आपल्या सर्वांना आयुष्यात कधी न कधी पित्ताचा त्रास झालेला आहे. अति तिखट – तेलकट, खारट, मसालेदार तसेच अति गोड पदार्थ, या पित्त वाढण्यासाठी पूरक असणाऱ्या गोष्टींच्या सेवनाने हा त्रास झाला असू शकेल. कॉफी, तंबाखू आणि मद्य यांच्या अति सेवनाने ही समस्या गंभीर बनली असेल. पित्त खवळण्याची आणखी एक शक्यता म्हणजे रात्री जेवणानंतर त्वरित झोपणे. या सर्व सवयींशिवाय दैनंदिन जीवनातील ताण तणाव हेही एक कारण आहे पित्त वाढण्याचे.
पित्त वाढले आहे,हे कसं ओळखावं ? अनेक लक्षणे आहेत. अस्वस्थता आणि छातीत जळजळणे. मळमळणे, उलट्या होणे, बद्धकोष्ठता. ही लक्षणे वेदनादायी आणि त्रासदायक असतात. पित्ताच्या या लक्षणांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि पित्त वाढू नये यासाठी अनेक उपाय आहेत.
पित्ताचा त्रास कायमचा बरा करण्यासाठी योग
पित्ताचा त्रास नैसर्गिकपणे कमी होण्यासाठी योग ही प्रभावी उपचार पद्धती आहे. वाढणाऱ्या पित्ताचा त्रास त्वरित कमी करण्याबरोबरच आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील योग ही एक अत्यंत सोपी उपचार पद्धती आहे. यात पाच योग प्रक्रिया आहेत.
१.वज्रासन

वज्रासन हे असे योगासन आहे की जे केल्याने आपल्या पोटातील आणि आतड्यातील रक्त प्रवाह वाढतो. यामुळे जरी आपली पचन संस्था पुरेशी कार्यक्षम नसली तरी या आसनामुळे अन्न पचनास चांगली मदत होते.
२.पवनमुक्तासन

पवनमुक्तासनाच्या सततच्या सरावाने आंतड्यातील हालचालींना चालना मिळते. शरीरातील मल आणि विषारी द्रव्ये पचन संस्थेतून बाहेर पडण्यासाठी ही हालचाल आवश्यक असते.
३.नाडी शोधन प्राणायाम
या प्रक्रियेमुळे शरीरामध्ये त्वरित उर्जा प्रवाहित होते आणि ताण तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. सकाळी,मोकळ्या हवेत आणि पोट मोकळे असताना ही प्रक्रिया करणे योग्य आहे.
नाडी शोधन प्राणायामाबद्दल आणखी माहिती मिळावा.
४.कपालभाती प्राणायाम
कपालभाती प्राणायामाबद्दल माहिती करुन घ्या.

पोटाच्या वेगवेगळ्या तक्रारींसाठी, लठ्ठपणा आणि पचनक्रियेमधील बिघाड यासाठी कपालभाती अत्यंत परिणामकारक आहे.
५ .उष्ट्रासन

उष्ट्रासन हे खास करुन पाठ दुखीवर फार चांगले आहे. यामुळे मन शांत, निवांत होऊन रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. श्वसन प्रक्रिया, अंतःस्त्रावग्रंथी आणि मज्जासंस्था यासाठी हे आसन उत्कृष्ट आहे.
पित्ताचा त्रास आणि त्याचे दुष्परिणाम यावर मात करण्यासाठी या योग प्रक्रियांचा दैनंदिन सराव अत्यंत लाभदायक ठरतो, हे सिद्ध झाले आहे.
पित्ताचा त्रास आणि पोट फुगण्यावर काही घरगुती उपाय
खरे तर, पित्ताच्या समस्येसाठी योग हा उत्कृष्ट मार्ग आहे.आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करुन आणि योग्य खाण्याच्या सवयी लावून घेऊन आपण पित्त विकारांवर पूर्णपणे मात करु शकतो.
- आपल्या आहारात फळे आणि कच्च्या भाज्यांचा समावेश करा.
- तेलकट आणि मसालेदार खाणे कमी करा.
- गोड खाणे कमी करा.
- रात्री जेवल्यानंतर त्वरित झोपू नका.
- चहा, कॉफी यांचे सेवन कमी करा.
- मद्यपान आणि धुम्रपान करु नका.तंबाखू सेवन टाळण्याने पित्त निवारणास मदत होते.
- पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. तसेच ताजे ताक, नारळ पाणी यासारखी पेये घ्या.













