व्यसनाधीनतेकडून समाजसेवेकडे - पुरुषोत्तम वायाळ

“अच्छा काम हो रहा है- बहोत अच्छा काम करो, और भी अच्छा काम होगा”

गुरूदेवांचा हाच आशीर्वाद, हाच आदेश आणि हेच मार्गदर्शन घेऊन वाटूर गावचे डॉ.पुरुषोत्तमजी वायाळ यांनी त्यांचा जालना जिल्हा आणि मराठवाडाभर आर्ट ऑफ लिव्हींगचे सेवाकार्य सुरु केले, येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि युवकांची व्यसनाधीनता रोखण्यासाठी प.पू. श्री श्री रविशंकरजीनी ‘प्रोजेक्ट विदर्भ’ सुरु केला. या प्रकल्पाला पुढे नेत पन्नासभर युवाचार्यांच्या सहाय्याने १२० खेड्यांमध्ये ‘श्री श्री किसान मंच’ची स्थापना केली. या मंचच्याद्वारे स्थानिक शेतकऱ्यांना जल साक्षरता, नैसर्गिक शेती, शून्य खर्चाधारित शेती, शेती पूरक व्यवसाय, महिला सक्षमीकरण, कोरड्या नद्यांचे पुनरुज्जीवन, देशी गायीचे महत्व, जल जागृती अभियान इत्यादी प्रकल्पांची सुरवात, यांचे प्रशिक्षण देण्याचे कार्य पुरुषोत्तमजी करत आहेत. याद्वारे पाच हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन सुपीक बनली आहे. तीन नद्यांचे पुनरुज्जीवन झाले.. युवकांचे शहराकडील स्थलांतर रोखले.

“हे सर्व घडले आहे निव्वळ गुरुजींचे मार्गदर्शन आणि आशिर्वादामुळे. बेंगलोर आश्रमामध्ये माझ्या पहिल्या अॅडव्हांस कोर्स दरम्यान समक्ष भेटीत गुरुजींनी ‘बहोत अच्छा काम करो’ आशिर्वाद दिला आणि गुरुदेवांचे माध्यम बनून मी आज तागायत सेवारत आहे.” पुरुषोत्तमजी खूपच उत्तेजित होऊन बोलत होते. ते त्यांच्या कोर्स करण्यापूर्वीच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगताना म्हणाले की,

“परंतु माझा पूर्वेतिहास असा नाही. अत्यंत सधन कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. मागेल ते मिळत असल्याने हट्टी बनलो. क्रिकेट आणि अभिनयाचा छंद. अभिनयात पारितोषिके देखील मिळाली. राज्यशास्त्रामध्ये एम.ए. पी.एच.डी. प्राध्यापकाची गलेलठ्ठ पगाराची नोकरी. मग व्यसनाधीन व्हायला किती वेळ लागणार? व्यसने वाढत गेली, कशातही रस वाटेनासा झाला, जीवनात नैराश्य आले, स्वभाव चिडचिडा बनला, शीघ्रकोपी स्वभावामुळे कुटुंबीय, मित्र परिवार, सह कर्मचारी आणि नातेवाईक टाळू लागले. अगदी माणसातून उठून गेलो होतो. संपूर्ण जीवन तणावयुक्त आणि अर्थहीन भासू लागले.”

जीवन सर्वार्थाने परिपूर्ण बनले

डिसेंबर २००६ ला पुरुषोत्तमजींचे बंधू जगन वायाळ यांनी त्यांना आर्ट ऑफ लिव्हींगचे पहिले शिबीर करायला भाग पाडले. आणि पहिल्या सुदर्शन क्रियेनंतरच पुरुषोत्तमजींना अमुलाग्र बदल जाणवला. ते म्हणाले की,

“पहिल्या सुदर्शन क्रियेमध्ये जीवन चैतन्याने भरून गेले. शिबीर पूर्ण होताना लक्षात आले की, गुरुदेवांचे हे ज्ञान दैवी ज्ञान आहे. या ज्ञानाच्या आधाराने मानवी जीवन आनंदी, समाधानी, अर्थपूर्ण बनू शकते. मला खात्री झाली माझेही जीवन अर्थपूर्ण बनू शकते, मी देखील एक चांगली व्यक्ती बनू शकतो.”

“शिबिरानंतर सुदर्शन क्रियेच्या सरावाने हट्टी स्वभाव दूर होऊन प्रेम-भावना-आपलेपणा वाढीस लागला. व्यसने सुटली. दुरावलेले सगळे लोक परत जवळ आले, आपलेसे झाले. तणाव नाहीसा झाला. गमावलेला आत्मविश्वास परत मिळाला. मी गुरुजींच्या चरणी नतमस्तक झालो. जीवनातील असे सकारात्मक बदल अनुभवून माझे जीवन सर्वार्थाने परिपूर्ण झाले, आणि पुढील आयुष्य गुरुजींच्यासाठीच आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगायचे ठरवले.” पुरुषोत्तमजी कोर्स केल्यानंतरचा त्यांचा अनुभव सांगत होते.

प्रोजेक्ट विदर्भ

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले होते. शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यापोटी आत्महत्या करत होते. श्री श्री रविशंकरजीं च्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या जीवनातील नैराश्य नाहीसे करण्यासाठी त्यांना त्वरित आर्ट ऑफ लिव्हींगची मोफत शिबिरे, योगा, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि ध्यान करवले. व्यसनमुक्तीची शिबिरे करवली. त्यांची आर्थिक घडी सुधारण्यासाठी त्यांना शून्य खर्चाधारित शेती, जल साक्षरता आणि शेती पूरक व्यवसायांबाबतीत प्रशिक्षित केले.

प्रोजेक्ट विदर्भ मधील सहभागामुळे पुरुषोत्तमजींच्या सेवाकार्याला दिशा मिळाली. गुरुजींचे ध्येय आणि दृष्टीकोन, त्याची व्याप्ती जसजसी त्यांना समजू लागली, तसे त्यांनी सेवेमध्ये स्वतःला झोकून दिले. दरम्यान आश्रमामध्ये गुरुजींनी ‘ग्रामीण विकास प्रकल्प’ अंतर्गत महिला आणि युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वयं रोजगार प्रशिक्षण सुरु केले. या प्रशिक्षणासाठी पुरुषोत्तमजीनी स्थानिक युवकांना सुतारकाम, लोहारकाम, विद्युत तज्ञ इत्यादीचे प्रशिक्षणासाठी पाठवले. त्यांना त्यांच्या सेवेचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. त्यांना स्थानिक नागरिक आणि शासनाचे सर्वतोपरी सहकार्य मिळू लागले.

अजूनही हे कार्य विविध मार्गाने विदर्भात सुरु आहे. पुरुषोत्तमजी नम्रपणे नमूद करतात की,

“सेवा करणे गुरुजींचा आशिर्वाद आहे. त्याचे इतके भव्य परिणाम त्यांची कृपाच आहे. गुरुजींनी सांगितले ‘तुझे टीचर बनना है I’  आर्ट ऑफ लिव्हींगमधील साधना, सत्संग आणि सेवा यामुळे माझे जीवन सर्वांगीनरीत्या समृद्ध झाले होते, जीवनाचे सोने झाले होते, म्हणून मी आर्ट ऑफ लिव्हींग प्रशिक्षक बनलो.”

विविध पुरस्कारांनी सन्मान

पुरुषोत्तमजींच्या विविध क्षेत्रामधील विविध सेवा कार्याची नोंद स्थानिक सामाजिक संस्थांनी घेतली आणि त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. सुभद्रा प्रतिष्ठान, सेलू यांचा समाज गौरव पुरस्कार २०१३, कै. वसंतराव काळे प्रतिष्ठान यांचा आदर्श शिक्षक व सामाजिक गौरव पुरस्कार २०१४ तसेच लुई ब्रेल एज्युकेशन सोसायटी, परतूर यांचा समाजरत्न पुरस्कार २०१५ असे विविध पुरस्कार पुरुषोत्तमजींना मिळाले.

फलश्रुती

आज विदर्भामध्ये ज्या गावांमध्ये आर्ट ऑफ लिव्हींगचे कार्य सुरु आहे, संपूर्ण गावच्या गावांनी शिबिरे केली आहेत, दररोज सामुहिक साधना-सत्संग सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण शून्य आहे. नैसर्गिक जलस्त्रोत पुन्हा वाहू लागले आहेत. जमिनी सुपीक बनत आहेत. आर्थिक घडी बसू लागली आहे. सर्व नागरिकांचे जीवन सर्वार्थाने आनंदी, चैतन्यदायी बनत आहे. त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान परत मिळाला आहे. त्यांना या दैवी कार्यामध्ये पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी श्री रंगनायक आणि उपजिल्हाधिकारी श्री अरविंद लोखंडे यांचे अनमोल सहकार्य आहे.

पुरुषोत्तमजी बोलते झाले – “लोक म्हणतात हे कार्य, निव्वळ आर्ट ऑफ लिव्हींगच करू शकते. मी स्वाभिमानाने म्हणतो, ‘होय, आर्ट ऑफ लिव्हींगचे ज्ञान, साधना, आपलेपणा, जबाबदारी मुळेच हे शक्य आहे.’ परंतू विनम्रपणे नमूद करतो, ‘या सर्वामागे निव्वळ माझ्या गुरूची कृपा आहे.”