अष्ट लक्ष्मी | Ashtalakshmi | Ashta lakshmi

दिवाळीच्या निमित्ताने माता लक्ष्मीचे पूजन सर्वत्र अत्यंत श्रद्धेने केले जाते. भगवान नारायण साध्य असेल तर ते प्राप्त करण्याचे लक्ष्मी हे साधन आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी येथे आठ प्रकारच्या संपत्ती किंवा लक्ष्मी बाबत खुलासेवार सांगतात.

  1. आदि लक्ष्मी
  2. धन लक्ष्मी
  3. विद्या लक्ष्मी
  4. धान्य लक्ष्मी
  5. धैर्य लक्ष्मी
  6. संतान लक्ष्मी
  7. विजय लक्ष्मी
  8. राज लक्ष्मी

आदि लक्ष्मी| Adi Lakshmi

आपण कधी हा विचार केला आहे कि आपण या पृथ्वीतलावर कां आलो आहोत? किती आहे आपले वय? ३०, ४०, ५० वर्षे? मग ५० वर्षापूर्वी मी कोठे होतो? माझा मूळ स्त्रोत कोठे आहे? मी कोण आहे? आणखी ३५, ४०, ५० वर्षांनी हा देह राहणार नाही, मग मी कोठे जाईन? मी आलोय कोठून? मी येथे आलोय कि कायमचा येथेच आहे? आपल्या मूळ स्त्रोताचे ज्ञान होणे, हीच ‘आदि लक्ष्मी’ होय. मग नारायण आपल्या नजीक असतात. ज्याला आपल्या स्त्रोताचे ज्ञान होते तो सर्व भयापासून, भीतीपासून मुक्त होतो आणि संतोष, आनंद प्राप्त करतो. हि आदि लक्ष्मी होय. आदि लक्ष्मी निव्वळ ज्ञानी व्यक्तींजवळ असते आणि ज्याच्याजवळ आदि लक्ष्मी असते समजा कि त्याला ज्ञान प्राप्त झालेय.


धन लक्ष्मी | Dhana Lakshmi

धन लक्ष्मी सर्वाना माहिती आहेच, धनाच्या इच्छेपोटी आणि अभावामुळे माणूस अधर्म करतो. हिंसा, चोरी, फसवणूक यासारखी चुकीची कामे करतो. परंतु डोळे उघडून पहात नाहीत कि आपल्याजवळ काय आहे. जोर जबरदस्तीने धन लक्ष्मी येत नाही, आली तरी सुख, आनंद देत नाही तर निव्वळ दुःखच देते. काही व्यक्ती धन म्हणजेच लक्ष्मी मानतात आणि तिला प्राप्त करणे हेच लक्ष्य बनवतात. मरेपर्यंत पैसे गोळा करतात, बँकेत ठेवतात आणि मरून जातात. ज्यांनी धन हेच लक्ष्य बनवले आहे ते दुःखीच होतात. काही व्यक्ती धनाला दोष देतात. पैसे नाहीत तेच ठीक आहे, पैसा चांगला नाही, पैशामुळे हे घडते-ते घडते, हा सर्व गैरसमज आहे. धनाचा सन्मान करा, सदुपयोग करा, मग धनलक्ष्मी स्थिर होईल. लक्ष्मीची पूजा करा. लक्ष्मी चंचल असते, म्हणजे ती सतत चालत राहते. चालत राहिली तरच तिचे मुल्य आहे नां. बंद राहिली तर तिचे काहीही मुल्य नाही. म्हणून धनाचा सन्मान आणि सदुपयोग करा.


विद्या लक्ष्मी | Vidya Lakshmi

देवी लक्ष्मी आणि सरस्वतीचे चित्र पाहिले कि लक्षात येईल कि लक्ष्मी पाण्याच्या वर कमळामध्ये स्थित असते. पाणी अस्थिर असते म्हणून लक्ष्मी देखील पाण्याप्रमाणे चंचल आहे. मात्र विद्या लक्ष्मी सरस्वती पाषाणावर स्थिर आहे. विद्या, ज्ञान येते तेंव्हा जीवनात स्थिरता येते. आपल्या हातून विद्येचा देखील दुरुपयोग होऊ शकतो. शिकणे हा एकमेव उद्देश्य असेल तर ती विद्या लक्ष्मी होऊ शकत नाही. शिकणे आणि शिकल्यावर त्या शिक्षणाचा वापर कराल तेंव्हा ती विद्या लक्ष्मी होईल.


धान्य लक्ष्मी | Dhanya Lakshmi

धन लक्ष्मी जवळ असली तरी धान्य लक्ष्मी ‘आहे’ असे म्हणू शकत नाही. धन आहे परंतु काही खाऊ शकत नाही. भाकरी, चपाती, रोटी, भात, साखर, मीठ खाऊ शकत नाही. याचाच अर्थ धन लक्ष्मी आहे पण धान्य लक्ष्मीचा अभाव आहे. ग्रामीण भागात मुबलक धान्य असते. तेथील लोक दोन चार दिवस कोणालाही खायला-प्यायला घालायला हयगय करत नाहीत. येथे धन नसले तरी धान्य आहे. तेथील लोक छानपैकी खातात पण आणि खायला घालतात पण. शहरी लोकांच्या तुलनेत तेथील लोकांच्या आहाराची गुणवत्ता आणि प्रमाण देखील जास्त असते. त्यांची पचन क्षमता देखील चांगली असते. धान्याचा वापर आणि सन्मान करणे म्हणजेच धान्य लक्ष्मी. जगात सर्वत्र सर्वांना भोजन गरजेचे आहे. भोजन खराब करू नका, वाया घालवू नका. बहुतेकवेळा जेवढे भोजन बनते तेवढेच वाया जात असते, फेकून दिले जाते. इतरांना देत पण नाहीत. असे कदापि करू नका. भोजनाचा सन्मान करणे हीच धान्य लक्ष्मी होय.


