केस गळणे कसे कमी करावे, हे अनेकांसाठी एक आव्हान आहे
दोन दशकांपूर्वी, केस गळणे हे मध्यम वयीन जीवनातील तक्रारींशी संबंधित होते. पुरुष किंवा स्त्रिया दोन्हींसाठी केस गळणे हे “निवृत्तीची तयारी करण्याचे लक्षण” म्हणून ओळखले जात असे. मागील पिढ्यांमध्ये हे खरे होते कारण, आजच्या सारखी त्या काळात वयाच्या चाळिशीत केसगळती सुरु होत नव्हती!
तथापि, रोजच्या जीवनातील वाढता ताणतणाव, अन्नाची खालावलेली गुणवत्ता, धुम्रपानासारख्या हानिकारक जीवनशैलीच्या सवयी, अनुवंशिक विकार यामुळे पूर्वीपेक्षा लहान वयात केस गळण्यास सुरुवात होते.
तरीही प्रयत्न करण्यासारखे काही मार्ग आहेत जे केस गळणे लक्षणीयरित्या कमी करु शकतात आणि केस गळती थांबवू शकतात. त्यापैकी दोन म्हणजे योगासने आणि प्राणायाम. या दोन्हीच्या नियमित आणि परिश्रमपूर्वक सरावाने केसांच्या वाढीस चालना मिळते, असा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे.
पुढे वाकून करावयाच्या सर्व आसनांमुळे डोक्याच्या भागात रक्तप्रवाह वाढतो आणि सामान्य रक्ताभिसरण देखील वाढते. टाळूच्या भागाचे आरोग्य चांगले राहून केसांची वाढ छान होते. त्यासाठी खाली दिलेली आसने व प्राणायाम उपयुक्त आहेत. सर्वोत्तम फायदा मिळण्यासाठी यांचा नियमित सराव करावा.
केस गळणे नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी योगासने व प्राणायाम
- अधोमुख श्वानासन
- उत्तानासन
- पवनमुक्तासन
- सर्वांगासन
- वज्रासन
- कपालभाती प्राणायाम
- भस्त्रिका प्राणायाम
- नाडी शोधन प्राणायाम
१. अधोमुख श्वानासन

हात व पाय जमिनीवर ठेवून कुत्र्याप्रमाणे उभे रहा. कोपर आणि गुडघे सरळ असावेत. आता, नितंब बाहेर ढकलून पोट आत खेचा म्हणजे शरीराचा उलटा V आकार बनवा. पायात नितंबांइतके आणि हातांमध्ये खांद्याइतके अंतर असावे. मान लांब करा आणि तळवे जमिनीवर दाबा. काही श्वासांसाठी ही स्थिती धरा.
अधोमुख श्वानासनामुळे डोक्याकडे रक्ताभिसरण वाढते. सायनसचा भाग क्रियाशील झाल्याने याने सर्दी बरी होते. हे निद्रानाश, नैराश्य आणि मानसिक थकवा यावर देखील उपयुक्त आहे.
२. उत्तानासन
डोक्यावर हात उंच करुन किंवा ताडासनात उभे रहा. पाठीचा कणा सरळ असावा आणि पायांमध्ये काही इंचांचे अंतर असावे. श्वास आत घ्या आणि पाठीचा कणा ताठ करा. श्वास बाहेर सोडा, पार्श्वभाग मागे करा आणि पुढे वाकून हात जमिनीच्या दिशेने न्या. पाय आणि पाठीवर कोणताही ताण पडू नये म्हणून गुडघे थोडे वाकवू शकता. शक्य असल्यास बोटांच्या टोकांनी जमिनीला स्पर्श करा. शरीराचे वजन पायाच्या तळव्यावर येईल असा प्रयत्न असावा. काही श्वास या स्थितीत रहा आणि नंतर आराम करा.
हे आसन शीण आणि थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
३. पवनमुक्तासन

