“दहा वर्षांपूर्वी, शालेय पाठ्यपुस्तकांमधूनच मला थायरॉईड विकाराची माहिती मिळाली होती. सात वर्षांपूर्वी थायरॉईड विकार मला झाला , तोपर्यंत माझ्या मते हा केवळ एक वैद्यकीय आजार होता जो बाहेरच्या जगातील कुणालाही होऊ शकतो. तेव्हाच मला पहिल्यांदाच असे वाटले की हा विकार खरोखरच कोणालाही होऊ शकतो, अगदी मलाही ! सुरुवातीला, मी थोडी घाबरले होते, परंतु एकदा मला योग आणि आयुर्वेद हे सुरक्षित आणि सोपे थायरॉईड उपचाराचे पर्याय आहेत असे समजले, म्हणून मी आता त्याबद्दल फारसा विचारही करत नाही. जीवन नेहमीप्रमाणेच सामान्य आहे आणि दैनंदिन योगाभ्यासामुळे ते अधिक चांगले झाले आहे, ज्यामुळे मला या विकाराच्या लक्षणांचा सामना करण्यास मदत झाली.”
– निखिला सिंग, २००६ पासून हायपोथायरॉईडीझमची रुग्ण.
थायरॉईड विकार: एक सामान्य समस्या
होय, उच्च रक्तदाब आणि मधुमेहानंतर थायरॉईड विकार आजकाल घराघरात परिचित झाला आहे. अमेरिकन थायरॉईड असोसिएशन (एटीए) नुसार, अमेरिकेत सुमारे २ कोटी लोकांना कोणता ना कोणता थायरॉईडचा विकार आहे आणि यापैकी किमान ६०% लोकांना याची माहितीही नाही. तसेच, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे मानले जाते. थायरॉईड विकारांचे एक प्रमुख कारण म्हणजे आपण अनुसरत असलेली तणावपूर्ण जीवनशैली.
आज थायरॉईड विकारांचे प्रमाण वाढत असले तरी, रुग्णांसाठी उपचाराचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात, प्रत्येक उपचाराचे परिणाम दिसण्यासाठी वेळ लागेल, परंतु त्याचवेळी, तुमच्याकडे खुश होण्यासारखे काहीतरी आहे. योग आणि ध्यान थायरॉईडवर नैसर्गिकरित्या उपचार करण्यास मदत करु शकतात. दररोज काही मिनिटे योगाभ्यास केल्याने ताण कमी होण्यास मदत होते आणि तुमचे जीवन सुरळीत आणि आनंदी बनते.
आता, थायरॉईड विकार अनेक प्रकारचे असू शकतात, परंतु त्यापैकी दोन सर्वात जास्त आढळतात:
- हायपोथायरॉईडीझम (कमीक्रियाशील थायरॉईड)
- हायपरथायरॉईडीझम (अतिक्रियाशील थायरॉईड)
तुम्हाला कोणत्या प्रकारच्या थायरॉईड विकाराने ग्रासले आहे हे तुमच्या डॉक्टरांकडून तपासणे आवश्यक आहे. काही विशिष्ट लक्षणे दोन्ही प्रकारच्या थायरॉईडची असू शकतात, परंतु कोणताही उपचार सुरु करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलून खात्री करुन घ्या.
तुम्हाला हायपोथायरॉईडीझम असू शकतो जर:
- तुम्हाला दैनंदिन कामात रस नसल्यासारखे वाटत असेल, सुस्त वाटत असेल आणि प्रत्येक गोष्टीत ‘राहू देत‘ अशी वृत्ती निर्माण होत असेल.
- तुम्ही नेहमीप्रमाणेच नियमित काम करत असाल परंतु नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवू लागला असेल.
- आपल्याला बद्धकोष्ठता का होते हे तुम्हाला समजत नाही.
- तुमच्या मित्रांना अचानक तुमचे वजन वाढल्याचे लक्षात आले आहे आणि तुम्ही जास्त खात नाही आहात असे तुम्हाला वाटते, म्हणून तुम्ही त्याचे योग्य कारणही सांगू शकत नाही.
- आजकाल तुम्ही जेव्हा आरशात स्वतःकडे पाहता, तुमचा चेहरा सुजलेला दिसतो.
- तुमचे लांब, जाड केस अचानक पातळ होऊ लागले आहेत आणि घरात सर्वत्र केसांचे पुंजके पसरलेले आहेत हे पाहून तुम्हाला अस्वस्थ वाटत आहे.
- तुमची मासिक पाळी अनियमित आहे (यामागे इतरही कारणे असू शकतात; तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.)
- तुमच्या चेहऱ्यावर जास्त केस वाढताना दिसत आहेत,जे लाजिरवाणे होत आहे.
- तुम्हाला तुमचा घसा सुजलेला दिसतो. नक्कीच, डॉक्टरांना भेटण्याची वेळ आली आहे.
थायरॉईड उपचारांसाठी योग
थायरॉईड विकारांसाठी योगासने सुरु करण्यापूर्वी, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, या योग तंत्रांमुळे लक्षणांचा चांगल्या प्रकारे सामना करणे शक्य होते. पण ही औषधांना पर्याय नाहीत. (जरी काही केसेसमध्ये काही काळ सातत्यपूर्ण योगासने केल्याने औषधांची गरज कमी होऊ शकते).
टीप: जरी सर्व योगासने हायपो आणि हायपरथायरॉईडीझमच्या रुग्णांसाठी चांगली मानली जातात, तरी आम्ही खालील काही आसनांची शिफारस करतो जी विशेष उपयुक्त ठरु शकतात. तथापि, तुम्हाला तुमचा सराव फक्त या आसनापुरता मर्यादित ठेवण्याची गरज नाही. तुमच्या आजारासाठी अधिक आसनांकरिता श्री श्री योग शिक्षकांचा सल्ला घ्या.
हायपोथायरॉईडीझमसाठी योगासने
- सर्वांगासन
- विपरित करणी
- जानु शिरासन
- मत्स्यासन
- हलासन
- मार्जारासन
- जलद गतीने सूर्य नमस्कार
या योगासनांव्यतिरिक्त, कपाल भाती, नाडी शोधन, भस्त्रिका आणि उज्जयी प्राणायाम यासारखे प्राणायाम देखील हायपोथायरॉईडीझमची लक्षणे कमी करण्यासाठी चांगले काम करतात.
तुम्हाला हायपरथायरॉईडीझम असू शकतो जर:
- तुम्ही एकतर अन्न जास्त खात असाल किंवा नेहमीपेक्षा कमी खात असाल. भुकेत अचानक बदल होऊ शकतो. पण तुम्ही कितीही खाल्ले तरी तुम्ही अजूनही बारीक राहता (जर तुम्ही वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असाल, तर).
- तुम्हाला रात्री झोप लागणे कठीण होत आहे.
- जर तुम्हाला खूप जास्त आणि असामान्यपणे घाम येत असेल.
- छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमची सहज चिडचिड होत असेल.
- तुम्ही सहसा चिंताग्रस्त आणि उदास राहता, कोणत्याही गोष्टींबद्दल घाई करता.
हायपरथायरॉईडीझमसाठी शिफारस केलेली योगासने
- सेतुबंधासन
- मार्जारासन
- शिशुआसन
- शवासन
मंत्र जपासह संथ गतीने केलेले सूर्यनमस्कार शांत करणारे परिणाम देतील.
उज्जयी, भ्रामरी प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम तसेच शीतली आणि शीतकारी प्राणायाम यासारखे शीतलता देणारे हे प्राणायाम हायपरथायरॉईडीझमच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात.
तसेच, हायपो आणि हायपरथायरॉईडीझम दोन्हीमध्ये दररोज काही मिनिटे ध्यान करणे चांगले. या त्रासामुळे सुस्त झालेल्या हायपोथायरॉईडीझम रुग्णांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. आणि इथेच ध्यान तुमच्या इच्छाशक्तीला बळकट करण्यास मदत करु शकते.
थायरॉईड विकार असलेल्या लोकांसाठी आहाराबद्दल टिप्स
- तुमच्या आहारात जास्त फायबर असलेले अन्न समाविष्ट करा.
- फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करा.
- भरपूर ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या घ्या. हायपोथायरॉईडीझममध्ये फुलकोबी, कोबी आणि ब्रोकोली टाळणे चांगले.
- मांसाहार टाळा.
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थ (स्किम्ड मिल्क घेऊ शकता ), तसेच भात, मसालेदार अन्न, रिफाइंड आणि फास्ट फूड आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असलेल्या अन्न पदार्थांचे सेवन मर्यादित करा.
तुम्ही पंचकोश आणि हरि ओम ध्यान देखील करुन पाहू शकता.
थायरॉईड विकारांच्या प्रमुख कारणांपैकी तणाव हे एक मानले जात असल्याने, ध्यान मनाला शांत, निवांत ठेवते आणि दररोजचा ताण कमी करते. दररोज काही मिनिटे ‘ओम’ जपल्याने देखील मदत होते. जप केल्यानंतर, थायरॉईड ग्रंथीवर हात ठेवा आणि ती बरी होत आहे असा विचार करा. जपाच्या सकारात्मक स्पंदनांचा थायरॉईड ग्रंथीवर उत्तेजक परिणाम होऊ द्या.
योग निद्रा हायपो आणि हायपरथायरॉईडीझम दोन्हीमध्ये, तणाव कमी करण्यासाठी आणि तुम्हाला शांत करण्यासाठी चांगले काम करते. रात्री झोप बरोबर होत नाही अशा हायपरथायरॉईडीझमच्या रुग्णांसाठी ही पॉवर नॅपसारखे (डुलकी घेणे) देखील काम करते.














