जाणून घेऊया : शिव तत्वाची ५ आद्य प्रकटस्थळे, आणखी बरेच काही
संपूर्ण भारतभर आणि खास करून दक्षिणेमध्ये भगवान शिव यांना विविध कारणांसाठी पूजले जाते. निसर्गाच्या पंच महाभूतांचे अधिपती म्हणून त्यांना पूजले जाते. म्हणून त्यांना भूतपती किंवा भूतनाथ असे ओळखले जाते.
न I म I शि I वा I य ही ५ अक्षरे पंचमहाभूताना दर्शवतात. (संस्कृत मध्ये भूत म्हणतात)- पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. समस्त प्रकृती या पंचभूतानी बनलेली आहे आणि भगवान शिव हे त्यांचे अधिपती आहेत.
भारतात एक जुनी म्हण आहे- भगवान शिव यांच्या परवानगी शिवाय वायू, गवताचे पाते देखील हलू शकत नाही. पंचभूतांचे अधिपती या गुणधर्मावरून दक्षिण भारतात, ५ भगवान शिवाची ५ मंदिरे म्हणजेच पंचभूतस्थलम आहेत, जे एकेका महाभूतांना समर्पित आहेत आणि त्यांची एकेक अद्वितीय अशी आख्यायिका आहे. ज्यात भिन्न भिन्न आध्यात्मिक सार आहे.
तुम्ही या मंदिरांना तपशीलवार भेटी द्यालच, तोपर्यंत ही त्यांची एक काल्पनिक तीर्थयात्रा.
एकंबरेश्वर मंदिर
पृथ्वी तत्त्व (कांचीपुरम, तमिलनाडु)
एकंबरेश्वराच्या मंदिरात भगवान शिवाचे वालुकामय रुपात शिवलिंग आहे, जे पृथ्वी तत्वाचे प्रतिक आहे. म्हणून त्याला पृथ्वी लिंगम नावाने देखील ओळखतात. येथे शिवाची एकंबरनाथ आणि एकंबरेश्वर या नावांनी श्रद्धेने पूजा होते.एकंबरेश्वर म्हणजे आंब्यांच्या वृक्षांचा ईश्वर. या मंदिराच्या उत्पत्ती बद्धल एक आख्यायीका आहे.

पुरातन काळी देवी पार्वतीने आंब्याच्या झाडाखाली कठोर तपश्चर्या करत असताना भगवान शिवाने गंगा नदीला पार्वतीची सत्व परीक्षा घेण्यासाठी आणि तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले. देवी पार्वतीने ‘आपण भगिनी आहोत’ असे सांगून तिने तिला कोणताही उपद्रव करू नये, म्हणून गंगेची प्रार्थना केली.
गंगेने मग तिची तपश्चर्या भंग केली नाही. देवी पार्वतीने शिवाच्या स्मरणार्थ आंब्याच्या झाडाखाली वाळूचे शिवलिंग बनवले आणि आज देखील त्याचे पावित्र्य जपले जाते. त्या वालुकामय लिंगाची झीज होऊ नये म्हणून आजदेखील अभिषेकासाठी कमी घनतेच्या मोगऱ्याच्या तेलाचा वापर होतो.
कथासार
ईश्वरी तत्वांच्या जपणुकीसाठी मूर्ती किंवा शिल्पांची गरज नाही तर मुठभर वाळू देखील पुरेशी होते.
एकंबरेश्वर मंदिराची ५ वैशिष्ट्ये
- हे मंदिर भारतातील दहावे मोठे मंदिर असून ते तेवीस एकरात पसरले आहे.
- या मंदिराचे गोपूर १९० फुटांचे असे दक्षिण भारतातील सर्वात उंच गोपूर आहे.
- एकंबरेश्वर मंदिर इ.स.६०० पासूनचे भारतातील अतिप्राचीन असे मंदिर आहे.
- या मंदिराच्या आतमध्ये असलेले आंब्याचे झाड ३००० वर्षाचे जुने झाड आहे असे सांगतात.
- या मंदिराच्या उभारणीमध्ये कित्येक राजवटींचा सहभाग आहे.