धैर्य लक्ष्मी | Dhairya Lakshmi

घरी सर्व काही आहे-धन आहे, धान्य आहे, सारी संपन्नता आहे पण आपण भित्रे आहोत. श्रीमंत कुटुंबातील मुले बहुतेकवेळा भित्री असतात. हिम्मत म्हणजे धैर्य एक संपत्ती आहे. नोकरीतील लोक नेहमी आपल्या वरिष्ठांना घाबरून असतात. व्यापारी निरीक्षकांना घाबरून असतात. आम्ही नेहमी अधिकाऱ्यांना विचारतो कि तुम्हाला कसा सहाय्यक आवडेल – तुमच्या समोर नेहमी घाबरलेला कि धैर्याने जो तुमच्याशी संपर्क करेल? जो सतत तुमच्या समोर घाबरलेला असेल तो नेहमी खोटे बोलत राहील, खोट्या गोष्टी, सबबी सांगत राहील. अश्या व्यक्तीसोबत तुम्ही काम करू शकणार नाही. तुम्ही असा सहाय्यक पसंत कराल जो धैर्याने काम करेल आणि इमानदारीने तुमच्याशी बोलेल. हे लोक कां घाबरतात अधिकाऱ्यांसोबत? कां? कारण आपला आपल्या जीवनाशी संपर्क झालेला नाही आहे. आपल्या आंतमध्ये अशी शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे जी सतत आपल्या सोबत असते. हि धैर्य लक्ष्मी होय. धैर्य लक्ष्मी असली तरच जीवनात प्रगती होते. ज्या प्रमाणात धैर्य लक्ष्मी असेल त्या प्रमाणातच प्रगती होईल. व्यापार असो कि नोकरी, धैर्य लक्ष्मीची आवश्यकता असतेच.


संतान लक्ष्मी | Santana Lakshmi

अशी मुले जे प्रेमाचे पुंजी असतील, प्रेमाचे नाते असतील तर ती संतान लक्ष्मी होय. ज्या मुलांमुळे ताण तणाव येत नाही किंवा ताण कमी होतो ती संतान लक्ष्मी होय. ज्या मुलांमुळे सुख, समृद्धी, शांती मिळेल ती संतान लक्ष्मी होय. आणि ज्या मुलांमुळे भांडण, तणाव, त्रास, दुःख, पिडा होईल ती संतान लक्ष्मी नव्हे.


विजय लक्ष्मी | Vijaya Lakshmi

काही व्यक्तींच्या कडे सर्व साधन सुविधा असतात तरीदेखील ते जे काही करतील त्यात त्यांना यश मिळत नाही. जे काम हातात घेतील ते काम बिघडले म्हणून समजा, काम होणारच नाही. म्हणजे विजय लक्ष्मीची कमी आहे. बाजारातून काहीतरी आणायला गेले तर ते मिळणार नाही, रिक्षात बसतील तर रिक्षा बिघडेल, टॅक्सीने बाजारात पोहोचले तर दुकाने बंद झाली असतील. तुम्हाला असे वाटेल कि मी स्वतः जाऊन काम केले असते तर बरे झाले असते. अगदी छोटे काम देखील करू शकणार नाहीत. येथे विजय लक्ष्मी कमी असते. परिस्थिती तरी विपरीत असेल किंवा काही बहाणे तरी सांगतील. कोणत्याही कामात सफलता न मिळणे म्हणजे विजय लक्ष्मीची कमतरता.


राज लक्ष्मी | Raj Lakshmi

राज लक्ष्मी म्हणा किंवा भाग्य लक्ष्मी म्हणा दोन्ही एकच आहेत – सत्ता. एखादी व्यक्ती मंत्रिपद प्राप्त करून काहीही सांगायला, बोलायला लागला तरी त्याचे कोणीही ऐकत नाही. त्याची सत्ता कोणीही मान्य करत नाही. बऱ्याच कार्यालयात देखील असे दिसते. मालकाचे कोणीही ऐकत नाही पण क्लार्कचे ऐकतात. त्याचा हुकुम चालतो. एका ट्रेड युनियनच्या प्रमुखाजवळ जितकी राज लक्ष्मी असते तेवढी शहरातील मिल मालकाकडे नसेल. शासन करण्याची क्षमता म्हणजे राज लक्ष्मी.


हे आठ प्रकारचे धन एक दुसऱ्याशी संलग्न आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे हे आठ हि धन कमी अधिक प्रमाणात असतात. आपण त्यांचा किती सन्मान करतो, वापर करतो ते आपल्यावर अवलंबून आहे. या आठ लाक्ष्मींचे नसणे याला अष्ट दारिद्र्य म्हणतात. लक्ष्मी असो किंवा नसो - नारायण नक्की प्राप्त होतील. कारण नारायण दोन्हीत आहेत. लक्ष्मी नारायण आणि दरिद्री नारायण.

दरिद्री नारायणाला भोजन दिले जाते तर लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते. साऱ्या जीवनाचा प्रवाह हा दारिद्र नारायणाकडून लक्ष्मी नारायणाकडे, दुःखाकडून समृद्धीकडे आणि जीवनातील रुक्षपणाकडून अमृताकडे जात असतो.

श्री लक्ष्मी अष्टोत्तर शतनाम / शतनामावली स्तोत्रं | Lakshmi Ashtotharam Shatnamavali

आपली पसंती आणि प्रतिक्रिया webteam.india@artofliving.org येथे नोंदवा.