प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्या
जेंव्हा अनावर प्रसंग येतात तेंव्हा तुमच्या मनाचे निरीक्षण केलंय? अशा प्रसंगामुळे आपल्या मनामध्ये भावनांचा उद्रेक होतो. अशा उद्रेकावेळी आपण भावनावश होतो आणि प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त होतो. तसेच या उद्रेकामध्ये आपण सहज अडकून राहून वर्तमान क्षणाबाबतची सजगता हरवून जातो. आपण हाच विचार करत रहातो की, हे माझ्या बाबतीत का घडले, मी असे काय केले? आणि काय करणे गरजेचे आहे, हेच विचार सुरु असतात. भविष्यात हे सर्व सामान्य कसे बनेल, या बाबतीत आपण देखील काळजीत असतो. सततच्या या विचारांच्या भडीमारांमुळे आपण योग्य विचार करण्याची क्षमता गमावून, परिस्थितीला प्रतिसाद देण्याऐवजी प्रतिक्रिया देऊन बसतो.
मनाला ‘स्थिर’ होण्यासाठी तयार करा
अनियंत्रित विचारांनी अनावर मनामुळे आपली प्राणऊर्जा निघून जाते आणि आपण निराश, विफल होऊन जातो. या ‘अनावर’ परिस्थितीतून ‘स्थिर’ कसे बनावे? अशा परिस्थितींना आपण कसा शांत मनाने प्रतिसाद देऊ शकतो? श्री श्री योगाचे ज्येष्ठ प्रशिक्षक स्पष्ट करतात, ”आपण प्रत्यक्षपणे मन:शांती मागू किंवा प्राप्त करू शकत नाही, मात्र आपण मनाला ‘शांत स्थिर’ होण्यासाठी तयार करू शकतो. ध्यानामुळे मन विनासायास शांत होणेस तयार होते.
संपूर्ण सजगतेने कृती करा
ध्यानामुळे मनातील साठलेले ताण-तणाव निघून जाऊन मन ताजे तवाणे आणि स्पष्ट बनते. त्यामुळे मन वर्तमानक्षणात येते, जेथे आपण कृती करू शकतो. बघा नां, आपण ‘काल’ हसू शकतो कां? दोन तासांनी हसू शकतो ? आपण निव्वळ योजना बनवू. मात्र ‘आत्ताच’ या क्षणात हसू शकतो. ते आपल्या हातात आहे. कोणतीही कृती करणे निव्वळ वर्तमान क्षणातच शक्य आहे. जेंव्हा मन वर्तमान क्षणाबाबतीत जागृत असते तेव्हाच आपण संपूर्ण सजगतेने कृती करतो. मग ती कृती निर्दोष आणि उत्कृष्ट असते.
शांतीचा प्रभाव पसरवा
आपल्या भोवतालच्या परिस्थितीवर आपण प्रभाव करू शकत असल्याची आपली क्षमता ही मजेशीर गोष्ट आहे. ज्या खोलीत भांडण झाले आहे, त्या खोलीत प्रवेश केल्याबरोबर आपण अवघडून जातो आणि एखाद्या खोलीत छोटेसे बाळ खेळत असेल तेथे प्रवेश केल्यावर आपण थकलेले असलो तरी उत्साही आणि आनंदी होतो. तसेच अतिक्षुब्ध प्रसंगामध्ये जर आपण मनातून शांत असलो तर आपण त्या शांतीचा प्रभाव आजूबाजूच्या परिस्थितीवर करून परिस्थितीतील क्षुब्धता कमी करू शकतो. दररोजच्या काही मिनिटांच्या ध्यानामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहू शकतो.
ध्यानाचे फायदे
- १. ध्यान आपल्याला मानसिक सशक्त बनवते, ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत प्रसन्न राहू शकतो.
- २. आपल्याला आंतरीक शांती प्राप्त होते आणि आसपासच्या परीस्थितीवर प्रभाव करू शकतो.
- ३. भावनिक लवचिकता वाढते.
- ४. प्रतिक्रिया व्यक्त करणे कमी होते. प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते.
- ५. ध्यान हे मनाला ताण-तणाव मुक्त करण्याचा मार्ग आहे.
ध्यानसाधना ची वेळ – काही मिनिटे ‘फक्त स्वतःसाठी’
दैनंदिन कामाच्या राम रगाड्यापासून, कौटुंबिक जबाबदाऱ्यामधून काही मिनिटे ध्यानासाठी कोठून काढावे, प्रश्नच आहे ना. सकाळी सकाळी ध्यान करणे उत्तम, ज्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसभर शांत रहाणेस मदत मिळेल. जर तुमच्या दगदगीतून विश्रांती हवी असेल तर सायंकाळी चहापानाच्या वेळी देखील ध्यान करू शकता. ध्यानाचा कालावधी, ही एकच वेळ तुमची स्वतःसाठीची वेळ आहे जेंव्हा पंचेंद्रियांची सगळी कवाडे बंद करून, मनाची बकबक थांबवून स्वतः सोबत राहून गाढ विश्रांती मिळवू शकता. ध्यानासाठीच्या काही झटपट सूचना प्रमाणे ध्यान करून तुमचा अनुभव वाढवू शकता.
खालील सुचानांप्रमाणे ध्यान करून आणखी सहज सुलभ बनवा.
- शांत परिसर – शांत परिसरामध्ये ध्यान करणे योग्य. यामुळे ध्यानामधे अडथळे दूर होऊन, तुम्ही त्यात खोलवर जाऊ शकता.
- नियमित ध्यान करा – दिवसातून दोनवेळा, सातत्याने ध्यान करणे उत्तम. यामुळेच प्रत्येक दिवसागणिक तुम्हाला ध्यानाचे सकारात्मक प्रभाव जाणवू लागतात.
- साथीदारांसह ध्यान करा – आपल्या जवळच्या साथीदारांच्या सोबत समुहाने ध्यान करा, यामुळे तुमचे अनुभव सखोल बनतील, शिवाय तुम्हाला सातत्य ठेवणे मदतीचे होईल.
- ध्यानापुर्वी हलके शारीरिक व्यायाम करा – यामुळे शरीरातील विविध अवयवांमधील ताण आणि तणाव निघून गेल्याने आरामदायी व्हाल आणि ध्यान आणखी आनंददायी बनेल.
- विचारांचे निरीक्षण करा – विचारांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना येऊ द्या. त्यामुळे ध्यान विनासायास बनेल.
- घाई करू नका – दहा-पंधरा मिनिटांचे ध्यान होतेय नां पहा. डोळे उघडण्यासाठी घाई करू नका.
- पोट टच्च नाही ना, याची खात्री करून घ्या. – कारण पोट टच्च असल्यास झोप येते.