तुरुंगात राहूनही मुक्तीचा अनुभव (Service stories in Marathi)

पहाटेची पहिली किरणे त्याच्या चेहऱ्यावर पडताच नळातील बारीक धारेचे पाणी तोंडावर शिंपडून तो एका नव्या दिवसाची सुरुवात करतो.आंघोळ करून शुभ्र कपडे आणि गांधी टोपी घालतो.तुरुंगातील आपल्या ब्लॉक मध्ये बसून,रिकाम्या भिंतीकडे एकटक बघत तो कटू भूतकाळ आठवत असतो.पण आत येणाऱ्या स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे भविष्यकाळाबद्दल आशा पल्लवित होतात.ब्लॉकच्या आत तो आपल्या सारखाच सामान्य माणूस आहे.पण या भिंतींबाहेर,तो बेड्या घातलेला,पोलिसांनी आणि समाजाच्या कठोर नजरांनी वेढलेला..

एका कैद्याची दिनचर्या एका सर्वसाधारण माणसासारखीच असते पण त्याची मनस्थिती प्रक्षुब्ध असू शकते.मग ती सूड बुद्धीची,खिन्नतेची असो वा दु:खाची असो.एका वर्षभरापूर्वी बेंगलोरच्या सेन्ट्रल जेलमध्ये हीच परिस्थिती होती.पण गेल्या वर्षभरात ही परिस्थिती झपाट्याने बदलली आहे.

हे सर्व कैदी खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत आहेत.परंतु परिवर्तनशीलता ही एकमेव कायमस्वरूपी गोष्ट आहे,या नियमाने त्यांच्यामध्येही परिवर्तन झाले..

आता ते आम्हाला जीवन जगण्याचे धडे देत आहेत..

हे चित्र बदलण्याचे कारण म्हणजे ३० कैद्यांनी  केलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबीर.(युथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम). ह्या शिबिरात व्यक्तीला स्वावलंबी,आणि सामाजिक दृष्ट्या जबाबदार बनवले जाते.

“आम्ही ९० दिवसीय YLTP आयोजित केला. ह्या अंतर्गत दर दिवशी योग-आसने व ध्यान यांच्या माध्यमातून त्यांना आपला भूतकाळ स्वीकारण्यास व मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली.संध्याकाळी भजन गायचे,दैनंदिन जीवन सुकर बनवण्यासाठी व्यवहारिकदृष्ट्या उपयोगी काही गोष्टी सांगितल्या जायच्या.ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या होत्या,खासकरून सुदर्शन क्रिया,जिच्यामुळे त्यांच्यामध्ये परिवर्तन झाले”.असे कर्नाटक कारागृहाचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री नागराज गंगोली यांचे म्हणणे आहे.

जे कैदी १ ते १२ वर्षांपासून कारागृहात होते त्यांचीच ह्या शिबिरासाठी तिथल्या अधिकाऱ्यांनी निवड केली होती. त्यांच्यातील सकारात्मक बदल पाहून दुसरी तुकडी आपणहून तयार झाली.

त्यानंतर त्यांनी दोन एडवान्स  कोर्स (Advance Course) केले,ज्यामुळे त्यांच्या जुन्या भावनिक जखमा बुजल्या, संकल्पना आणि प्रवृत्तीमध्ये बदल झाला, भय निघून गेले.

"पूर्वी ह्याच लोकांचा वेळ पत्ते खेळण्यात आणि परत तोच गुन्हा करण्याच्या योजना आखण्यात जायचा.पण हे चित्र आता बदलते आहे",असे नागराज म्हणाले.

आता ते स्वतःच नेते आहेत..

यादरम्यान पोलिस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षकांच्या लक्षात आले की मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवायचे असेल तर हेच कैदी इतर कैद्यांसाठी ध्यान-योग प्रशिक्षक बनले पाहिजेत.अशा प्रकारे पूर्वीचे अट्टल गुन्हेगार ध्यान-योग प्रशिक्षक बनले. इतर कैदी ह्या युवाचार्यांकडे (युवा नेते) मार्गदर्शक म्हणून बघू लागले.

