यग्रहण संपल्यावर आंघोळ करून स्वयंपाक करावा! सूर्यग्रहण काळात घराबाहेर पडू नका! असे काही नियम पाळायचे आहेत का? सूर्यग्रहण काळात काय करावे? या वैश्विक घटनेसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती येथे देत आहोत.
सूर्यग्रहण म्हणजे काय?
ज्यावेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे सर्व एका रेषेत असतात, चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि त्यामुळे पृथ्वीवर सावली पडते. यामुळे सूर्याचे आंशिक किंवा पूर्ण ग्रहण होते. या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात.
तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीतरी ग्रहणाबाबत काही आगाऊ सूचना ऐकल्या असतील. आता, हे शक्य आहे की तुम्हाला सांगितलेल्या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांपैकी तुम्ही एक असाल किंवा या कल्पनांना जुन्या आजीबाईंच्या दंतकथा म्हणून नाकारणाऱ्यांपैकी एक असाल.
पण, या कल्पनांमागील सत्य काय आहे? त्या दंतकथा आहेत की त्यांना काही वैज्ञानिक आधार आहे? चला, जाणून घेऊया.
सूर्यग्रहण : सत्य की दंतकथा?
सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण १० जून २०२१ रोजी आहे. याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात कारण चंद्र सूर्यापासून जितक्या अंतरावर आहे तितक्या अंतरावर त्याचा व्यास सूर्याच्या व्यासापेक्षा लहान दिसतो. यामुळे सूर्याचा बराचसा प्रकाश रोखला जातो आणि सूर्य कंकणासारखा गोल दिसतो. ही घटना पश्चिम आणि पूर्व आशिया, भारत आणि पाकिस्तानच्या अनेक भागांमधून दिसून येईल.
सूर्यग्रहणांबाबत तुम्ही ऐकलेल्या काही सामान्य सूचना येथे आहेत: हे एक-एक करुन सत्य किंवा दंतकथा आहे हे तपासूया.
१. ग्रहणाच्या आधी आणि नंतर स्नान करावे
अंशतः सत्य.
सूर्यग्रहणानंतर गर्भवती महिलांना थंड पाण्याने स्नान करण्याचा सल्ला दिला जातो. हे सूक्ष्मजीवांच्या वाढीच्या कोणत्याही हानिकारक प्रभावापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आहे. थंड पाणी व्हॅगस मज्जातंतूला (हे व्हॅगस मज्जातंतू म्हणजे मेंदू व ओटीपोट जोडणारे) उत्तेजित करण्यास मदत करते, याचा संबंध विश्रांती आणि पचन प्रणाली किंवा पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्थेशी असतो. त्यामुळे पचनास मदत होते. मनाला व शरीराला आराम मिळतो.
२. ग्रहण लागण्याच्या किमान दोन तास आधी जेवावे
सत्य.
याची दोन कारणे आहेत.
सूर्याची नील आणि अतिनील किरणे नैसर्गिक जंतुनाशक म्हणून काम करतात. ग्रहणाच्या वेळेस असे घडते की सूर्यग्रहणाच्या वेळी त्यांची तीव्रता आणि तरंगलांबी इतर दिवसांसारखी नसते. परिणामी, ते किरण अन्न स्वच्छ करण्याची त्यांची नेहमीची भूमिका पार पाडत नाहीत आणि अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची अनियंत्रित वाढ होते. ही अतिरिक्त आणि नैसर्गिक संरक्षणात्मक यंत्रणा उपलब्ध नाही हे लक्षात घेता, सूर्यग्रहणाच्या किमान दोन तास आधी आपण खाणे थांबवावे असा सल्ला दिला जातो.
सूर्यग्रहणाच्या आधी आपण काय खाऊ शकतो याबद्दल काही सल्ले –
- हलके, सहज पचणारे शाकाहारी अन्न खाणे चांगले.
- अन्नात हळदीचा वापर करा कारण त्यात जीवाणूरोधक गुणधर्म आहेत.
त्याचप्रमाणे, सूक्ष्मजीवांच्या अनियंत्रित वाढीच्या शक्यतेमुळे तुम्ही ग्रहण काळात पाणी पिणे देखील टाळावे. पृथ्वीवरील सर्व जीवनाचा आणि उर्जेचा स्रोत सूर्य आहे. त्यालाच ग्रहण असल्याने शरीरातील सुद्धा उर्जेची पातळी कमी होते. यामुळे पचनक्रियाही मंदावते, यावेळी खाणे टाळण्याचे हे आणखी एक कारण आहे.
अपवाद :
तुम्ही गरोदर असाल, म्हातारे असाल, आजारी असाल किंवा तुमची वारंवार सजलीकरणाची (हायड्रेशनची) गरज भासणारी विशेष परिस्थिती असेल, तर तुम्ही उकळून थंड केलेले पाणी पिऊ शकता. त्यात तुळशी अर्क (एक वनौषधी जी सामान्यतः खोकला आणि सर्दीसाठी वापरले जाते) घालू शकता. त्याच्या विषाणूरोधी (अँटीव्हायरल) गुणधर्मांमुळे, तुमचे रक्षण होईल. मनुका, सुका मेवा खाऊ शकता. तुमची ऊर्जा वाढेल.
३. सूर्यग्रहण संपल्यानंतर शिजवलेले ताजे अन्न खावे
सत्य.
उरलेले अन्न ग्रहणादरम्यान सूर्याचे किरणोत्सर्ग शोषून घेऊ शकते. हे किरणोत्सर्ग हानिकारक असतात आणि अश प्रकारे ते अन्न दूषित होऊ शकते. त्यामुळे ग्रहण सुरु होण्यापूर्वी केलेले व उरलेले अन्न साठवून न ठेवणे हेच चांगले. ग्रहण संपल्यानंतर ताजे अन्न तयार करणे उचित आहे.
सूर्यग्रहणाच्या वेळी तुम्ही दह्यासारख्या आंबवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये दर्भ गवत (देस्मोटाच्य बिपिनता) ठेवू शकता. कारण दर्भ गवत हे नैसर्गिक जंतुनाशक आहे. ग्रहण संपल्यावर ते काढू शकता. वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की हे गवत हानिकारक रासायनिक संरक्षकांच्या जागी अन्न संरक्षक (टिकवून ठेवणारे) म्हणून देखील वापरले जाऊ शकते.
४. ग्रहण काळात थेट सूर्याकडे पाहणे टाळावे
सत्य.
सूर्याकडे थेट पाहणे योग्य नाही. ग्रहण काळात असे केल्याने डोळ्यांना कायमची इजा होऊ शकते. या वेळी सूर्याच्या किरणांच्या तीव्रतेमुळे डोळ्यातील पेशींना इजा होऊ शकते. दृष्टीपटल जाळून जाऊ शकतो.
तुम्ही प्रमाणित चष्म्यातून ग्रहण पाहू शकता, जे नियमित गॉगलपेक्षा हजारपट गडद असतात. उघड्या डोळ्यांनी थेट सूर्याकडे पाहण्याऐवजी तुम्ही प्रक्षेपित किंवा परावर्तित प्रतिमा देखील पाहू शकता. तुम्ही दुर्बिणी आणि दूरदर्शक यंत्र यांसारखे दृक विवर्धक (व्हिज्युअल मॅग्निफायर) पूर्णपणे टाळले पाहिजेत.
५. ग्रहण काळात घराबाहेर जाणे टाळावे
दंतकथा.
याला कोणताही शास्त्रीय आधार नाही किंवा आयुर्वेदात असे कोणतेही बंधन नाही. तथापि, गर्भवती महिलांनी जन्माला येणाऱ्या अपत्याच्या आरोग्यासाठी घरातच राहून जप आणि ध्यान करणे अधिक श्रेयस्कर आहे. ध्यान आणि नामजपाच्या सकारात्मक कंपनांचा बाळाच्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
गरोदर महिलांसाठीच्या सामान्य मार्गदर्शक तत्वांमध्ये असलेल्या दंतकथा आणि सत्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, येथे वाचावे.
६. सूर्यग्रहणाच्या वेळी ध्यान करावे
सत्य.
दररोज ध्यान करणे ही एक चांगली सवय आहे, विशेषतः सकाळी आणि विशेष करुन सूर्यग्रहणाच्या वेळी ध्यान अवश्य करावे. कारण मनाचा चंद्राशी आणि शरीराचा पृथ्वीशी संबंध असतो. सूर्य हा मन आणि शरीर या दोन्हींशी जोडलेला असल्यामुळे, जेव्हा तिन्ही खगोलीय पिंड एका सरळ रेषेत येतात, तेव्हा शरीराचे मनाशी एकत्रिकरण होते. त्यामुळे ध्यान करण्याकरिता ही योग्य वेळ असते.
तसेच, सूर्यग्रहणाच्या वेळी काहीही खाऊ नये असे सांगतात, कारण पोट रिकामे असणे हे ध्यानासाठी अनुकूल असते. शक्ती आणि ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असलेल्या सूर्याच्या ग्रहणामुळे तुमची ऊर्जा पातळी नैसर्गिकरित्या कमी होते. ध्यान केल्याने तुमची उर्जा पातळी देखील वाढते.
सूर्यग्रहणाच्या वेळी निसर्ग स्वतःची काळजी घेतो असे म्हणतात. असे म्हटले जाते की गाणारे पक्षी गाणे थांबवतात आणि काही फुलांच्या पाकळ्या मिटतात. जसे निसर्गाने या प्राण्यांना स्वतःची काळजी घेण्यास शिकवले आहे, त्याप्रमाणे मानवांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे शहाणपणाचे ठरेल. ध्यान आणि नामजप याद्वारे ‘स्व’सोबत जोडले जाण्याकरिता ही तुमच्यासाठी योग्य वेळ असू शकते.
मनःशांती देणारे ऑनलाइन मार्गदर्शित ध्यान करा. विश्रांती आणि आरामाच्या नवीन स्तरांवर पोहोचा.
पुढील ग्रहणाच्या तारखा आणि वेळेबद्दल जाणून घ्या :
सूर्यग्रहणाचा तपशील
तारीख: २९ मार्च २०२५
सुरूवात वेळ: दुपारी ०२:२१
समाप्ती वेळ: सांय ०६:१४
आंशिक चंद्रग्रहण तपशील
तारीख: १३ मार्च २०२५
सुरूवात वेळ: रात्री ११:००
तारीख: १४ मार्च २०२५
समाप्ती वेळ: सकाळी ०५:००
चंद्रग्रहण तपशील
तारीख: ०७ सप्टेंबर २०२५
सुरूवात वेळ: रात्री ११:३१
तारीख: ०८ सप्टेंबर २०२५
समाप्ती वेळ: सकाळी ०४:१५
*टीप: वरील तपशील भारतीय प्रमाण वेळेच्या संदर्भानुसार आहे.
जर तुम्हाला सूर्यग्रहण आणि नक्षत्रांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर या सूर्यग्रहणाचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे हे जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा!
(डॉ. मिताली मधुस्मिता, वरिष्ठ आयुर्वेदिक डॉक्टर, श्री श्री तत्व, पंचकर्म- यांनी दिलेल्या माहितीवर आधारित)
आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.











