शीर्षासन म्हणजे काय

‘शिर्ष‘ म्हणजे मस्तक’ आणि ‘आसन‘ म्हणजे ‘आसन’, म्हणून शीर्षासन हे डोक्यावर केले जाणारे आसन आहे.
उच्चार: शीर्-षा-आस-न
शीर्षासन हे सर्व आसनांचा राजा आहे कारण हे एक आसन असे आहे ज्यामध्ये डोक्यावर/माथ्यावर शरीराचे संतुलन केले जाते. हे एक उच्चस्तर योगासन आहे जे करण्याचा प्रयत्न योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली केला पाहिजे. हे आसन अनेक आरोग्यदायी फायद्यांमुळे खूप लोकप्रिय आहे. हे रक्ताभिसरण गतिमान करते आणि मेंदूला पुरेसे, ऑक्सिजनयुक्त रक्त मिळते आहे हे सुनिश्चित करते.
शीर्षासन कसे करावे:
- आपला टी-शर्ट आपल्या ट्रॅक पॅन्टमध्ये खोचून घ्या म्हणजे उलटे होताना आपणास शर्टाचा त्रास होणार नाही.
- चष्मा, अंगठी, बांगड्या किंवा घड्याळ घातले असल्यास, आसन सुरू करण्यापूर्वी ते काढून ठेवा. त्यांना चटईपासून दूर ठेवा जेणेकरून आपल तोल गेला तर आपण त्यांच्यापैकी कोणत्याही वस्तूवर पडू नये. आपल्या पाळीव प्राण्यांना दूर ठेवा.
- वज्रासनात बसा आणि दुमडलेल्या हातांच्या बोटांनी जमिनीवर विसावत पुढे वाका.
- डोके आणि हात जमिनीवर ठेवून त्यांचा एक त्रिकोण तयार करा.
- हातांची बोटे एकमेकात अडकवून त्यांच्या मध्ये माथा ठेवा.
- हळूहळू बोटांवर डोके संतुलित करा.
- जमिनीवरून गुडघे आणि नितंब वर उचलून सरळ करा.
- पाय हळूहळू धडाकडे वळवा.
- आता, स्वत:ला जमिनीवरून उचलण्याची तयारी करा – गुडघे वाकवा, टाच नितंबाजवळ ठेवा आणि हळू हळू नितंब सरळ करा जेणेकरून मांड्या जमिनीच्या लंबरेषेत असतील.
- पाय शिथिल असलेली एक सरळ रेषा होईल अशा स्थितीत संपूर्ण शरीर उभ्या रेषेत होईपर्यंत हळूहळू गुडघे आणि पोटऱ्या सरळ करा.
- शरीर संतुलित करा आणि ही स्थिती काही सेकंदांसाठी किंवा जोपर्यंत आपणास सुसह्य असेल तोपर्यंत टिकवून ठेवा. उच्चस्तर योग अभ्यासक एका मिनिटाने सुरुवात करू शकतात आणि नंतर किमान पाच मिनिटांपर्यंत या आसनात राहू शकतात.
- आपले लक्ष श्वास आणि डोक्याच्या भागावर केंद्रित करा.
- आसन सोडताना वरील क्रम उलट्या क्रमाने अनुसरण करा.
- हळूहळू पाय दुमडून मांड्या लंब स्थितीत आणा.
- हळूहळू पाय जमिनीवर ठेवा.
- या खाली डोके वर पाया अशा उलट्या स्थितीतून पुन्हा संतुलन साधण्यासाठी, काही वेळ शिशुआसन करावे.
- हाताची स्थिती सोडा आणि वज्रासनात बसा.
- शवासनामध्ये काही मिनिटे विश्रांती घ्या.
शीर्षासन: व्हिडीओ
नवशिक्यांसाठी शीर्षासन
या खाली डोके वर पाय अशा उलट्या आसनासाठी आपले शरीर तयार करण्यासाठी डॉल्फिन आसन किंवा मकर अधोमुख श्वानासन, फलकासन, अधोमुख श्वानासन, एकपाद शीर्षासन तसेच भिंतीच्या आधाराने शीर्षासन करू शकता.
आपण नुकतेच योग करायला सुरुवात केली असेल तर आपण खालील सूचना लक्षात घेणे अत्यावश्यक आहे:
- आपण शीर्षासन करताना आपल्या जवळ प्रशिक्षित योग प्रशिक्षक असल्याची खात्री करा.
- भिंतीजवळ किंवा स्थिरतेसाठी आधाराच्या सहाय्याने समतोल राखण्याची आसने उत्तम प्रकारे केली जाऊ शकतात. सर्वोत्तम सुरक्षा म्हणजे योग प्रशिक्षक आहे, हे येथे पुन्हा नमूद करीत आहोत.
- एक उशी किंवा घोंगडी यांच्याद्वारे आपल्या डोक्याला आरामदायी आधार द्या.
- वरील क्रम क्रमांक ८ नंतर, आपले पाय जमिनीवरून एक एक करून उचला. तसेच, त्याच क्रमाने खाली उतरा – एका वेळी एक पाय. सुरुवातीला फक्त काही सेकंदांसाठी आसन ठेवा आणि हळू हळू आपली क्षमता वाढवा आणि आपल्या जोमाचा स्तर लक्षात घेऊन प्रगती करण्याचे सुरु ठेवा.
शीर्षासनाचे फायदे
- लक्ष जागृत करतो
- संपूर्ण शरीर आणि मनात समतोल राखण्यास मदत करते.
- एकाग्रता वाढण्यास मदत होते. जेव्हा एकाग्रता अत्यंत केंद्रित आणि विचलित नसते तेव्हा ध्यान होते.
योग ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे सराव सुरू ठेवा! आपल्या योगाभ्यासात जितके खोलवर जाल तितके त्याचे सकारात्मक परिणाम अधिक खोलवर होतील. शीर्षासनाचा सराव करण्याचा आनंद घ्या आणि जास्तीत जास्त फायद्यांसाठी त्याचे क्रम पार पाडा!
योगामुळे शरीर आणि मनाचा विकास करणारे अनेक आरोग्यकारक फायदे मिळतात परंतु ते औषधाला पर्याय नाही. जर आपणास आरोग्याची काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर प्रशिक्षित श्री श्री योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली आसने शिका.
आपण स्वतः योगाचे फायदे अनुभवू इच्छिता? येथे श्री श्री योग कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.