नवशिक्यांसाठी सुर्यनमस्काराविषयी ११ तथ्ये (Sun salutation for beginners in Marathi)

सूर्यनमस्काराविषयी तुम्हाला जाणून घ्यायचे आहे काय? तुम्हाला उत्सुकता असेल की
हा नक्की काय प्रकार आहे? तो करण्याची पद्धत काय आहे? तो कधी करतात? तो किती वेळा करावा? वगैरे. कोणतेही योगासन करायला सुरुवात करताना तुम्ही खूप उत्साही असणे साहजिकच आहे. तथापि, सूर्यनमस्कार हा योग्य प्रकारे केला पाहिजे व त्याचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यासाठी त्याविषयीची तथ्ये जाणून घेणे महत्त्वाचे आहे. इथे नवशिक्यांसाठी सूर्यनमस्काराविषयी / काही महत्त्वाची माहिती .

#१) सूर्यनमस्कार का घालावेत? आपल्यापैकी खूप जणांना हा प्रथम पडणारा प्रश्न. सूर्यनमस्कार हा दोन कारणांसाठी महत्त्वाचा आहे. प्रथम हा आपल्या संपूर्ण शरीरासाठी एक उत्तम व्यायाम आहे – आपल्या स्नायूंना ताणणारा व त्यांना पुष्ट करणारा, एक वजन घटविण्याचा सर्वोत्तम व्यायाम. शारीरिक लाभापलीकडे याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत, जसे मन शांत होऊन ध्यान करण्यासाठी तयार होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे यानिमित्ताने सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. कारण त्याच्यामुळेच पृथ्वीवरील सजीव सृष्टी चालते.

#२) सूर्यनमस्कारासाठी योग्य वेळ कोणती? सूर्योदयावेळी, रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार घालावेत.

#३) मी संध्याकाळी सूर्यनमस्कार करू शकतो? हो, सूर्योदय व सूर्यास्तावेळी सूर्यनमस्कार करू शकता.. जर चंद्रोदय झाला असेल तर चंद्रनमस्कार घातले जातात. ज्याच्यात आणखी एक आसनक्रम असतो.

#४) सूर्यनमस्कार कुठे घालावेत? असे कोणतेही बंधन नाही. शक्यतो मोकळ्या जागेत किंवा हवा खेळती असलेल्या खोलीत सूर्याकडे तोंड करून सूर्यनमस्कार घालावेत.

#५) जास्ती ताण न देता, जेवढे जमेल तितकेच शरीर ताणावे. सुरुवातीला तुम्हाला तुमच्या योगशिक्षकांचे किंवा इतरांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते व प्रत्येक माणसाच्या शरीराची लवचिकता देखील वेगळी असते. कुणाशीही स्पर्धा करू नये. तुम्हाला जेवढे जमेल व झेपेल तेवढेच करावे.

#६) किती सूर्यनमस्कार घालावेत? रोज १२ फेऱ्या सूर्यनमस्कार करणे चांगले (दोन फेऱ्यांचा एक संच – उजवा पाय पुढे ठेऊन सहा व डावा पुढे ठेऊन सहा). परंतु सुरुवातीला दोन ते चार फेऱ्या झाल्या तरी पुरेशा आहेत. नंतर हळूहळू वाढवत नेऊन तुम्ही शक्य होईल तितक्या करू शकता (अगदी १०८ सुद्धा).

साधारणपणे संचात सूर्यनमस्कार करणे चांगले कारण त्यामुळे शरीराच्या दोन्ही भागांचा समान वापर होतो.

#७) फक्त सूर्यनमस्कार करणे पुरेसे नाही. त्यांच्या जोडीला योगासने करणे श्रेयस्कर असते. सूर्यनमस्कार हा जरी संपूर्ण व्यायाम असला तरी त्यानंतर काही योगासने केली तर एक पूर्ण तंदुरुस्तीचा अनुभव येतो. याबाबतीत तुम्ही तुमच्या योगशिक्षकांशी बोलून नंतर कोणती आसने करावीत ते ठरवावे.

#८) सूर्यनमस्कार करताना वेग किती असावा? वेगवेगळ्या गतीने (संथ, मध्यम व जलद) सूर्यनमस्कार करण्याचे परिणाम देखील वेगवेगळे असतात. संथ गतीने केल्यास स्नायू पुष्ट व मजबूत होतात. श्वासाच्या लयीबरोबर सूर्यनमस्कार केल्याने शरीर, मन व श्वास लयीत येतात आणि एका संपूर्ण ध्यानाचा अनुभव येतो. जलद गतीने केलेले सूर्यनमस्कार हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. कोणत्याही व्यायामापूर्वी सूर्यनमस्कार जलद करावेत. पण ते जर योगासंनाचा भाग असतील तर ते संथ किंवा मध्यम गतीने करणेच चांगले.

#९) तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच सूर्यनमस्कार शिकावेत. कोणत्याही योगासानासारखेच, सूर्यनमस्कार देखील अनुभवी व प्रशिक्षित योगशिक्षकांकडून शिकावेत.

#१०) पाठीच्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुमची पाठ सतत दुखत असेल, शरीरात कुठेही वेदना होत असतील किंवा एखादी जुनी व्याधी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सूर्यनमस्कार करावेत.

#११) तुमची योगसाधना नित्य व निष्ठेने करा. उत्तम लाभासाठी सूर्यनमस्कार रोज घाला. तदनंतरच तुम्हाला त्यातील फायद्यांचा अनुभव येईल. श्री श्री योगचे वरिष्ठ शिक्षक कृष्ण वर्मा म्हणतात, “कधीतरी एक तास साधना करण्यापेक्षा रोज २० मिनिटे करा.”

तुमच्या परिसरात श्री श्री योगा कार्यक्रम कधी आहे याची माहिती घ्या व सूर्यनमस्कार योग्य तऱ्हेने कसे करावेत हे श्री श्री योगशिक्षकांकडून शिका.  तुमचे प्रश्न व शंका इथे info@srisriyoga.in पाठवा. आम्ही तुमच्या योगसाधनेत मदत करण्यास उत्सुक आहोत.

हा लेख वरिष्ठ श्री श्री योग शिक्षक दिनेश काशीकर व कृष्ण वर्मा (योग शिरोमणी व योगाचार्य) यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे.

Interested in yoga classes?