“मला तुरुंगातील ४००० कैद्यांच्या जेवणाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी दिली गेली.माझ्या इतर सहकाऱ्यांना याचे प्रशिक्षण देताना त्यांच्यात होणारे बदल पाहून मला खूप आनंद आणि समाधान वाटते” असे मोहन कुमार ह्या तुरुंगवासी - योग प्रशिक्षकाचे म्हणणे आहे.

“हे शिबीर केल्याने माझ्यात १२ वर्षे साठलेला ताण निवळला.योग-ध्यान यामुळे माझ्यात प्रचंड इच्छा शक्ती जागृत झाली. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आणि मन केंद्रित झाले.”

कित्येक वर्षे तुरुंगात काढल्याने,शारीरिक निष्क्रीयतेमुळे आणि नैराश्यने वेढलेले असताना असा बदल स्वागतार्ह होता.

एस रवी, आय.पी.एस. कर्नाटक राज्याचे तुरुंग उपमहानिरीक्षक म्हणतात
“त्यांच्यामध्ये झालेले परिवर्तन व्यापक आहे. हे सराईत गुन्हेगार होते पण शिबीर केल्यानंतर त्यांची उपयुक्तता वाढली आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास झाला.आता ते समाजामध्ये निष्कलंकपणे सहज मिसळू शकतील.  “ज्या प्रशिक्षणामुळे ते युवाचार्य झाले, त्यानेच एक सतत प्रक्रिया सुरु झाली ज्यायोगे ते आता इतर कैद्यांना हे शिक्षण देऊ लागले आहेत.”

आज हे ३० प्रशिक्षक,ज्यांच्यामुळे कर्नाटकातील ७ कारागृहातील (ज्यात बिदर,बेल्लारी,गुलबर्गा,विजापूर,धारवाड व म्हैसूर जिल्हांचा समावेश आहे) २५०० कैद्यांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे,ते अत्यंत मानाने जीवन जगत आहेत.

अखेरीस त्यांची भेट झाली..

या ३० योग प्रशिक्षकांची गुन्हेगारीपासून ते जीवन कौशल्याचे प्रशिक्षक (trainers in life skills) बनण्यापर्यंतची यात्रा या बेंगलोर सेन्ट्रल जेलच्या महाकाय भिंतीतच घडली.पोलिसांच्या निळ्या गाडीतून,नेहमीचा पोशाख न घालता स्वच्छ कुर्ता-पायजमा परिधान करून या सर्व ३० जणांनी गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांची भेट घेतली.बंदोबस्तासाठी असलेले पोलिस दक्ष असले तरी त्यांना या गोष्टीचा अभिमानच वाटत होता.बेड्या न घालताच सर्व बसले होते. एका वेगळ्या अर्थानेही ते मुक्त झालेले होते (आपल्या प्रक्षुब्ध भूतकाळापासून). जीवनाकडे एका नव्या सकारात्मक दृष्टीकोनातून बघण्याचा त्यांनी निश्चय केला होता.

श्री श्रीनी त्यांच्या  प्रयत्नांना प्रोत्साहन देत हे चांगले काम सुरू ठेवायला सांगितले. “आपण सगळ्यांनी समाजात विश्वासाचे वातावरण आणि मानवी मुल्ये जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.” अशी परिवर्तन घडवून आणणारी शिबिरे जास्तीत जास्त तुरुंगात कशी चालू करता येतील याचे मार्गदर्शन त्यांनी श्री श्रींकडून घेतले.

३२ वर्षीय महेश म्हणतो, “आज काल मी ज्याला त्याला पकडून योग वर्गात बसवतो.मी माझ्या सुटकेची आतुरतेने वाट बघत आहे.जेणेकरून मला माझ्या कुटुंबियाना भेटता येईल.मला भारताचा चांगला नागरिक बनून जीवन जगण्याची इच्छा आहे.

खरोखरच तुरुंगात असूनही ते सर्वजण मुक्तीचा अनुभव घेत आहेत.

लेखिका: मोनिका पटेल

 

जर तुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंग च्या उपक्रमांना सहाय्य करायचे असेल तर इथे संपर्क करा:  webteam.india@artofliving.org.