तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर ताजेतवाने आणि उत्साही असेच वाटले पाहिजे. तसे नसेल तर, तुमच्या झोपेची गुणवत्ता चांगली नसण्याची दाट शक्यता आहे.झोप व स्वास्थ या विषयातील तज्ज्ञ आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक, खुर्शीद बाटलीवाला आणि दिनेश घोडके यांनी ‘स्लीप; युवर वे टू सक्सेस’ या त्यांच्या हल्लीच लिहिलेल्या पुस्तकात, रोज सकाळी झोपेतून उठले की ताजेतवाने वाटत नाही आणि त्याऐवजी अस्वस्थ का वाटते याची काही कारणे सांगितली आहेत. पुस्तकातील एक उतारा येथे देत आहे. (सादरीकरण थोडेसे बदलले आहे)
बरेच लोक झोप झाल्यावर जागे होतात तेव्हा त्यांना विचलित आणि अस्थिर; अस्वस्थ वाटत असते. हे एखाद्या वेळेस घडल्यास ठीक आहे. जर ते वारंवार घडत असेल, तर हा स्पष्ट संकेत आहे की त्यांच्या झोपेची गुणवत्ता (आणि प्रमाण) तेवढी चांगली नाही. याची अनेक कारणे असू शकतात.पुरेशी झोप झाली आहेअसे वाटून देखील जाग आल्यावर तुम्हाला थकल्यासारखे का वाटते याबद्दलच्या सर्वात महत्वाच्या कारणांची एक यादी येथे देत आहोत.
१. तुमची झोप पुरेशी झालेली नसावी

८ तासांपेक्षा कमी झोप तुमच्या शरीर व मनासाठी हितकारक नाही. रोज रात्री आठ तास झोप घ्या.
२. तुम्ही झोपेच्या गोळ्या घेत असाल
बाजारात प्रत्यक्ष “झोपेच्या” गोळ्या उपलब्ध नसतात.हे औषध फक्त तुम्हाला शांत करते. उपशमन हे झोपेसारखे नक्कीच नाही. केवळ शमन झाल्याने, तुम्हाला नैसर्गिक झोपेचे कोणतेही फायदे मिळत नाहीत. याशिवाय,याची सवय लागू शकते.या गोळ्या तुम्हाला व्यसनाधीन बनवतात आणि तुमच्या शरीरातील इतर प्रणालींमध्ये बिघाड होतो. जर तुम्ही झोपेच्या गोळ्या किंवा तत्सम औषध घेत असाल तर शक्य तितक्या लवकर ते बंद करा,अर्थात ज्यांच्याकडून तुम्ही उपचार घेत आहात, त्यांच्याशी सल्लामसलत करुनच… – एका चांगल्या आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक डॉक्टरचा सल्ला घ्या.
३. तुमच्या खोलीत उजेड असेल
तुम्ही झोपत असताना, तुमच्या बेडरूममध्ये थोडा प्रकाश असेल; अगदी लहान दिवे देखील तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकतात. यावर उपाय म्हणजे तुमची बेडरुम पूर्णपणे काळोखी करा. तुम्ही मध्यरात्री बाथरुमला उठता तेव्हा तुम्ही मोठा लाईट लावत असाल. यामुळे मेंदूला जागे राहण्याचा सिग्नल जाऊ शकतो, मग परत झोप लागणे कठीण जाते.
४. तुम्ही झोपी जाण्यापूर्वी या चार घोडचुका केल्या होत्या का?
झोपण्यापूर्वी तुम्ही या चार गोष्टींपैकी काही केले आहे का? असेल तर तुमचे झोपेचे चक्र नकारात्मकरित्या बदलू शकते.
१. तुम्ही संध्याकाळी उशिरा कॉफी किंवा चहा घेतला आहे का, किंवा तुम्ही दिवसभरात बरेच कप कॉफी आणि/किंवा चहा घेतला आहे का? या पेयांमध्ये असलेले कॅफिन तुमच्या झोपेची लय बिघडवते.

२. तुम्ही मद्यपान केले असेल. अल्कोहोल आपल्या झोपेच्या लयीत व्यत्यय आणेल. तुमच्या मेंदूच्या कार्यात खूप गडबड होईल.खूप जास्त मद्यपान केल्याने बेहोशी येऊ शकते, परंतु ही बेहोशी म्हणजे झोप नव्हे ! याची झोपेच्या स्थितीशी बरोबरी करू नये.
३. तुम्ही रात्री साधारण ८ नंतर जोमाने व्यायाम केला असेल. जोरदार व्यायामामुळे एड्रेनलाईनसारखे संप्रेरक तयार होऊन तुमच्या रक्तातून वाहू लागते. यामुळे तुमच्या हृदयाची गती वाढते, मेंदू सक्रिय बनतो आणि शरीराचे अंतर्गत तापमान वाढते, हे सर्व हार्वर्डच्या संशोधनानुसार सांगायचे म्हणजे- तुम्ही रात्री अगदी निशाचरासारखे टक्क जागे रहाता.
४. तुम्ही जेऊन लगेच झोपायला जाता का ? तसे करु नका ! झोपायला जाण्यापूर्वी किमान तीन तास आधी जेवण होईल याची खात्री करा.
५. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त किंवा उत्तेजीत आहात
शरीराला आराम देण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी नियमित योग आणि ध्यान करा. तुम्हाला खूप छान झोप येईल.
६. तुम्हाला तुमच्या खोलीतील किंवा कपड्यांबद्दलच्या काही गोष्टी बदलण्याची गरज आहे
तुमची खोली खूप गरम किंवा खूप थंड आहे का? आजूबाजूच्या परिसरातून खूप आवाजही येत असतील . तुमच्या बेडरुममधील हवेच्या खराब गुणवत्तेमुळे तुमच्या झोपेवर परिणाम होतो. तुमचा पलंग आणि उशा आरामदायक नसतील तर सुखाची झोप येणार नाही. तुम्ही घातलेले कपडे खूप तंग असतील किंवा अस्वस्थ करणारे असतील तर झोप येणार नाही.
७. तुम्ही नवीन जागी झोपत आहात का
तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही परगावी मुक्कामी जाता तेव्हा पहिल्या एक दोन रात्री तुम्हाला चांगली झोप येत नाही. हे स्वाभाविक आहे. हा मेंदूच्या गहिऱ्या स्तरातून येत असणारा प्रतिसाद आहे. शरीर निद्रेत जाण्याआधी त्या वातावरणात कोणताही धोका नाही हे मेंदूला पटवून देण्याची गरज असते. ध्यान करा, जप करा . आपल्या काही नेहमीच्या गोष्टी त्या खोलीत ठेवा.याचा निश्चित उपयोग होईल.











