शिव कोण आहे?
भगवान शिव म्हणजे कोणीतरी, कोणत्या तरी जागेवर बसले आहेत कां?
शिव म्हणजे काय?
ते एक स्वरूप आहे कां?
शतकानुशतके, इतिहासकार आणि भक्तांनी भगवान शिवाची प्रतिमा इतकी मोहक केली आहे. राख फासलेले शरीर, वाघाची कातडी, चंद्रकोर, गळ्याभोवती साप, तिसरा डोळा, जटा बांधलेले केस, त्या जटेतून वाहणारी गंगा नदी, एका हातात त्रिशूळ, दुस-या हातात डमरू, कधी ब्रम्हांडीय नृत्यात रममाण तर कधी खडकासारखे स्थिर निश्चल बसून. या सोबतच भगवान शिवाची १००८ नावे देखील आहेत जे त्यांच्या गुणांचे वर्णन करतात.
जर शिवाला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल तर, शिव हे केवळ नाम, रूप आणि काळ या तीन गोष्टींपुरते मर्यादित नाही हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. विशेष म्हणजे शिव म्हणजे एखाद्या ठिकाणी किंवा आकाशात बसलेली व्यक्ती नाही.

शिवाचा अर्थ काय?
शिव म्हणजे श + ई + वा
श म्हणजे शरीरम किंवा शरीर
ई म्हणजे ईश्वरी किंवा जीवन देणारी ऊर्जा
वा म्हणजे वायु किंवा गती
अशा प्रकारे, शिव म्हणजे जीवन आणि गतीसह असलेले शरीर दर्शवते.
शिवातून ‘ई’ काढून टाकल्यास ते श+व = शव असे कमी होते.
शव म्हणजे जीवन नसलेले शरीर.
शिव जीवनाच्या क्षमतेसह आहे, तर शव निर्जीव आहे.
वैश्विक चेतना जी आपल्याला सखोल ज्ञान देते की शिव हेच जीवन आहे, शिव जीवनाची क्षमता आहे, शिव हे सर्वव्यापी आहे. या शिव तत्वाची अनुभूती घेतली की परमानंद प्राप्त होतो.
शिवाचे स्वरूप काय आहे?
शिवाची संपूर्ण संकल्पना उदात्त आहे. आपल्या प्राचीन लोकांनी या उदात्ततेचे तीन अवस्थांमध्ये वर्गीकरण केले आहे:
अरुप: रूपाशिवाय
रूप-अरूप: निराकार रूप
सरूप: रूपासह
अरुप अवस्था म्हणजे ज्याचा कोणताही आकार, रूप किंवा रंग नसतो. यातून असे सूचित होते की अरुप अवस्थेचे वर्णन करण्यासाठी कोणताही अवकाश, काळ किंवा काही वस्तूच नव्हती. अशी अवस्था तेव्हाच शक्य असते जेव्हा विश्वाची निर्मितीच मुळी झालेली नसते.
शिवाची अरुप अवस्था ती आहे जी प्रकट होण्याच्या पलिकडे आहे. या प्रकारात खालील सहा विकृती लागू होत नाहीत:
आदि – अंत: आरंभ आणि अंत
संकोचा – विस्तारा: आकुंचन आणि प्रसरण
प्रसारण – अभिसारण: प्रसार आणि एकत्रीकरण
ही वैशिष्ट्ये केवळ प्रकट रूप निर्मितीसाठी लागू होतात. म्हणून अरुप अवस्थेला शिव म्हणजे शुद्ध चैतन्य असे म्हटले जाते, जे अस्तित्वात आहे परंतु स्थिर आहे. ही अवस्था सर्व सृष्टीचा उगम आहे आणि सर्व दैवते आपले मूळ या अवस्थेचे ऋणी मानतात. म्हणून महादेव हे नाव – सर्व देवतांचे उगमस्थान.
रूप-अरूप अवस्था म्हणजे निराकारातून आकारात प्रकट होणारी किंवा सरुपातून उदयास येणारी सरूप अवस्था. ही सुक्ष्म ते स्थूल अशी संक्रमण अवस्था आहे.
सरूप अवस्था ही अशी आहे जिथे शिव विविध रूपात प्रकट होतो. स म्हणजे सह किंवा सोबत. अशा प्रकारे, सरूप म्हणजे रुपासह किंवा प्रकट अवस्था.

शिव कसा समजून घेता येईल?
भगवान शिवाबद्दल विस्तृतपणे बोलणारे एक ठिकाण म्हणजे भारतातील काश्मिर. काश्मिर शैव विचार आजही खूप प्रगत मानला जातो. त्याला त्रिका म्हणत. त्रिकानुसार, शिव हे तीन प्रकारच्या अवस्थेत असल्याचे समजून घेतले जाऊ शकते, म्हणून त्रिका हे नाव आहे. त्याचे ज्ञान मिळविण्यासाठी, त्यांनी चार चरणांची शिफारस केली:
अनवोपय : अहंकाराला शिस्त लावणे
अनव: ध्यान
सकतोपय: मौनात लक्ष केंद्रित करणे
सांबवोपय: स्वतःला विचारांपासून मुक्त करणे
अशा प्रकारे, शिव हे सूक्ष्म ते स्थूल ते सूक्ष्म अशा साखळीचे प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून शिवाला समजून घेण्याच्या मार्गांसाठी सूक्ष्मत्व आणि ध्यान गरजेचे आहे.
शिवाच्या वर्णनाद्वारे यावर भर दिला जातो:
“शिवम् शांतम् अद्वैतम् चतुर्थम्
मन्यंते सा आत्मा सा विघ्नेहा”
(जागरुक, स्वप्न आणि निद्रा या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जी अवस्था आहे आणि ती या सर्व अवस्था मध्ये व्यापून राहते ती अवस्था म्हणजे शिव आणि ते नक्कीच जाणून घेण्यायोग्य आहे.)
ही अवस्था आपल्या आकलनापलीकडची असल्यामुळे किंवा जाणण्याजोगी किंवा जाणता येणारे स्वरूप नसल्यामुळे ती निराकार सारखी आहे. याला अरुपा असेही संबोधले जाऊ शकते आणि सामान्यतः तुर्या अवस्था किंवा चौथी अवस्था म्हणून ओळखले जाते. या अवस्थेत, शरीर विश्रांती मध्ये असते आणि मन परमोच्च जागृत अवस्थेत असते.
शिव असे आहे जिथून सर्व काही उगम झाले आहे, ज्यामध्ये सर्व काही अस्तित्व राखून आहे आणि सर्व काही विलय होत आहे. हे शिव किंवा शिवतत्व आहे. कधीही शिवापासून बाहेर पडण्याचा पर्याय नाही ,कारण सृष्टी ही शिवापासूनच बनलेली आहे. तुमचे मन, शरीर, सर्व काही शिवतत्त्वापासून बनलेले आहे . म्हणूनच शिवाला ‘विश्वरूप’ म्हटले जाते, म्हणजे संपूर्ण ब्रम्हांड हे त्याचेच रूप आहे.
शिव शाश्वत का आहे?
भगवान शिवाशी संबंधित एक सुंदर कथा आहे. एके काळी ब्रह्मा (विश्वाचा निर्माता) आणि विष्णू (विश्वाचा रक्षक) यांना ‘शिव कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधायचे होते. त्यांना त्याला पूर्णपणे समजून घ्यायचे होते. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, “मी जाऊन त्याचे डोके शोधतो, आणि तुम्ही त्याचे पाय शोधा.” हजारो वर्षे, विष्णू शिवाचे पाय शोधण्यासाठी खाली आणि अजून खाली गेले परंतु ते सापडले नाहीत. ब्रह्मदेव त्याचे डोके शोधण्यासाठी वर आणि अधिक वर गेले पण ते देखील सापडले नाही.
याचा अर्थ असा आहे की, शिवाला पाय नाहीत आणि डोके नाही. शिवाला आदि आणि अंत नाही. शेवटी, ते दोघे मध्येच भेटले आणि ते शिवाला शोधू शकले नाही हे त्यांनी मान्य केले. शिवलिंग हे या सर्वांशी निगडित आहे. हे असीम शिवाचे प्रतीकात्मक रूप आहे.
शिव किती विशाल आहे?
शिव ही कोणी व्यक्ती नसली तरी शिव चेतना किती विशाल आहे हे बघायचे असेल तर असे म्हणता येईल.
ब्रह्मानंद व्याप्त देहा
शिवाचे शरीर आकाशगंगांच्या पल्याड व्यापून आहे. संपूर्ण ब्रम्हांड हे शरीर आहे. सर्व तारे आणि तेजोमेघ केस दर्शवतात, हजारो सूर्य एकत्रितपणे डोळे. पोट म्हणजे जल. सर्प हेच मन. कोट्यावधी स्पंदनांनी भरलेले हे जग मन, ग्रह आणि अगदी अन्नाशी देखील आपसात जोडलेले आहेत. सर्व काही एक आंतरजाल आहे.
रुद्राष्टकम् मध्ये उल्लेख असा आहे की:
नमामि-शमिषनिर्वाण रूपम्, विभूं व्यापकं ब्रह्म-वेद स्वरूपम्। निजं निर्गुणं निर्विकल्पं निरिहं चिदाकाशम् आकाश वासं भजेहम् |
अर्थ: तो परमेश्वर आहे, तो सर्वात शक्तिशाली आहे, तो सर्वत्र आहे, सर्वत्र व्यापलेला आहे. तो नाही अशी एकही जागा नाही. हे असे अवकाश आहे, अशी चेतना, ज्यात सर्व ज्ञान विदित आहे. तो कधीच जन्माला आला नाही आणि त्याचे कोणतेही गुणधर्म नाहीत. ही समाधीची अवस्था आहे जिथे काहीही नाही, केवळ चेतनेचे आंतरिक आकाश. हेच शिव आहे.
शिव ही संपूर्ण सृष्टी आहे
कोणतीही निर्मिती हे सकारात्मक आणि नकारात्मक अशा विपरीत मूल्यांचे मिश्रण असते. या विश्वात अग्नी आणि पाणी, चांगुलपणा आणि वाईटपणा अशी अनेक उदाहरणे आहेत. शिव या सर्व विरोधी मूल्यांमध्ये उपस्थित आहे. म्हणूनच शिवाला रुद्र (उग्र) म्हणतात आणि त्याच वेळी, त्याला भोलेनाथ (सर्वात निष्पाप) म्हणतात. त्याला सुंदरेश (सुंदर) आणि अघोर (भयानक) असेही म्हणतात. प्रसिद्ध शिव प्रार्थनेत शिवाचे वर्णन गौरम (अग्निमय) असे आहे आणि त्याच वाक्यात पुढे त्याला करुणावतारम् (करुणेचे अवतार) असे म्हटले आहे.
महाशिवरात्री म्हणजे काय?
वर म्हटल्याप्रमाणे शिव ही चौथी अवस्था आहे, जी ध्यानाद्वारे प्राप्त करता येते. आपल्या अस्तित्वात गहिरे उतरण्याची आणि ती अपार शांती, समाधी आणि शिव अनुभवाला येण्याची शक्यता शिवाची रात्र म्हणजे महाशिवरात्रीला जास्त असते.
दर महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला किंवा अमावस्येच्या आदल्या रात्री येणारा शिवरात्रीचा मासिक उत्सव इतका सामान्यपणे ज्ञात नाही.
महाशिवरात्री किंवा शिवाची महान रात्र दरवर्षी भारतीय दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या रात्री साजरी केली जाते.
ही रात्र ती असते जेव्हा आपण आपल्या सर्वांमधील शिवतत्त्व स्वीकारतो आणि ते साजरे करतो. रात्री म्हणजे रात्र –निवांत होत विश्रांती घेण्याची वेळ. शिवतत्त्वात विश्रांती मिळवण्याची रात्र म्हणजे शिवरात्री.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्त्व, ती ऊर्जा, जी जमिनीच्या पातळीपासून काही इंच उंचीवर असते, ती जमिनीला स्पर्श करते. हा पवित्र काळ ध्यान करण्यासाठी आणि समृद्ध करणारा गहन आध्यात्मिक अनुभव प्राप्त करण्यासाठी अगदी योग्य वेळ आहे. आध्यात्मिक प्रगती सोबतच भौतिक प्राप्तीसाठी हा पवित्र दिवस मानला जातो.











