गणेश चतुर्थी 2020 : निराकाराची साकार रूपात अनुभुति | ganpati chi mahiti marathi madhe

गणेश कोण आहे? | About Lord Ganesha in Marathi | गणेश म्हणजे काय

यावर्षी गणेश चतुर्थी 22 ऑगस्ट 2020 रोजी आहे. गणेश म्हणजे एक निराकार दैवत्व आहे - एक भव्य स्वरूप भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी. हिंदु पुराणानुसार गणेश हा शिव आणि देवी पार्वतीचा मुलगा आहे.

'गण' म्हणजे संघ, गट. हे विश्व विविध अणूंच्या आणि ऊर्जेच्या गटांनी बनलेले आहे. आणि यामध्ये परस्पर विरोधी अस्तित्व असणारे , वैविध्यपूर्ण कार्यप्रणाली असणारे गट देखील आहेत. अशा या विविध गटांना, गणांना एकत्र संचलित करणारी एक सर्वोच्च ऊर्जा, शक्ती नसेल तर गोंधळ माजेल. असे वैविध्य पूर्ण अस्तित्व असणाऱ्या अणूंच्या आणि ऊर्जांच्या गणांचा अधिपती, त्यांना नियंत्रित करून योग्य रितीने कार्यान्वीत राखणारी ऊर्जा म्हणजे ‘ गणेश ’. भक्तांच्या, साधकांच्या, योग्यांच्या कल्याणासाठी ‘ निराकार ’ शक्तीने घेतलेले व्यक्त रूप म्हणजे ‘ गणेश ’.

गणेश चा मतितार्थ

गणेश, गणपती चा मतितार्थ आदी शंकराचार्य यांनी सुंदर सांगितला आहे.

जरी गणेशाची पूजा गजमुख म्हणून केली जात असली तरी आपल्यातील निराकार रुप दाखविण्यासाठी हे गणेशाचे स्वरूप आहे.

गणपती हा अजम निर्विकल्पं निराकारामेकम आहे. याचा अर्थ म्हणजे गणेश हा अजम (ज्याला जन्म नाही असा) आहे, तो निर्विकल्पं (उपाधी) आहे, तो निराकार आहे आणि तो सर्वव्यापी असून चैतन्याचे प्रतिक आहे.

हे विश्व ज्या उर्जेने प्रकट झाले त्या समान उर्जा म्हणजे गणेश होय. ह्याच उर्जे मध्ये सर्वकाही प्रकट होऊन परत याच उर्जे मध्ये विरघळणार आहे.

गणेशाची जन्म कहाणी | Story of Lord Ganesh's birth

गणेश हे गजमुखी कसे झाले हे आपणा सर्वांना माहित आहे.

देवी पार्वती ही महादेवांबरोबर उत्सव साजरे करीत असताना मलीन झाल्या होत्या. त्यांना जेव्हा हे जाणवले तेव्हा त्यांनी अंगावरील धूळ झाडून त्याचा एक बालकाचा पुतळा निर्माण करून त्यामध्ये प्राण दिला आणि स्नान करून येई पर्यंत त्याला रक्षणास बसविले.

जेव्हा महादेव तिथे आले त्यावेळी त्या बालकाने त्यांना ओळखले नाही, त्यांना आत मध्ये सोडण्यास नकार दिला. तेव्हा महादेवांनी त्या बालकाचे धड उडविले आणि ते आत गेले.

पार्वतीला हे पाहून धक्का बसला आणि त्यांनी महादेवांना सांगितले की तो मुलगा आपला आहे आणि त्याला वाचविण्यास विनंती केली.

महादेवांनी आपल्या मदतनीस यांना उत्तर दिशे कडे निद्रावस्थेत असलेले धड आणण्यास सांगितले. मदतनिसांनी एका हत्तीचे धड आणले. महादेवांनी ते धड त्या बालकरुपी पुतळ्यावर बसविले आणि गणेशाचा जन्म झाला.

गणेश कथे तील तथ्य

पार्वती म्हणजे पर्व-उत्सव साजरी करणारी ऊर्जा, जी बहिर्मुख झाली आहे. बहिर्मुख ऊर्जा नेहमी राग द्वेषादी, अज्ञान आणि तणाव निर्माण करते, जे पार्वतीच्या शरीरावरील मळाच्या रूपाने दाखवले आहेत, ज्यापासून पार्वतीने गणेश निर्माण करून त्याला राखणीला बसवून अंघोळीसाठी - अंतर्मुख, शांत, आनंदी होण्यासाठी गेली.

