महाशिवरात्रीचा उपवास कोणी करावा?
महाशिवरात्री जवळ येत आहे. भगवान शंकराची कृपा व्हावी म्हणून महाशिवरात्रीचा उपवास किंवा महाशिवरात्रीचे व्रत करतात. संपूर्ण भारतात अनेक भक्त हे व्रत करतात. या दिवशी ते शिवमंदिरात एकत्र जमतात, शिवलिंगाला वेगवेगळ्या गोष्टी अर्पण करतात. संपूर्ण दिवस आणि रात्री प्रार्थना, मंत्रोच्चारण,ध्यान व उपवास असा कार्यक्रम असतो. आपले संकल्प व इच्छा आकांक्षा यांच्या पूर्ततेसाठी या उत्सवात उपवास किंवा व्रत करतात. या व्रताचा हाच मूळ हेतु आहे इतर हिंदू सण व हा सण यात काय फरक आहे ? इतर सणांचे वेळी उपवास न करता देवतांची पूजा केली जाते. पण महाशिवरात्रीला दिवसा व रात्रीसुद्धा उपवास करतात. हे असे विशिष्ट व्रत कशासाठी करतात, हे पाहू या…

महाशिवरात्री व्रताचे महत्त्व काय आहे ?
१. उपवासामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात व शरीराबरोबर मन सुद्धा शुद्ध होते
आपल्याला हलके वाटते, मनातील अस्वस्थता कमी होऊन मनाला विश्रांती मिळते. तसेच मन जास्त सजग होते. प्रार्थना व ध्यान हे या महाशिवरात्रीच्या सोहळ्याचे मुख्य पैलू आहेत.. उपवासाने प्रार्थनेसाठी व ध्यानासाठी आपण चांगल्याप्रकारे तयार होतो.
२. आपल्या प्रार्थनेची शक्ती वाढते
जेव्हा मन व शरीर दोन्ही शुद्ध असतात, त्यावेळी तुमचे संकल्प व प्रार्थना यात जास्त सामर्थ्य असते. जेव्हा तुम्ही शिवरात्रीचा उपवास करुन ध्यान करता, त्यावेळी तुमच्या इच्छा व हेतु सफल होण्याची जास्त शक्यता असते. जेव्हा आपण शिवरात्रीचे हे व्रत प्रामाणिकपणे व भक्तीभावाने करतो, तेव्हा भगवान शंकराची कृपा आपल्यावर बरसते व आपल्या इच्छा फलद्रूप होतात !
३. या काळात ध्यानाचे महत्त्व…
या काळात ध्यान केले असता ते इतर दिवशी केलेल्या ध्यानापेक्षा शंभर पट अधिक प्रभावी असते, म्हणून भक्तगण या पवित्र दिवशी ध्यानाला अधिक महत्व देतात. उपवासामुळे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रिया नियंत्रित केल्या जातात, त्यामुळे तुम्ही आत्म्याच्या अधिक जवळ जाता.
४. या व्रतामुळे आपल्या पापांचे निर्मूलन होते
उपवासामुळे राग, लोभ, वासना, व चिंता यासारख्या नकारात्मक भावना नाहीशा होतात. आपण जेव्हा उपवास करता आणि देवाचे नामस्मरण करता त्यावेळी तुमच्या पापांचे निर्मूलन होत असते, असे ठामपणे मानले जाते. काहीजण पचनास हलका असा आहार घेतात, काहीजण फक्त दुधावर किंवा पाण्यावर रहातात.
महाशिवरात्रीच्या उपवासा संबंधी ही झाली काही उपयुक्त माहिती….
महाशिवरात्रीच्या उपवासामागे एक कथा सुद्धा आहे ….
पूर्वी देव व दानवांचे नेहमी युद्ध होत असे. त्यांच्यात एकोपा निर्माण व्हावा म्हणून भगवान विष्णूंनी दूधसागराचे मंथन करायची कल्पना मांडली. त्या मंथनातून अमृत मिळेल व त्यामुळे अमरत्व प्राप्त होईल अशी कल्पना होती. यासाठी वासुकी नावाच्या सर्पाची दोरी केली. देव व दानवानी समुद्र मंथन सुरू केले. त्यातून हलाहल म्हणजे विष सुद्धा बाहेर आले! देवांनी व राक्षसांनी मदतीसाठी शिवाची प्रार्थना केली. भगवान शंकरांनी ते विष प्यायची तयारी दाखवली व देवांना आणि राक्षसांना वाचवायचे ठरवले.
हे समजल्यावर देवी पार्वतीला काळजी वाटू लागली.तिला वाटले हे विष शिवाच्या अंगात भिनेल व त्यांना त्रास होईल ! म्हणून तिने त्या दिवशी व रात्री त्यांचा गळा घट्ट धरून ठेवला. गळा घट्ट धरल्याने तो निळा झाला.
(म्हणून शंकराला नीळकंठ म्हणतात !) यावेळी पार्वतीने पूर्ण दिवस रात्र उपवास केला.अशा रीतीने उपवासाची ही प्रथा सुरु झाली आणि महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करण्याची पद्धत सुरु झाली !!











