आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती | Shri Kshetra Mahaganpati Mandir, Ranjangaon

पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून २ तासावर हे मंदिर स्थित आहे. अष्टविनायक यात्रेतील आठवे मंदिर हे महागणपतीचे असून ते सर्वात शक्तिशाली आहे असे मानले जाते. असे म्हणतात की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची इथे आराधना केली होती.

श्री क्षेत्र महागणपतीची कथा | आख्यायिका)

आख्यायिकेनुसार ऋषी ग्रीत्समद यांचा मुलगा त्रिपुरासुर हा एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा निस्सीम भक्त होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला त्रिपुराइतका मौल्यवान धातू दिला. हे केवळ शंकरच नष्ट करू शकत होते. अहंकाराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. ब्रम्हदेव आणि विष्णू त्याच्या त्रासाला कंटाळून लपून बसले. तेंव्हा घाबरून दबा धरून बसलेल्या देवांना नारदाने सल्ला दिला की त्यांनी गणपतीची मदत घ्यावी. गणपतीने देवांची मदत करण्यास मान्य केले.

गणपतीने ब्राम्हणाचा वेश धारण केला आणि त्याने त्रिपुरासुराला तीन उडणारी विमाने बनवून देण्याची सबब देत त्याला कैलाश पर्वतावरून चिंतामणीची मूर्ती आणावयास सांगितली. लोभाने आंधळ्या झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले. शंकर त्याला हरवू शकत नव्हते. शंकराच्या लक्षात आले की त्यांनी गणेश वंदन केले नाही. शंकराने षडाक्षर मंत्र म्हणत गणपतीला आवाहन केले तेंव्हा तेथे गणपती प्रकट झाला आणि त्याने शंकराला त्रिपुरासुराला हरविण्याच्या सूचना सांगितल्या. त्या सूचनांचे पालन करून शंकराने लोभी त्रिपुरासुराला ठार केले आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले.

श्री महागणपती मंदिर आणि परिसर

हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी-सिद्धी त्याच्या सोबत आहेत. हा गणपती स्वयंभू आहे. भक्तांचे असे मानणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की त्या मूर्तीला १० सोंडी आणि २० हात आहेत. या मूर्तीला 'महोत्कट' म्हणतात. पण ती मूर्ती अस्तित्वात आहे कां याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही.

हा महागणपती अतिशय शक्तिशाली असून गणेशउत्सवात रांजणगांवचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत. तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात.

ही स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपती मांडी घालून कमळावर आसनस्थ आहे. त्याचे कपाळ एकदम रुंद असून त्याची सोंड डावीकडे आहे. 

पूजा आणि उत्सव

मंदिर सकाळी ५.३० ते रात्री १० पर्यंत उघडे असते. भाद्रपद महिन्यात रांजणगावातील गावकरी आपल्या घरी गणपतीची स्थापना करीत नाही. त्याऐवजी ते सर्व या मंदिराच्या पूजेमध्ये सहभागी होतात.

भाद्रपद महिन्यात सहा दिवसांचा विशेष उत्सव साजरा केल्या जातो. यामध्ये गणपतीला पाचव्या दिवशी महानैवेद्य दाखविला जातो. या दिवसात फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये गणपतीची मिरवणूक काढली जाते.

याच दिवसांत कुस्तीचे सामने आयोजित केल्या जातात. ते पाहायला अफाट गर्दी होते. सहाव्या दिवशी भाविक महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी लोटांगण घालीत जातात.

जवळची इतर दर्शनीय स्थळे

  • वडू बुद्रुक येथील संभाजी महाराजांची समाधी. अंदाजे अंतर २७ किमी
  • निघोज येथे कुकडी नदीच्या पात्रात खडकांमध्ये रांजणाच्या आकाराचे नैसर्गिक खळगे बघावयास मिळतात. अंदाजे अंतर २७ किमी

अष्टविनायक यात्रे बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

<<सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर                                            पहिला गणपती - मोरगावचा श्री मयुरेश्वर>>