पाठीवर सरळ झोपा. एक श्वास आत घ्या आणि उजवा गुडघा छातीकडे न्या आणि दोन्ही हातांनी धरा. श्वास सोडताना, कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने न्या. काही सेकंद या स्थितीत राहा, हळुवारपणे श्वासोच्छवास चालू ठेवा. श्वास आत घ्या आणि डोके मागे ठेवा. श्वास सोडताना उजवा पाय परत जमिनीवर ठेवा. डाव्या पायाने सुद्धा याच क्रमाने करा. शेवटी दोन्ही पायांनी ही प्रक्रिया पुन्हा करा.
पवनमुक्तासनामुळे पोटात साठलेला वात बाहेर पडण्यास मदत होते, पचन सुधारते.
४. सर्वांगासन

पाठीवर सरळ झोपा. दोन्ही पाय वरच्या दिशेने उंच करा जेणेकरून खालचे शरीर थोडेसे उंचावेल. दोन्ही तळवे पाठीच्या खालच्या भागावर आणि नितंबाच्या भागावर घट्ट दाबून ठेवा, अशा प्रकारे तळवे पाठीला आधार देत आहेत. आता, आपल्या हातांच्या मदतीने आणि आधाराने, एकाच वेळी पाय उंच करताना पाठीचा खालचा भाग वरच्या दिशेने सरकवा. शरीराचे संपूर्ण वजन खांदे आणि हात यांच्या आधारावर आहे. खाली येताना हाताच्या साहाय्याने पाठ हळू हळू खाली येऊ द्या आणि नंतर हळू हळू पाय जमिनीवर येऊ द्यात.
शरीर खाली पडू देऊ नका कारण त्यामुळे धक्का बसू शकतोआणि/किंवा पाठदुखी होऊ शकते. ज्या लोकांना हे आसन करायला जमणार नाही ते सेतुबंधासन करु शकतात.
आसनातून बाहेर आल्यानंतर आपल्या टाळूला थोडासा मसाज करा जेणेकरुन केसांच्या मुळांना चालना मिळेल आणि तेथील रक्त प्रवाह वाढेल. या आसनामुळे मज्जासंस्था, जननेंद्रिये आणि श्वसन प्रणाली यांची कार्ये व्यवस्थित होतात. थायरॉईड ग्रंथी ताज्यातवान्या होतात. शिवाय, मेंदूकडे रक्तप्रवाह वाढतो. सर्वांगासन कसे करावे याबद्दल अधिक वाचा.
५. वज्रासन
इतर आसने जेवणानंतर लगेच करु नयेत, पण वज्रासन जेवणानंतर लगेच करु शकता. फक्त गुडघे वाकवून नितंबांवर बसा. तळव्याच्या बाजू शक्य तितक्या जवळ ठेवाव्यात. पाठीचा कणा आणि पाठ सरळ असावी. स्थिर लयीत मोठे श्वास घ्या. या आसनात २ ते ८ मिनिटे बसा.
वज्रासनामुळे पोटातील वात कमी होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते. वजन कमी होण्यास आणि मूत्रविकार बरे होण्यास मदत होते.
चांगल्या केसांसाठी उपयुक्त प्राणायाम
केसगळतीमुळे ग्रस्त असलेल्या बहुतेक लोकांची ही तक्रार असते की तणाव हा एक मोठा घटक आहे ज्यामुळे घनदाट केस पातळ होतात. ही अवस्था फारच भयानक असते. योगासनांबरोबर प्राणायाम हा तणावावरचा सर्वोत्तम उतारा असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय, केसांची वाढ होण्यापुरता हा केवळ एक प्रभावी मार्ग नाही, तर त्यामुळे तुमचे एकंदर स्वास्थ्य सुधारण्यासही मदत होते.
६. कपालभाती

“सुखासन” किंवा “वज्रासन” मध्ये बसा. तुमचा उजवा हात नाभीवर ठेवा आणि शिथिल राहा. त्यानंतर, पोट आतल्या बाजूला ओढा आणि नाकातून हवा सोडा. पोटाच्या स्नायूंच्या शिथिलतेमुळे हवा शरीरात परत येऊ द्या आणि नंतर जोरदार उच्छवास सोडा. असे १५ ते २० वेळा करा आणि मग आराम करा. अशा दोन ते तीन फेऱ्या करा.
या प्राणायामामध्ये मेंदूच्या पेशींना जास्त ऑक्सिजन मिळतो. हे मज्जासंस्थेसाठी फायदेशीर आहे, लठ्ठपणा कमी होतो, मधुमेह बरा होतो आणि शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर पडतात.
कपालभाती बद्दल अधिक जाणून घ्या.
७. भस्त्रिका प्राणायाम
सुखासनात बसावे. हाताच्या हलक्या मुठी बनवा आणि खांद्याजवळ आणा, हाताची कोपरे बाजूला ठेवा. शरीर सरळ आणि आरामशीर असावे. जोरात श्वास घेऊन, हात वर घ्या आणि मुठी उघडा. जोराने श्वास सोडत, तळवे पुन्हा समोरच्या मुठीत वळवून हातांना सुरुवातीच्या स्थितीत येऊ द्या. असे १२ ते १५ वेळा करा. अशा दोन ते तीन फेऱ्या करा, प्रत्येक फेरीनंतर थोडा वेळ विश्राम करा.
भस्त्रिका प्राणायामामुळे मेंदूच्या पेशींना जादा प्राणवायू मिळतो, त्यामुळे मज्जासंस्थे साठी फायदेशीर आहे. तसेच शरीरातील अतिरिक्त पित्त, वात आणि कफ निघून जाण्यास मदत होते.
८. नाडी शोधन प्राणायाम

उजव्या हाताची पहिली दोन बोटे भुवयांच्या मध्ये ठेवा. उजवी नाकपुडी अंगठ्याने हळुवारपणे बंद करा, डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. श्वास थांबवून, अनामिका ठेवून डावी नाकपुडी बंद करा आणि उजवीकडून श्वास सोडा. डावी नाकपुडी बंद ठेवून उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. श्वास थांबवून उजवी नाकपुडी दाबा आणि डावीकडून श्वास सोडा. हे १०-१५ वेळा पुन्हा करा आणि नंतर विश्रांती घ्या.
नाडीशोधन प्राणायामाचा तणाव, अर्धशिशी (मायग्रेन), नैराश्य, संधिवात, दमा, हृदयाच्या समस्या आणि कधीकधी अगदी डोळ्यांच्या समस्या सुद्धा बऱ्या व्हायला उपयोग होतो.
आजकाल बहुतेक प्रकरणांमध्ये असे दिसून येते की तणाव आणि जीवनशैलीच्या इतर कारणांमुळे केस गळणे सुरु होते.
याचा अर्थ केस गळणे हे एखाद्या मोठ्या दडलेल्या समस्येचे पहिले लक्षण असू शकते. नमूद केलेली आसने केवळ निरोगी शरीरासाठीच योगदान देत नाहीत तर केस गळती अनुभवत असलेल्या कोणालाही प्रभावीपणे मदत करु शकतात. जीवनशैलीत हे बदल केल्याने मूलगामी समस्यांना तोंड देण्यासही मदत मिळू शकते.
ब्लड प्रेशरअसो, केस गळणे असो किंवा सतेज कांती हवी असणे असो, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मेडिटेशन आणि ब्रेथ वर्कशॉपमध्ये शिकवल्या जाणाऱ्या प्रक्रिया यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. पण थांबा, अजून बरेच काही आहे. उत्तम आरोग्य आणि आंतरिक मुक्ती सुद्धा!!
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञानविषयक भाषणांवर आधारित.
श्री श्री आयुर्वेद पंचकर्म, बेंगळुरु येथील डॉ.अश्विन पटेल यांनी दिलेल्या माहितीसह.