भगवान कृष्णाचे जीवन असंख्य घटनांनी भरलेले आहे, प्रत्येक घटना ही दुसऱ्या घटनेशी निगडित आहे. या घटना अखंडतेचा भाग आहेत. त्यांना वेगळे करणे किंवा त्यातील फक्त काही निवडणे कठीण होईल.

तथापि एका अत्यंत आराध्य देवतेचे गुण साजरे करण्यासाठी काही घटना निश्चितच सांगता येतील. या घटनांचा अर्थ लावला गेला आहे,पूज्य मानले गेले आहे, चर्चा झाल्या आहेत, आणि वेगवेगळ्या अभिव्यक्तींद्वारे अमर झाल्या आहेत. त्यापैकी काही ‘भारत ज्ञान’ ने शोधल्या आहेत. ‘भारत ज्ञान’ हा एक उत्कट संशोधन उपक्रम असून गौरवशाली भूतकाळातील विस्मरणात गेलेल्या घटना एकत्र करून जिवंत ठेवत आहे.

१. यशोदेला ब्रह्मांड दाखवणे

एक दिवस बाळकृष्णाने बागेत रांगत असताना मातीचे काही कण खाल्ले. आई यशोदा यांनी हे पाहिले आणि त्याच्या तोंडातून ते काढण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या तोंडात संपूर्ण ब्रह्मांड, सौर यंत्रणा, आकाशगंगा आणि संपूर्ण विश्व पाहिले. हे पाहिल्यानंतर हे मूल सामान्य नाही हे तिला दिसले.

या दृश्याने तिला हे दर्शविले की हे मूल सामान्य नाही.

२. कंसाने पाठवलेल्या राक्षसांचा पराभव

अनेक दंतकथा वर्णन करतात की कृष्णाने कंसाने पाठवलेल्या भयंकर राक्षसांचा पराभव केला. जसे की पुतना, अरिस्तासूर, अघासूर. कृष्णाने एकट्याने, अगदी लहान मुलाने त्यांच्यावर मात केली. ब्रजभूमितील २४ फळबागा आणि असंख्य जंगले कृष्णाच्या विलक्षण पराक्रमाची साक्षीदार आहेत.

कृष्णाने कोणाकोणाचा पराभव केला ?

  • गाढवाच्या रुपाने आलेल्या धेनुकासुर ज्याने ब्रज मधील लोकांना बागेत प्रवेश करण्यापासून रोखले 
  • बगळ्याच्या रूपाने आलेला बकासुर.
  • एका विशाल सापाच्या रूपाने आलेला अघासूर ज्याला बाळकृष्णाला त्याच्या विषाने मारण्यासाठी पाठवण्यात आले होते,
  • बैलाच्या रुपाने आलेला अरिस्तासूर ज्याने नदीचा काठ खोदून ब्रज मध्ये प्रवेश केला,
  • कालिया एक भयंकर विषारी साप जो यमुनेचे पाणी विषारी करीत होता.

३. गोवर्धन पर्वत उचलला 

ब्रजवासी इंद्र देवाच्या वार्षिक पूजेच्या तयारीत मग्न होते. छोट्या कृष्णाने ही तयारी पाहिली आणि ब्रजवासीयांना विनंती केली की इंद्राची पूजा करण्या ऐवजी त्यांनी शेत तलाव कुरण गाई या त्यांच्या दैनंदिन जीवनात मदत करणाऱ्या निसर्गाची पूजा करावी. त्याने त्यांना गोवर्धन गिरी पर्वताची पूजा करण्यास पटवले. 

ब्रजच्या लोकांनी तसे केले आणि इंद्राच्या क्रोधाने अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. लोक कृष्णाकडे धावले व हे थांबवण्याचा मार्ग विचारू लागले. तो गोवर्धन पर्वताकडे गेला आणि त्याने आपल्या करंगळीवर त्याला उचलले. प्रत्येक जण आपल्या गुरांसह टेकडीच्या खाली आश्रयासाठी धावला.

सात दिवस पाऊस कोसळत होता. शेवटी इंद्राचा क्रोध शांत झाला व मेघ गर्जना आणि पाऊस थांबला आणि ब्रज मध्ये शांतता परतली. 

४. उडुपीतील मूर्तीचे रहस्य

कृष्णाचे बालपण पुन्हा अनुभवण्याची आई देवकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्णाने विश्वकर्मा या वास्तुविशारदाकडून शाळीग्राम दगडातून एक मूर्ती तयार करून घेतली होती. ही मूर्ती नंतर रुक्मिणीला देण्यात आली. कृष्णाच्या काळानंतर ती मूर्ती द्वारकेच्या एका भागात पुरली गेली. द्वारकेची माती ज्यात ही मूर्ती (विग्रह)व्यापली गेली तिला गोपीचंदन असे म्हणतात. (गोपी म्हणजे हलका तपकिरी तर चंदन म्हणजे चंदनाच्या लेपा प्रमाणे.) 

एका खलाशाला हा जड वाळूचा तुकडा सापडला. त्याने त्याचा बोटीसाठी गिट्टी (तोल सांभाळण्यासाठी वजन) म्हणून वापर केला. उडुपीजवळ नौकानयन करीत असताना तो वादळात अडकला व संत माधवाचार्यांनी त्याची सुटका केली. माधवाचार्यांनी बोटीतील ही मूर्ती पाहून त्यास विनंती केली आणि ती उडुपीमध्ये बसवली.

५. त्याच्या पालकांना मुक्त केले

असे सांगतात की आपल्या नीच मामाच्या आमंत्रणावरून कृष्ण वृंदावनातून आपल्या भावासह मथुरेला आला. बारा वर्षे वयाच्या कृष्णाला त्याच्या शौर्याने आणि निर्भयतेने आधीच नावलौकिक मिळाला होता. कृष्ण व त्याच्या भावाच्या जोडीला कंस मामाचे पैलवान मुष्टिका व त्याचा कुस्तीतील भागीदार चानुरा यांनी मल्ल युद्धासाठी आव्हान दिले. या पारंपरिक खेळात दोन कुस्तीपटूंना पराभूत केल्यानंतर कृष्णाने कंसाला आव्हान दिले आणि त्यालाही मारले. 

त्यानंतर तरुण कृष्णाने आपले आई वडील देवकी आणि वासुदेव यांना कैदेतून मुक्त केले. त्याने आपले आजोबा उग्रसेन ज्यांचे राज्य कंसाने बळकावले होते त्यांनाही मुक्त केले. त्यानंतर कृष्णाने राजा उग्रसेन यांना पुन्हा गादीवर बसवले. 

कंसाच्या मृत्यूने सासरे जरासंध रागावले. त्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जरासंधाने पुढील काही वर्षात १७ वेळा मथुरेवर हल्ला केला. प्रत्येक वेळी कृष्ण आणि बलराम यांनी मथुरेचे रक्षण केले. 

६. सांदिपनींच्या आश्रमात शंख घेणे 

कृष्ण आणि बलराम शिक्षणासाठी उज्जैन येथे ऋषी सांदिपनी यांच्या आश्रमात होते. उज्जैनला त्यावेळी अवंतिका म्हणून ओळखले जात होते. शाळकरी कृष्णाने तेथे अनेक मित्र केले . त्यापैकी सुदामा प्रसिद्ध होते.

आपले गुरु सांदिपनी यांचे कार्य पूर्ण करताना आपला प्रसिद्ध शंख पांचजन्य कसा प्राप्त केला हे आश्रमातील एका कथेत सांगितले आहे. ही त्यांची गुरुदक्षिणा होती. अनेक वर्षानंतर कृष्णाच्या या पांचजन्य शंखाचा उपयोग कुरुक्षेत्र युद्धाच्या प्रारंभाचा संकेत देण्यासाठी करण्यात आला.

७. एका मैत्रीची आख्यायिका

सुदामा आणि कृष्णाची मैत्री एक आख्यायिका बनली आहे. गरिबीने त्रस्त सुदामा जेव्हा आपल्या मित्राला भेटायला गेला तेव्हा त्याला फक्त काही पोहे देऊ शकला. सुदाम्याला आपल्या मित्राच्या राजवाड्यात अशी छोटीशी भेट दिल्याने लाज वाटली. कृष्णाने प्रेमाने पोहे खाल्ले व त्याला मित्र भेटीचा आनंद झाला. 

सुदामा घरी गेला तेव्हा त्याला त्याच्या झोपडीचे रूपांतर महालात झाल्याचे दिसले. ती त्याला त्याच्या मित्राकडून भेट होती.

८. नरकासुर आणि १६००० बायका

नरकासुराचा मृत्यू एका स्त्रीच्या हातून होईल अशी भविष्यवाणी होती. यातून सुटण्यासाठी त्याने आपल्या राज्यातील सर्व अविवाहित तरुणींना कैद केले , त्यामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण होते.

त्याला संपवण्यासाठी कृष्ण आपली शूर पत्नी सत्यभामा हिला घेऊन नरकासुराशी युद्ध करायला गेला. सत्यभामेने नरकासुराला द्वंद युद्धात गुंतवून त्याचा वध केला. त्यानंतर कृष्णाने सर्व युवतींना बंदीवासातून सोडवले. या लांछनापासून स्वतःला वाचवण्यासाठी सर्व स्त्रियांनी त्यांच्याशी लग्न करण्याची विनंती केली. 

९. एक विशेष रथयात्रा

अयशस्वी शांतता मोहिमेनंतर कृष्ण हस्तीनापुर सोडण्याची तयारी करतात. कर्ण त्यांच्या बरोबर रथातून शहराच्या वेशीपर्यंत जातो. कर्णाला सांगतो की तो कुंतीचा पहिला मुलगा आहे व पांडव त्याचे भाऊ आहेत.

तो कर्णाला दुर्योधनापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो , तरीही कर्ण हा दुर्योधनाचा ऋणी असल्याने त्याला सोडू शकत नाही. कर्ण कृष्णाकडून वचन घेतो की तो आपली ही ओळख पांडवांकडे उघड करणार नाही. 

१०. पांडवांचे शांतिदूत कृष्ण

पांडवांच्या वतीने हस्तीनापुर दरबारात कृष्णाने शांतिदूताची भूमिका घेतली. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी कृष्ण दुर्योधनाकडे गेला, तेव्हा दुर्योधनाने कृष्णाच्या खुर्चीखाली एक सापळा दरवाजा तयार केला. त्याला पांडवांचे राज्य ताब्यात घ्यायचे होते आणि युद्ध टाळायचे होते.

कृष्णाने सापळ्यात पडण्याऐवजी दुर्योधन आणि सर्वांना त्याचे वैश्विक रूप (विश्र्वरुप दर्शन) दाखवले. भयावह आणि ज्ञानवर्धक रूप पाहुनही दुर्योधन त्याच्या सत्तेच्या लालसेने इतका आंधळा झाला होता की त्याला कृष्णाच्या वैश्विक रूपातील संदेश दिसला नाही. त्याने शांततेच्या उपायांकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे युद्धाचा मार्ग मोकळा झाला.

सत्य

या घटनेनंतर पूज्य आणि ज्येष्ठ सल्लागार आणि राजा धृतराष्ट्राचा सावत्र भाऊ विदुर याने कृष्णाला विचारले की हे युद्ध अपरिहार्य आहे हे माहीत असूनही त्यांनी शांती प्रस्तावाचा त्रास कशाला करून घेतला? तेव्हा कृष्ण म्हणाले ”मी माझ्या स्थळ-काळाचा विचार करत नाही तर भविष्याचा विचार करतो. भविष्यातील पिढ्यांना वाटेल की जगावर एक मोठे संकट आले असताना मी ते थांबवण्यासाठी काहीही केले नाही. अपयशाची भीती हे प्रयत्नांच्या कमतरतेचे कारण होऊ शकत नाही..”

त्याचे खरे स्वत्व प्रकट करणे

गोंधळलेला अर्जुन आपल्या भावंडांविरुद्ध आणि नातेवाईकांविरुद्ध युद्ध करण्यासाठी शस्त्र उचलू शकत नव्हता. तेथे रणांगणाच्या मध्यभागी कृष्ण अर्जुनाला भगवतगीतेचे ज्ञान देतो. या उपदेशादरम्यान कृष्णाने अर्जुनाला आपले खरे विश्वरूप दर्शन दिले.

या उपदेश, सल्ला आणि दर्शनाने लोकांच्या मनात व हृदयात कृष्णाने देवाचे स्थान मिळवले आहे. 

११. गांधारीचा शाप

युद्धानंतर गांधारीला तिच्या सर्व १०० पुत्रांच्या, कौरवांच्या मृत्यूने तीव्र दुःख झाले. तिने कृष्णाला शाप दिला की तिच्याप्रमाणेच त्यालाही त्याच्या हयातीतच ३६ वर्षानंतर त्याच्या राजवंशाचा अंत दिसेल. 

खरेच कृष्ण तेथून गेल्यावर ३६ वर्षानंतर द्वारकेत यादवांमध्ये गृहयुद्ध सुरू झाले आणि द्वारका समुद्राखाली गेली.

या आपत्तीपूर्वी कृष्णाने आपल्या लोकांना बोलावून द्वारकेला धोका असल्याचे सांगून इतर ठिकाणी निघून जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तो दक्षिणेकडे सध्याच्या सोमनाथ जवळील प्रभास पाटण येथे गेला. तेथेच जरा नावाच्या शिकाऱ्याने कृष्णाच्या टाचेला हरणाचे तोंड समजून विषारी बाण मारला.

अशाप्रकारे कृष्ण हिरण्य कपिला आणि सरस्वती नद्यांच्या संगमाच्या काठावर स्वर्गवासी झाला.  

कृष्णाचे या जगातून निघून जाणे आणि त्यानंतरचे संभाव्य युद्ध जाणून अर्जुनाने हस्तीनापुरातून धाव घेतली. त्याने कृष्णाच्या बायका आणि द्वारकेच्या इतर स्त्रियांची सुटका केली आणि तो हस्तिनापुराकडे परतला. द्वारका शहरातून बाहेर पडताच त्यांनी द्वारकेला सुनामी सारख्या मोठ्या लाटेने वेढलेले पाहिले. अर्जुनाने मौसल पर्वामध्ये दुरुन जे पाहिले त्याचा प्रत्यक्षदर्शी अहवाल दिला:

”समुद्र किनाऱ्यावर सतत धडकत होता,
समुद्र आपली हद्द सोडून शहरात शिरला.
एका मागून एक सुंदर इमारती बुडताना पाहिल्या
समुद्राने पूर्ण शहर व्यापले
काही मिनिटातच सर्व संपलं
समुद्र आता शांत सरोवर बनला होता,
सुंदर शहराचा मागमुसही शिल्लक नव्हता.
द्वारका फक्त एक नाव होते,
फक्त एक आठवण.”

(मौसल पर्व हा महाभारतातील शेवटच्या अध्यायांपैकी एक आहे.) 

१२. जगन्नाथ पुरी मंदीराशी संबंध

द्वारकेहून पूर्वेकडे आलेल्या लोकांबद्दल एक गोष्ट सांगतात, ते कृष्णाचे नश्वर अवशेष (पिंड) घेऊन गेले होते , जे जगन्नाथ पुरीच्या मंदीरातील मूर्तीच्या पोकळीत ठेवलेले आहेत. स्थळ पुराणा प्रमाणे मंदीराच्या स्थानिक कथेनुसार दर १२ वर्षांनी ब्रह्मपोतली काढून नवीन मूर्तीत ठेवले जाते.

हे अवशेष सामान्यतः मंदीराच्या सर्वात वृद्ध पुजाऱ्याद्वारे हाताळले जातात ज्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते.  

ही माहिती ‘भारत ज्ञान’ वरून घेतली आहे. डॉ. डी.के. हरी आणि डॉ. हेमा हरी या उत्साही पती-पत्नीच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने भारतातील काही न सांगितलेल्या कथा शोधून काढल्या आणि त्या समकालीन बनवल्या. त्यांचे भारतीय संस्कृतीवरील कोणतेही पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता.

आपला सांस्कृतिक वारसा आकर्षक नाही का? उपचार आणि आरोग्याची आपली परंपरा देखील तितकीच मनोरंजक आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी सर्वांगीण आरोग्य राखण्याची तंत्रे सांगितली. आर्ट ऑफ लिव्हिंग, ध्यान व श्वास कार्यक्रमात या रहस्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

    Hold On! You’re about to miss…

    The Grand Celebration: ANAND UTSAV 2025 

    Pan-India Happiness Program

    Learn Sudarshan Kriya™| Meet Gurudev Sri Sri Ravi Shankar Live

    Beat Stress | Experience Unlimited Joy

    Fill out the form below to know more:

    *
    *
    *
    *