शिव म्हणजे शुद्ध, आनंदी अंतर्मुख उर्जा. ज्ञाना शिवाय बहिर्मुख ऊर्जा अंतर्मुख होऊ शकत नाही. त्यासाठी मलरुपी तणाव, अज्ञान नष्ट होणे गरजेचे होते, जे शंकरांनी गणेशाचे धड उडवून केले. ज्ञान प्राप्तीसाठी, प्रज्ञाप्राप्तीसाठी छोट्या मनाचा त्याग करावा लागतो. तद्वत त्या बालकाचे छोटे मस्तक नष्ट करून तेथे विशाल असे ‘गज मुख’ बसवले, ही गणेशाची, विद्येच्या देवतेची जन्म कहाणी

गज म्हणजे हत्ती, जो ज्ञान शक्ती आणि कर्म शक्तीचे प्रतिक आहे. ज्ञान आणि सहजता ही हत्तीची गुण वैशिष्ट्ये आहेत.

हत्तीला कोणतीही विघ्ने रोखू शकत नाहीत, तर हत्ती सर्व विघ्नांचा नाश करून पुढे जात असतो म्हणून तेंव्हापासून सर्व पूजा-अर्चा, होम हवनामध्ये श्री गणेशपूजेला प्रथम प्राधान्य आहे.

गणेश रूप आणि वैशिष्ट्ये

लंबोदर म्हणजे औदार्य आणि संपूर्ण स्वीकार.

वरदहस्त म्हणजे संपूर्ण संरक्षण, ‘घाबरू नका, मी आहे’, ही हमी, तर खाली झुकलेला, बाहेर काढलेला तळहात म्हणजे दातृत्व, समर्पण आणि नम्रतेचे प्रतिक.

एकदंत म्हणजे अंतिम ध्येय प्राप्तीसाठी मन एकाग्र होणे, अंतर्मुख होण्याची सूचना.

एका हातातील ‘अंकुश’ जागृत, सजग राहण्याचा इशारा तर दुसऱ्या हातातील ‘पाश’ पंचेन्द्रीयांवरील, विभिन्न उर्जांवरील गरजेचे नियंत्रण दर्शवतात. या नियंत्रणाशिवाय सारे काही विस्कळीत होऊ शकते.

विशाल गजमुख धारी, लंबोदर गणेशाचे वाहन उंदीर? मजेशीर आहे ना? उंदीर म्हणजे निरुपयोगी प्राणी ना? पण या ब्रम्हांडात काहीही निरुपयोगी नाही. बुद्धिवान व्यक्ती अशा निरुपयोगी वस्तूंचा सदुपयोग केंव्हा, कोठे, कसा करायचा हे चांगले जाणतात, म्हणून ते वाहन आहे. उंदीर हे मंत्राचे प्रतिक आहे, जिच्या सदोदित चालण्यामुळे आपण अज्ञान रुपी धागा न धागा तोडू शकतो. सर्व बंध, पाश मुक्त करू शकतो. ज्ञान, प्रज्ञा प्राप्त करू शकतो, हेच यातून सुचवायचे आहे.

आपल्या ऋषी-मुनींना हे ठाऊक होते की, शब्द-भाषा ही स्थळ, काळानुरूप बदलते परंतु प्रतीके बदलत नाहीत. म्हणून त्यांनी विश्वव्यापी चेतनेला तिच्या कार्यपद्धतीनुरूप नावासोबतच विविध रुपांद्वारे, प्रतीकांद्वारे दैवतांच्या रुपामध्ये केलेले आहे. असा हा निराकार आणि सर्वव्यापी गणेश आपणां सर्वामध्येच सामावलेल्या ऊर्जेचे प्रतिक आहे, याबाबत सजग, जागृत राहून यंदा गणेश उत्सव साजरा करू या.

अन्य लेख

अष्टविनायक दर्शनाचा क्रम आणि अंतर | Ashtavinayak darshan sequence with distance

अष्टविनायक | Ashtavinayak

१. पहिला गणपती - मोरगांवचा श्री मयुरेश्वर

२. दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

३. तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर

४.चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक

५. पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी

६. सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

७. सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर

८. आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती