शांत मन (A quiet mind in Marathi)

श्री श्री रविशंकर :

जेव्हा मन अस्वस्थ असते तेव्हा उत्तर काहीही असले तरी मन थाऱ्यावर येत नाही. जेंव्हा तुमचे मन शांत असेल तेव्हा फक्त एक खूण मिळाली तरी तुम्हाला उत्तर कळते. कारण तुम्हीच सर्व उत्तरांचा स्रोत आहात. जेंव्हा तुम्ही शांत असता तेव्हा उत्तरे तुमच्यातूनच येतात.त्यासाठीच काही काळ निवांत बसणे गरजेचे आहे.एखाद्या अस्वस्थ माणसाला तुम्ही काहीही उत्तर दिले तरी तो म्हणेल, “ठीक आहे, पण .....”आणि मग ते एकानंतर एक विषय बदलत रहातात. हे अशा मनाचे लक्षण आहे ज्यात इतक्या कल्पना,संकल्पना भरलेल्या असतात की नवीन ज्ञान किंवा माहिती आत शिरायलाही जागा नसते.

एका गुरु शिष्याच्या बाबतीत असेच झाले. एक शिष्य गुरुकडे आला आणि तो एका पाठोपाठ एक प्रश्न विचारत राहिला पण गुरूने दिलेल्या कोणत्याही उत्तरांनी त्याचे समाधान झाले नाही.शेवटी गुरु म्हणाले, “चला आपण चहा घेऊ.” गुरु त्याच्या कपात चहा ओतू लागले.कप भरला तरी ते ओततच राहिले.कप पूर्ण भरून वाहू लागला आणि टेबलावर आणि जमिनीवर गळू लागला.शिष्याने विचारले, “गुरुजी, हे काय करताय ? कप भरला आहे.चहा सगळीकडे पसरतोय हे तुम्ही बघताय.” गुरु हसले आणि म्हणाले, “अशीच परिस्थिती तुझी आहे.तुझा कप इतका भरला आहे की त्यात आणखी भरण्यासाठी जागाच नाहिये.परंतु तुला आणखी हवे आहे.प्रथम तुझा कप रिकामा कर. जे आहे ते पिऊन टाक.”

प्राचीन ऋषींनी सांगितले आहे , ‘श्रवण’. आधी ऐका आणि मग ‘मनन’ म्हणजे विचार मंथन करा. मग ते अंगीकारा. कुणीतरी काही म्हटले म्हणून त्यावर विश्वास ठेऊ नका. त्याचबरोबर कुणी काही म्हटलेले झिडकारूनही टाकू नका. गीतेतील सर्व ७०० श्लोक सांगून झाल्यावर श्रीकृष्ण म्हणतात, “ विचाराचे स्वातंत्र्य, मताचे स्वातंत्र्य, विश्वास आणि श्रद्धेचे स्वातंत्र्य द्यायची गरज आहे. म्हणूनच आधी ऐका आणि त्यावर विचार मंथन करा, मग तो तुमचा स्वत:चा अनुभव बनेल. मग तो सूज्ञपणा बनतो.