वृद्धत्व ही एक अपरिहार्य नैसर्गिक घटना आहे. ज्यांना तरुण कसे राहायचे हे जाणून घ्यायचे आहे त्यांनी योग, ध्यान आणि आयुर्वेदाचा सराव करण्याचा विचार करावा. शरीराचे आरोग्य चांगले राखण्याचे हे नैसर्गिक मार्ग आहेत.
या प्राचीन शास्त्रातील काही वृद्धत्व-प्रतिबंधक टिप्स येथे दिल्या आहेत, ज्यामुळे वृद्धत्व कमी होऊ शकते आणि तुम्हाला तरुण वाटू शकते.
१. योग आणि प्राणायाम
योग आणि प्राणायाम शरीर आणि मनासाठी खूप फायदेशीर आहेत. येथे काही वृद्धत्व-प्रतिबंधक योगासने आणि प्राणायाम आहेत जे तुम्ही नियमितपणे करु शकता.
सिंहासन
- चेहरा आणि छातीच्या भागातील ताण कमी होतो.
- थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारण्यासाठी उत्तम.
- हे आसन प्लॅटिस्मा (घशातील एक पातळ स्नायू) उत्तेजित करते आणि वृद्धत्वाच्या प्रक्रियेदरम्यान त्याचा घट्टपणा टिकवून ठेवण्यास मदत करते.
- सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. लवकर म्हातारपण येत नाही.
मानेला ताण देणे
- मानेवरील अतिरिक्त चरबी कमी होते.
- मानेचे स्नायू झिजत नाहीत.
- वयोमानानुसार येणारा कडकपणा दूर होतो, त्यामुळे मान आणि खांद्याच्या हालचाली आरामदायी होतात.
हस्तपादासन

- पाठीचा कणा लवचिक राहतो. वृद्धपणी कण्यात येणारा ताठरपणा येत नाही.
- मज्जासंस्थेला ऊर्जा मिळते.
वीरभद्रासन

- हात, कंबर आणि पाय बळकट होतात. शरीर सुडौल होते.
अधोमुख श्वानासन

- रक्ताभिसरण सुधारते.
- बहुतांश वेळा वयानुसार पचनक्रिया मंद होत असते, या आसनामुळे पचनक्रिया सुधारते.
- वयानुसार कमकुवत होणारे अवयव सुडौल होतात.
- चिंता कमी होते.
धनुरासन

- वयोमानानुसार कमकुवत होणाऱ्या हाताच्या आणि पायांच्या स्नायूंना बळकटी देते.
- मज्जासंस्थेचा संवेदनशील भाग उत्तेजित होतो. शरीराला ऊर्जा मिळते.
- पाठीचा कणा बळकट होतो, तसेच त्याला विश्रांती मिळते.
कपालभाती प्राणायाम

- डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि काळी वर्तुळे दूर होतात.
- मेंदू पुनरुज्जीवित होतो आणि नसांना ऊर्जा मिळते.
- मन शांत होते आणि स्मरणशक्ती सुधारते.
- शरीरात प्राणशक्ती (जीवन ऊर्जा) वाढते.
- चेहऱ्यावर तजेला येतो.
२. ध्यानधारणा करा आणि तरुण राहा
ताणतणावामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने होते,लवकर म्हातारपण येते असे संशोधनातून दिसून आले आहे. ताण कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे नियमितपणे ध्यान करणे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की नियमितपणे ध्यान केल्याने आपल्या गुणसूत्रांचा ऱ्हास होण्यापासून संरक्षण मिळते आणि त्यामुळे म्हातारपण येण्याची प्रक्रिया नियंत्रणात राहते.
३. म्हातारपण लवकर येऊ नये म्हणून योग्य आहार घ्या
तरुण राहण्याच्या रहस्यातील सर्वात मोठे गुपित म्हणजे योग्य आहार. प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की अन्नाचा परिणाम थेट मनावर होत असतो. ताजी फळे खाल्ल्याने तुमच्या मनावर आणि शरीरावर जो परिणाम होतो तो भरपूर चीज व पिझ्झा खाण्याने होणाऱ्या परिणामापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. त्याचप्रमाणे, शरीराला आयुर्वेदिक आहार जे देऊ शकतो ते तळलेले अन्न खाल्ल्याने मिळू शकत नाही. योग्य आहाराची निवड केल्याने तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहाल हे निश्चित!
आयुर्वेदिक स्वयंपाक हा परिपूर्ण आहार असतो. तो पोषक तत्वांनी समृद्ध असतो आणि शरीराला सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करतो. आयुर्वेदिक अन्नामध्ये प्राण किंवा जीवनऊर्जा जास्त असते आणि असे अन्न शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ते अन्न आरोग्यदायी आणि पचण्यास हलके असते.
निरोगी आहाराबद्दलच्या टिप्स
- पालक आणि मेथी या सारख्या हिरव्या व तंतुमय पालेभाज्या खाव्यात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
- ब्रोकोली, मुळा आणि काकडी या सारख्या भाज्या, ज्यात पाण्याचा अंश जास्त असतो, आहारात ठेवा. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.
- कडुलिंब आणि तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्त शुद्ध होते आणि त्वचा स्वच्छ आणि नितळ राहते.
४. तरुण राहण्यासाठी जीवनशैली बद्दलच्या टिप्स
खाण्याच्या चांगल्या सवयी, पुरेशी झोप, व्यायाम आणि विश्रांती यांचा समावेश असलेल्या अशा काही बदलांचा जीवनशैलीमध्ये विचार करणे महत्वाचे आहे.
- शरीर सजल (हायड्रेटेड) राहण्यासाठी पाणी भरपूर प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि चेहऱ्यावर तेज येते.
- काम करत असताना, हात आणि पाय ताणून मोकळे करण्यासाठी दोन मिनिटांचा नियमित ब्रेक घ्या. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायू ताठर होत नाहीत.
- कॉम्प्युटर आणि मोबाईल खूप वेळ वापरत असाल तर मधे मधे डोळ्यांना थोडी विश्रांती द्या.
- ६ ते ८ तासांची झोप घेतल्याने तुम्ही दिवसभर सक्रिय राहू शकाल.
- मनातूनही तरुण वाटणे महत्त्वाचे आहे. स्वाभाविक राहा, ध्येये निश्चित करा आणि आनंदी राहा.
बाह्य सौंदर्याकडून आंतरिक सौंदर्याकडे वाटचाल
सुंदर दिसण्याची एक वेगळीच मोहिनी असते, परंतु सौंदर्य हे केवळ सुंदर दिसणे, सुंदर कांती यापुरतेच मर्यादित नसते. निरोगी शरीर, शांत मन आणि निरंतन हास्य यातच खरे सौंदर्य आहे. यातून तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची गुणवत्ता वाढते.
आपण वृद्ध होणे कायमचे थांबवू शकत नाही परंतु खबरदारी घेऊन आणि चांगली जीवनशैली स्वीकारुन आपण वृद्धत्व निश्चितपणे लांबवू शकतो!
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या फॅकल्टी सदस्य डॉ. शिल्पा सभरवाल आणि मीना वाघरे यांच्या माहितीवर आधारित.
प्रशिक्षित शिक्षकाकडून योग नक्की शिका! श्री श्री योग कार्यक्रमात प्रशिक्षित शिक्षकाकडून तुम्ही वृद्धत्वाला प्रतिबंध करणारी योगासने शिकू शकता.