जंबुकेश्वर मंदिर
जल तत्त्व (तिरूवनैकवल, त्रिची, तमिलनाडु)
त्रिची येथील जंबुकेश्वराचे मंदिर जल तत्वाचे प्रतिक आहे. येथे भगवान शिवाची ‘अप्पू लिंगम’ या जल तत्वाच्या रुपात आराधना केली जाते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाच्या खालून एक पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो. या जल प्रवाहात लिंग बुडालेले असते, ज्यामुळे जल तत्वाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

आख्यायिका अशी आहे की, अखिलांडेश्वरी रूपातील देवी पार्वती तपश्चर्या करण्यासाठी जंबूकारण्यात पोहोचली. तेथे तिने ‘अप्पू लिंगम’ नावाचे जल लिंग निर्माण करून त्याची आराधना सुरु केली. तेथे भगवान शिव प्रसन्न होऊन तिला शिव ज्ञान, जे अत्युच्च ज्ञान आहे, त्याची दीक्षा दिली. येथे भगवान शिव आणि पार्वतीदेवी यांचे गुरु शिष्याचे नाते निर्माण झाल्याने अन्य मंदिरांप्रमाणे शिवरात्री दिवशी शिव पार्वतीच्या विवाहाचा गिरीजा कल्याणम् विधी येथे होत नाही. येथे दोन्ही देवतांच्या मूर्ती एकमेकासमोर आहेत.
अशी श्रद्धा आहे की, या मंदिरामध्ये पार्वतीदेवीने शिवाची आराधना केली असल्याने आज देखील येथील पुजारी अखिलांडेश्वरी रुपात म्हणजे स्त्री वेशात पूजा करतात. इतर साधक देखील नियमित ही प्रथा पाळतात.
कथासार
प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार भगवान शिव हे आद्य आणि सर्वोच्च गुरु आहेत. जल हे ज्ञानाचे प्रतिक असून त्याचा प्रवाह ज्ञान ग्रहण दर्शवते. म्हणून जंबूकेश्वराचे मंदिर हे ज्ञान आणि ज्ञान ग्रहण याचे उत्तम प्रतिक आहे.
अशी श्रद्धा आहे की, जो कोणी या मंदिरात पूजा अर्चा करेल त्याला ज्ञान आणि बुद्धिमत्ता प्राप्त होईल.
जंबुकेश्वर मंदिराची ५ वैशिष्ट्ये
- हे मंदिर १८०० वर्षापूर्वी बांधलेले असून याची उभारणी कोसेनगन्ना चोला यांनी केली आहे.
- हे मंदिर भारतातील तेरावे सर्वात मोठे मंदिर असून १८ एकर मध्ये पसरलेले आहे.
- मंदिराच्या भिंतींवर चोला साम्राज्य कालीन शिलालेख आहेत.
- येथे दररोज दुपारी होणारी ‘उची कला पूजा’ प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये पुजारी साडी नेसून पार्वतीदेवीचे प्रतिनिधी बनून अप्पू लिंगमवर अभिषेक करतात.
- अप्पू लिंगम खाली वाहत असणाऱ्या जल प्रवाहामुळे ते लिंग कधीही सुकत नाही.
अरुणाचलेश्वर मंदिर
अग्नि तत्त्व (अन्नामलाई टेकडया, तिरूवन्नामलई, तमिलनाडु)
अरुणाचलेश्वर मंदिर भगवान शिव यांनी बहाल केलेले, अग्नी लिंगाचे प्रतिनिधित्व करणारे आणि अग्नी तत्वाला समर्पित मंदिर आहे. भारतातील सर्वात जास्त भक्त भाविक दर्शनाला येणाऱ्या मंदिरापैकी हे एक आहे.
कथा अशी आहे, एकदा पार्वती देवीने गंमतीने भगवान शिव यांचे नेत्र बंद केले तेंव्हा संपूर्ण ब्रम्हांडावर हजारो वर्षे काळोख पसरला. त्यांच्या भक्तांनी केलेल्या तपश्चर्येनंतर भगवान शिव तिरूवन्नामलई येथील अन्नामलाई टेकडीवर अग्नी स्तंभाच्या रुपात प्रकट झाले.

भगवान शिव यांच्या अग्नी तत्वाचे महात्म्य सांगणारी आणखी एक कथा आहे. भगवान विष्णू आणि भगवान ब्रम्हा यांच्यामध्ये एकदा दोघांपैकी कोण श्रेष्ठ यासाठी वाद निर्माण झाला. तेव्हा भगवान शिव यांनी अग्नी रुपात प्रकट होऊन दोघांपैकी आपले उगम स्थान कोण शोधेल तो श्रेष्ठ असे सांगितले. ब्रम्हा हंस रूप घेऊन त्या ज्योतीचा स्त्रोत शोधण्यासाठी आकाशात गेले. तर विष्णू वराहाचे रूप घेऊन खाली जाते झाले. या घटनेला हिंदू पुराणात ‘लिंगोद्भव‘ म्हणतात. दोघेही ज्योतीचा स्त्रोत शोधण्यात अयशस्वी झाले. विष्णूनी आपले अपयश मान्य केले. मात्र ब्रम्हांनी आपण ‘कळस’ शोधल्याचे खोटे सांगितले. शिक्षा म्हणून पूजा अर्चा करण्यासाठी ब्रम्हाचे एकही मंदिर या पृथ्वीतलावर असणार नाही असे भगवान शिव यांनी सांगितले.
कथासार
शुद्धता, प्रकाश, उजेड आणि ऊर्जा ही अग्नी तत्वाची ओळख आहे. आणि आराधना, मंत्रोच्चार आणि जप यांच्यामुळे आपल्या जीवनात, मनात आणि हृदयात ते ईश्वरी तत्व शुद्धता प्रदान करते.
अरुणाचलेश्वर देवता भक्तांचे कर्म दोष दूर करून त्यांना ज्ञान प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते.
अरुणाचलेश्वर मंदिराची ५ वैशिष्ट्ये
- भगवान शिवाची आराधना करण्यासाठी जगातील सर्वात मोठे मंदिर आहे.
- २४ एकरातील भारतातील आठवे सर्वात मोठे मंदिर असून जागेचा परिपूर्ण वापर धार्मिक कार्यासाठी केला जातो.
- या मंदिराला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास असून त्यंचा उल्लेख तमिळ धर्म ग्रंथात आहे.
- ‘गिरीवलम’ म्हणजे दर पौर्णिमेला हजारो भाविक अरुणाचल टेकडीला प्रदक्षिणा घालतात जी १४ कि मी लांबीची आहे. यामुळे भाविकांचे पापक्षालन होते, इच्छा पूर्ण होतात आणि त्यांची जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती होते अशी आख्यायिका आहे.
- मंदिराच्या चोहोदिशांना चार गोपूर आहेत. पैकी सर्वात उंच गोपुराची उंची २१७ फुट आहे जे भारतातील तिसरे सर्वात उंच गोपूर आहे
कालहस्तीश्वर मंदिर
वायु तत्त्व (श्रीकालहस्ति, आंध्रप्रदेश)
स्वर्णमुखी नदीच्या तीरावरील कालहस्तीश्वर मंदिर वायू तत्वाचे प्रतिक आहे. येथे वायू रूपातील वायू लिंगम या रुपामध्ये भगवान शिव यांची आराधना केली जाते.
श्री कालहस्ती हे दक्षिणेतील कैलास म्हणून ओळखले जाते. श्री म्हणजे कोळी, काल म्हणजे साप आणि हस्ती म्हणजे हत्ती. या तिन्ही जीवांनी आपल्या निःस्वार्थ भक्तीने भगवान शिव यांना प्रसन्न करून घेतले होते.

मंदिराच्या गाभाऱ्यातील दिव्याची ज्योत वारे नसून देखील सतत फडफडत असते. पुजारी जेंव्हा मंदिराचे मुख्य द्वार बंद करतात तेंव्हा देखील आतमध्ये खिडकी नसून वायूलिंगमची ज्योत हलताना दिसते. हे लिंगम सफेद रंगाचे असून स्वयंभू आहे.
शिव तत्वाप्रमाणे समस्त विश्वातील प्राणीमात्रां मध्ये उपस्थित असण्याचे वरदान जेंव्हा वायू देवाने मागितले तेंव्हा भगवान शिव यांना वायू लिंगमच्या रूपाने प्रकट व्हावे लागले. म्हणून ते सफेद ज्योतीच्या रुपात प्रकट झाले ज्याला कर्पूरलिंग या नावाने देखील ओळखतात. आजदेखील या कथेतील श्रद्धेनुसार ती ज्योत सफेद रंगाची आहे.
कथासार
वायू म्हणजे प्राण. वायूशिवाय या विश्वात जीवन नाही. आपण वायू तत्वाच्या आराधनेप्रमाणे शिव तत्वाची आराधना करतो.
कालहस्तीश्वर मंदिराची ५ वैशिष्ट्ये
- श्रीकालहस्ती मंदिराचे प्राथमिक बांधकाम पाचव्या शतकात झाले. आत्ताच्या मंदिराचे बांधकाम नंतर शेकडो वर्षे चालले होते.
- मुख्य गोपूर १२० फुट उंचीचे असून त्याचे बांधकाम १५१६ इ.स.मध्ये विजयनगरचे राजे कृष्णदेवराया यांनी केले आहे जो स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
- मे २०१० मध्ये झालेल्या याच्या पडझडीचे बांधकाम अद्याप सुरु आहे.
- हे मंदिर राहू-केतू पूजेसाठी प्रसिद्ध आहे. राहू आणि केतू यांचे असणारे, तसेच निर्माण होणारे दोष ही पूजा श्रद्धेने केल्यास नाहीसे होतात असा विश्वास आहे.
- या मंदिरातील वायू लिंगमला पुजारी देखील स्पर्श करत नाहीत.
थिल्लई नटराज मंदिर
आकाश तत्त्व (चिदंबरम, तमिलनाडु)
चिदंबरम् मधील थिल्लाई नटराज मंदिरामध्ये भगवान शिवा यांच्या आकाश तत्वाची आराधना केली जाते, जे पंचभूतांमध्ये सूक्ष्माति सूक्ष्म आहे. या मंदिरात भगवान शिव यांच्या निराकार रुपाची पूजा होते.
पुराणात चिदंबरम् शहराची खूप आकर्षक कथा आहे ज्यामुळे भगवान शिव यांची महानता कळते. भगवान शिव एकदा आमराईत (थिल्लाई वन) फिरत असतात. याच जंगलात काही ऋषी रहात असतात ज्यांचा मंत्र-तंत्र, जादूटोणा यावर विश्वास असतो. त्यांना वाटत असते की विधी आणि मंत्रांद्वारे देवावर देखील नियंत्रण करू शकतो. ऋषीपत्नी शिवस्तुती गात असतात. त्यांचे हे स्तुतीपठण ऐकून ऋषींनी कोपिष्ट होऊन त्यांच्यावर असंख्य साप सोडले. भगवान शिव यांनी त्या सापांना उचलून आपल्या सर्व सांध्यांवर, गळ्यात आणि कंबरेला धारण केले.

अति कोपिष्ट होऊन ऋषींनी त्यांच्यावर भयंकर वाघ सोडला, ज्याची कातडी भगवान शिव यांनी आपल्या कंबरेभोवती वस्त्र म्हणून गुंडाळले. मग सोडलेल्या भयंकर हत्तीला भगवान शिव यांनी फाडून मारून टाकले. मग त्यांनी मुयलकन राक्षस (जो आपल्या सर्वामधील अहंकार आणि अज्ञानाचे प्रतिक आहे) त्याला अंगावर सोडले. भगवान शिव यांनी त्याला पायाखाली चिरडले आणि आनंद तांडव, जे शाश्वत अत्यानंदाचे प्रतिक आहे, ते केले आणि आपले मूळ रूप प्रकट केले. चिदंबरम् मधील नटराजाची मूर्ती आनंद तांडव प्रतिनिधीत्व करते.
नटराज अवतारासह ‘चिदंबर रहस्य’ या मंदिरातच निर्माण झाले. मंदिराच्या गाभाऱ्यामधील पोकळीतून पुराणकर्त्यांनी या चिदंबर रहस्यावरून पडदा दूर सारला. याचाच अर्थ असा आहे की अज्ञानावरील पडदा दूर झाल्यावरच शाश्वत आनंद प्राप्त होतो. ‘ज्यावेळी आपण पूर्णतः समर्पित होऊन ईश्वराला आपल्यातील अज्ञान दूर करण्याची संधी देतो तेंव्हाच आपलयाला ईश्वराच्या अस्तित्वाची आणि अत्यानंदाची अनुभूती होऊ शकतो.’
कथासार
अध्यात्माचे अंतिम ध्येय आहे ‘अत्यानंदाची प्राप्ती‘. या मार्गाचा हेतू हाच आहे की तुम्हाला ‘पोकळ आणि रिकामे, खाली‘ बनवणे.
अध्यात्मिक साधकांनी दिव्यत्वाची प्राप्ती करण्यासाठी हा मार्ग अंगीकारावा, साधकांचे अंतिम ध्येय अंतर्बाह्य रिक्त अनुभव प्राप्त करणे आहे, याचे स्मरण रहाण्यासाठी थिल्लाई नटराज प्रतिक आहे.
थिल्लाई नटराज मंदिराची ५ वैशिष्ट्ये
- चिदंबरम् शहराच्या मध्यवस्तीत ४० एकरात वसलेले हे मंदिर भारतातील सर्वात मोठे पाचव्या क्रमांकाचे मंदिर आहे.
- “चिदंबरम्“ हा शब्द ‘चित्’ म्हणजे सजगता आणि ‘अंबरम्’ म्हणजे आकाश यापासून बनला आहे.’असीमित सजगता‘ प्राप्त करणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे.
- पंचभूतस्थलम् मधील हे एकमेव मंदिर असे आहे जेथे भगवान शिव यांना लिंगाऐवजी मानवी रुपामध्ये दर्शवले आहे. तसेच स्फटिक लिंग म्हणजे मोकळ्या गाभाऱ्याची म्हणजे शिवाच्या निराकार रुपाची पूजा केली जाते.
- मंदिराच्या गोपुराचे छत चोल राजा पारंतक यांनी सोन्याने मढवलेले आहे.
- ‘वीरथ्रीदयापद्मस्थलम’ म्हणजे हे मंदिर विश्वाच्या हृदयकमळाच्या जागी आहे, अशी आख्यायिका आहे.











