तोंड आल्यामुळे तोंडात असह्य वेदना होतात आणि त्याकडे बऱ्याचदा अनेक दिवसांपर्यंत दुर्लक्ष केले जाते. यात ओठ, जीभ, गालाची आतील बाजू, हिरड्या किंवा तोंडाच्या आत टाळ्यावर व्रण किंवा जखमा होतात. जरी हा आजार नसला तरी त्याच्या मूळ कारणामुळे अनेक समस्या उदभवू शकतात.

तोंडाच्या अल्सरची कारणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकतात. अप्रत्यक्ष कारणे तुम्हाला काही अंतर्गत व न दिसणाऱ्या आजाराची जाणीव करुन देतात.
शीतली प्राणायाम
तोंडाच्या अल्सरचे एक कारण शरीरातील उष्णता हे आहे.शीतली प्राणायामामुळे शरीराचे तापमान थंड होण्यास मदत होते.यामुळे पचन चांगले होण्यास मदत होते. शीतली प्राणायाम करण्याचे टप्पे खाली दिले आहेत:
- सपाट जागेवर पायाची मांडी घालून बसा.
- तुमचे हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत ठेवा.
- आरामात बसा आणि तुमच्या जीभेचा आकार नळीसारखा करा.
- जीभेजवळून श्वास आत घ्या आणि नंतर तोंड बंद करा.
- नाकपुड्यातून हळूहळू श्वास सोडा आणि तापमानात होणारा बदल जाणून घ्या.
- अशाच प्रकारे पुढच्या फेऱ्या करा.
शीतकरी प्राणायाम
हा प्राणायाम मन आणि शरीर शांत करतो, शरीरातील अग्नि तत्व (पित्त) संतुलित करतो आणि संपूर्ण शरीरातील विषकण काढून टाकतो. शीतकरी प्राणायाम करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:
- सपाट जागेवर आरामात बसा.
- आपले तळवे गुडघ्यांवर ठेवा.
- आरामशीर बसा, डोळे बंद करा आणि तुमच्या जीभेने टाळ्याला स्पर्श करा.
- दात एकावर एक ठेवा आणि तोंड उघडे ठेवा.
- आता तोंडातून हळूहळू श्वास घ्या, तसे करताना स्स… असा आवाज करा.
- शक्य तितका वेळ तुमचा श्वास रोखून ठेवा.
- आपली मान खाली वाकवा आणि नाकातून श्वास सोडा.
- हीच प्रक्रिया परत करुन पुढील फेऱ्या करा.

सूर्य नमस्कार
सूर्य नमस्कार हा सर्वात लोकप्रिय योगप्रकार आहे ज्यात अनेक आसने एकत्र केली जातात. तोंडाचा अल्सर जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होऊ शकतो, यासाठी सूर्य नमस्कार नियमितपणे केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि तोंडाचा अल्सर टाळता येतो. पाठदुखी, क्षीण चयापचय, ताण आणि चिंता, त्वचेच्या समस्या, मासिक पाळीच्या समस्या अशा अनेक समस्यांसाठी हा एकच उपाय लागू पडतो.

सेतू बंधासन
सेतू बंधासन हे आणखी एक योगासन आहे जे विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि तोंडात होणाऱ्या अल्सरला प्रतिबंध करते. या आसनामुळे छाती आणि फुफ्फुसे मोकळी होतात आणि मन शांत होते. रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि ताण, चिंता आणि नैराश्य अशा प्रकारच्या समस्या दूर होतात.
निष्कर्ष
खाली दिलेल्या प्रचलित घरगुती उपायांनी सुद्धा तुम्ही तोंड येण्याचा आजार नैसर्गिकरित्या लवकर बरा करु शकता:
- मध
- नारळाचे तेल
- कोरफड जेल
- व्हिनेगर
- तुळशीचे तेल
- हळदीची पेस्ट
या व्यतिरिक्त, भरपूर पाणी प्या आणि आनंदी राहण्याचे लक्षात ठेवा, तोंडाची स्वच्छता राखा,तसेच मसालेदार आणि जंक फूड टाळा. ध्यान आणि सुदर्शन क्रियेने आपले भावनिक संतुलन आणि मनाची शांती राखा.
“समस्यांना तोंड देण्यासाठी स्वतःला सज्ज करण्याकरिता मनाची शांती हा पहिला टप्पा आहे. एकदा तुम्हाला शांती आणि आंतरिक शक्ती मिळाली की तुम्ही कोणत्याही समस्येचा सामना करु शकता.नंतर तुम्हाला ती समस्याच वाटणार नाही.”
~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर












