भगवान शिवाची अनेक रुपे आणि अवतार (भौतिक शरीर स्वरुपात देवतेचे प्रकटीकरण) आहेत. त्याचे मूळ तपस्वी स्वरुप सर्वत्र पूजनीय  असले तरी त्यांचे पशुपतीनाथ आणि विश्वनाथ अवतारही प्रसिद्ध आहेत. परंतु भगवान शिवाच्या सर्वात भीतीदायक अवतारांपैकी एक म्हणजे कालभैरव. कालभैरव अष्टकामध्ये आदि शंकराचार्यांनी वर्णन केलेले शिवाचे हे रूप नग्न, काळे, कवटीच्या माळा, तीन डोळे, चार हातात संहारक शस्त्रे आणि सापांनी वेढलेले असे दाखवले आहे.

ज्याची अनेक लोक दररोज प्रार्थना करतात अशा भगवान शिवाच्या वैराग्यपूर्ण, शांत आणि ध्यानमग्न  स्वरुपाशी या स्वरुपाचे चित्रण विसंगत वाटू शकते, परंतु कालभैरवाशी संबंधित एक खोल प्रतिकात्मकता आहे. ते काय आहे हे जाणून घेण्याआधी आपण प्रथम कालभैरव अष्टकाचे श्लोक वाचू या.

कालभैरव: स्वरुपाचा अर्थ

कालभैरवाचे वाहन श्वान आहे. हे भगवान शिवाचे सर्वात भयावह चित्रण आहे. कालभैरव हा मृत्यू/काळाचा स्वामी आहे. आध्यात्मात ‘मृत्यू’ आणि ‘काळ’ हे शब्द प्रतिकात्मक आहेत. श्वा आणि न या दोन शब्दांपासून श्वान तयार झाला आहे. वैदिक वाङ्मयात, श्वाचा अर्थ उद्या आणि काल असा आहे आणि न चा अर्थ नाही. तर श्वान म्हणजे काल किंवा उद्या नसलेली गोष्ट, जे फक्त आत्ता, या वर्तमान क्षणात आहे.

“कालभैरव” मागील आध्यात्मिक प्रतिकात्मकता

म्हणून कालभैरव असा आहे जो काल नव्हता आणि उद्या नसणार. तो आत्ताच्या या क्षणात कायम उपस्थित आहे. तसेच भगवान कालभैरव  काशी नगरीचा  स्वामी आहे . याचा लाक्षणिक अर्थही आहे. तंत्र विद्येमध्ये काशीला भुवयांच्या दरम्यान स्थित आज्ञा चक्र म्हणून ओळखले जाते.

कालभैरवाचे चित्रण विक्राळ (मोठे आणि भयानक) आहे. ते सूचित करते की काळ सर्व काही खाऊन टाकतो. या जगात जे काही आहे ते काळाबरोबर  विसर्जन पावेल आणि नष्ट होईल. हजारो वर्षांपूर्वी येथे असलेले राजे आणि साम्राज्ये, सध्या अस्तित्वात असलेल्या अचंबित करणाऱ्या गोष्टी आणि भविष्यात येणारे सर्व काही – हे सर्व कालांतराने नष्ट होणारच.

आणि काळ कुठे आहे? तो भूतकाळात किंवा भविष्यकाळात नाही. आता या क्षणात आहे. आणि जेव्हा ही काळ आणि वर्तमान क्षणाची जाणीव होते, तेव्हा आपले आज्ञा चक्र (आपल्या शरीरातील ज्ञानाचे अधिष्ठान) प्रभावी  होते, जे आपल्यामध्ये भगवान कालभैरवाचे अस्तित्व दर्शवते. हे आपल्याला समाधीच्या (ध्यानाच्या) सर्वात खोल अवस्थेकडे घेऊन जाते ज्याला भैरवाची अवस्था असे देखील म्हणतात.

कालभैरव अष्टकामध्ये,आदि शंकराचार्यांनी भगवान कालभैरवाचे  काशीचा स्वामी म्हणून वर्णन केले , त्याचा वास्तविक अर्थ आज्ञा चक्र – वर्तमान क्षणाची संपूर्ण जाणीव दर्शवणारा – असा आहे. याची अभिलाषा सर्व देवता (दैवी शक्ती) यांना देखील आहे. आदि शंकराचार्य म्हणतात की, त्या आनंदासाठी आणि समाधीसाठी आतुर असलेल्या त्या दैवी शक्तींचे  स्वामीसुद्धा कालभैरवाच्या चरणी नतमस्तक होतात.

कालभैरव अष्टक पठण करण्याचे फायदे

कालभैरवाच्या अवस्थेचे स्मरण करुन, कालभैरव अष्टकाचे  दररोज पठण केल्याने आपल्याला जीवनाचे ज्ञान मिळते आणि आपल्याला मुक्ती मिळते. आपल्याला अज्ञात, न समजण्याजोगे आणि अमूर्त गुण प्रदान केले जातात. या अष्टकाचे पठण केल्याने शोक (दुःख), मोह (आसक्ती आणि भ्रम, दुःखाची कारणे), दैन्य (गरिबी किंवा अभावाची भावना), लोभ (हव्यास), कोप (चिडचिड आणि क्रोध) आणि ताप (व्यथा ) यापासून मुक्ती मिळते.

भगवान कालभैरवाचे वर्णन भूत संघ नायक – पंचभूतांचे ( पृथ्वी, अग्नी, पाणी, वायु आणि आकाश ) स्वामी आहेत असे केले जाते. तो जीवनातील अभिलाषा असलेल्या सर्व प्रकारच्या उत्कृष्ट गोष्टी ,आपल्याला पाहिजे असलेले सर्व ज्ञान देणारा आहे. शिकणे आणि उत्तम प्राप्त होणे  यात फरक आहे आणि या आनंदी स्थितीमुळे  माणसाला सर्व उत्तम गोष्टी प्राप्त होतात . कालभैरवाचे स्मरण केल्याने, व्यक्ती समाधीच्या गहन अवस्थेत असलेला आनंद प्राप्त करते, जिथे तुम्ही सर्व चिंतांपासून मुक्त असता – कशाचीही पर्वा न करता.

कालभैरव अष्टक- श्लोक आणि अर्थ

देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्। 

नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥१॥

काशीचे सर्वोच्च स्वामी, ज्याच्या चरणकमलांना देवांचा राजा भगवान इंद्र पूजितो; सर्प हे ज्याचे जानवे आहे, ज्याच्या डोक्यावर चंद्र आहे आणि जो अत्यंत दयाळू आहे; ज्याची देवांचे ऋषी नारद, देव आणि इतर योगी स्तुती करतात; जो दिगंबर आहे, ज्याने आकाश वस्त्र म्हणून धारण केले आहे; जे मुक्त अस्तित्वाचे प्रतीक आहे, अशा भगवान कालभैरवाला वंदन !

भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम्।

कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥२॥

लाखो सूर्याचे तेज असलेला , भक्तांना पुनर्जन्माच्या चक्रातून वाचवणारा ,आणि जो  सर्वोच्च आहे, अशा काशीच्या  परम स्वामी भगवान कालभैरवाला नमस्कार असो; ज्याचा कंठ निळा आहे, जो आमच्या  इच्छा पूर्ण करतो आणि ज्याला तीन डोळे आहेत; जो  मृत्युसाठीही मृत्यु आहे आणि ज्याचे डोळे कमळासारखे दिसतात; ज्याचा त्रिशूळ जगाला आधार देतो आणि जो अमर आहे, अशा भगवान कालभैरवाला वंदन !

शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम्।

भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥३॥

काशीचे परम स्वामी, ज्याच्या हातात त्रिशूळ, खुरपे, दोरीचा फास, आणि दंड आहे; ज्याचे शरीर काळेशार आहे, जो आदिम परमेश्वर आहे, जो अमर आहे आणि जगाच्या रोगांपासून मुक्त आहे; जो प्रचंड पराक्रमी आहे आणि ज्याला अप्रतिम तांडव नृत्य आवडते, अशा भगवान कालभैरवाला वंदन !

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम्।

विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥४॥

काशीचा  परात्पर स्वामी, इच्छा आणि मोक्ष दोन्ही प्रदान करणारा ,ज्याचे स्वरुप प्रसन्न आहे, अशा भगवान कालभैरवाला नमस्कार असो; जो आपल्या भक्तांवर प्रेम करणारा आहे, जो सर्व जगाचा देव म्हणून स्थिर आहे; ज्याने कंबरेला सोन्याचा पट्टा घातला आहे,  तो हलल्यावर त्यातील घंटांचा  मंजुळ आवाज होतो ,अशा भगवान कालभैरवाला वंदन !

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम्।

स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥५॥

काशीचा परम स्वामी, जो धर्म टिकेल याची खात्री देतो, जो अधर्माचा नाश करतो; जो आपल्याला कर्माच्या बंधनातून वाचवतो, त्याद्वारे आपला आत्मा मुक्त करतो; आणि ज्याच्या शरीराभोवती सोनेरी रंगाचे साप लपेटलेले आहेत, अशा भगवान कालभैरवाला वंदन !

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम्।

मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥६॥

काशीचा सर्वश्रेष्ठ स्वामी, ज्याच्या चरणी रत्नजडित सोन्याच्या दोन पादुका शोभत आहेत, त्याला नमस्कार असो; जो शाश्वत, अद्वैत इष्ट देवता आहे (आपल्या इच्छा पूर्ण करणारा देव आहे); जो यमाचा (मृत्यूच्या देवाचा) अभिमान नष्ट करतो; ज्याचे भयंकर दात आपल्याला मुक्त करतात, अशा भगवान कालभैरवाला वंदन !

अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम्।

अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥७॥

काशीचा  परम स्वामी, ज्याच्या मोठ्या गर्जनेने कमळातून जन्मलेल्या ब्रह्मदेवाच्या सृष्टीच्या आवरणांचा (म्हणजे आपल्या मनातील भ्रमाचा) नाश होतो; ज्याची दृष्टी आपल्या सर्व पापांचा नाश करण्यासाठी पुरेशी आहे; जो आपल्याला आठ सिद्धी (अष्ट सिद्धी) देतो; आणि जो कवटीचा हार घालतो, अशा भगवान कालभैरवाला वंदन !

भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम्।

नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥८॥

काशीचा  सर्वोच्च स्वामी, जो  भूत पिशाच्चांचा पुढारी आहे , जो  कीर्ती देणारा आहे; जो काशीच्या लोकांना त्यांच्या पापी आणि धार्मिक कृत्यांपासून मुक्त करतो ; जो आपल्याला धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करतो,जो  विश्वाचा  सर्वात प्राचीन (शाश्वत) स्वामी आहे, अशा भगवान कालभैरवाला वंदन !

कालभैरवाष्टकं पठंति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम्।

शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिं नरा ध्रुवम्॥९॥

काशीच्या  सर्वश्रेष्ठ स्वामी कालभैरवाला वंदन ! हे कालभैरव अष्टक, जे सुंदर आहे, जे ज्ञान आणि मुक्तीचा स्त्रोत आहे, जे मनुष्यामध्ये विविध प्रकारची  धार्मिकता वाढवते, जे दुःख, आसक्ती, दारिद्र्य, लोभ, क्रोध आणि ताप नष्ट करते, अशा या कालभैरव अष्टकाच्या आठ श्लोकांचे जो पठण करेल, तो (मृत्यूनंतर) भगवान कालभैरवाच्या (भगवान शिवाच्या ) चरणी लीन होईल.

कालभैरव अष्टकम व्हिडिओ

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *