योग करा आणि अर्धशिशीपासून बरे व्हा (Migraine treatment at home in Marathi)

अर्धशिशी हा चेतासंस्थेचा आजार आहे. यामध्ये हलक्या ते उच्च तीव्रतेची डोकेदुखी वारंवार होत राहते. ही डोकेदुखी विशेषतः डोक्याच्या अर्ध्या भागातच होते आणि यामध्ये डोके दोन तासांपासून ते दोन दिवसांपेक्षा अधिके दिवस दुखत राहते. जेव्हा अर्धशिशीचा अॅटॅक येतो तेव्हा या व्याधीने ग्रस्त व्यक्तीला उजेड आणि आवाज अजिबात सहन होत नाही. वांती होणे, मळमळणे आणि कोणतेही शारीरिक काम केल्याने डोक्यातील वेदना वाढणे ही अर्धशिशीच्या आजाराची काही सामान्य लक्षणे आहेत.

यु के मधील एका ट्रस्टनुसार, केवळ युकेमध्येचे जवळजवळ आठ मिलियन लोकांना अर्धशिशीचा त्रास आहे आणि युकेमध्ये दररोज ०.२ मिलियन लोकांना अर्धशिशीचा अॅटॅक येतो. असे पण मानले जाते की अर्धशिशी हा सामान्यपणे सर्वात जास्त आढळणारा चेतासंस्थेचा आजार आहे आणि दमा, अपस्मार आणि मधुमेह यांना एकत्रितपणे घेतले तरी याचे प्रमाण जास्त आहे.

यातून सुटकेचा मार्ग काय?

जर तुम्ही अनेक वर्षांपासून डोक्याची शकले करून टाकणाऱ्या दुखीने त्रस्त आहात किंवा तुम्हाला अर्धशिशी आहे असे निदान केले गेले आहे तर औषधोपचाराव्यतिरिक्त अनेक मार्ग आहेत ज्याने तुमच्या दुखण्यावर विजय मिळवता येईल. धमनीची शस्त्रक्रिया, स्नायूंची शस्त्रक्रिया, डोक्याच्या मागील भागांच्या मज्जातंतूंचे उद्दीपन, बोटाँक्स, बीटा-ब्लॉकर्स आणि नैराश्य घालवणारी औषधे हे काही उपचार आहेत जी अर्धशिशीच्या अॅटॅकला प्रतिबंध पद्धती म्हणून वापरली जातात. परंतू सावधान: या सर्व पद्धतीं दुष्परिणाम रहित नाहीत. यातील काही उपचारांमुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, निद्रानाश आणि मळमळणे किंवा अन्नाचा तिटकारा या व्याधींचा धोका वाढतो.

तर मग अर्धशिशीवर काही नैसर्गिक उपाय आहे का? असा उपाय ज्याच्या बरे होण्याच्या प्रक्रियेत शरीराला अपाय होणार नाही?

सुदैवाने हो. उत्तर आहे योग.

योगाने होईल बचाव!

योग हे प्राचीन तंत्र आहे जे समग्र जीवन जगण्याकरिता आसने आणि श्वसन तंत्रे यांच्या संयोगाचा पुरस्कार करते. अर्धशिशीपासून आराम मिळवण्याची योग हे पूर्णपणे दुष्परिणाम रहित पद्धती आहे. खालील दिलेल्या सोप्या आसनांचा सराव दररोज केल्याने तुम्ही पुढच्या अर्धशिशीच्या अॅटॅककरिता चांगल्याप्रकारे तयारीत असाल:

हस्तपदासन (उभे राहून समोरच्या दिशेने वाकणे)

उभे राहून समोरच्या दिशेने वाकल्याने चेतासंस्थेला अधिक रक्त पुरवठा मिळाल्याने तरतरी प्राप्त होते आणि त्याने मनसुद्धा शांत होते.

सेतू बंधासन (सेतू किंवा पुलाप्रमाणे आसन)
 

सेतू किंवा पुलाप्रमाणे असणारे हे आसन मेंदूला शांत करते आणि अस्वस्थता कमी करते.

 

शिशुआसन (बालकाप्रमाणे आसन)

हे बालकाप्रमाणे असणारे आसन चेतासंस्थेला शांत करते आणि दुखणे परिणामकारकरित्या कमी करते.

मार्जरीआसन (मांजराप्रमाणे शरीर ताणणे)

मांजराप्रमाणे शरीर ताणल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्याने मनाला सुद्धा विश्रांती मिळते.

 

पश्चिमोत्तानासन (दोन्ही पाय समोर ठेवून वाकणे)

दोन्ही पाय समोर ठेवून वाकाल्यामुळे मेंदू शांत होतो आणि तणावापासून मुक्ती मिळते.
या योगासनामुळे डोकेदुखीसुद्धा थांबते.

अधोमुख श्वानासन (खाली वाकून कुत्र्या/श्वानाप्रमाणे आसन)

खाली वाकून श्वानाप्रमाणे हे आसन केल्यामुळे मेंदूचे रक्ताभिसरण वाढते आणि डोकेदुखी बंद होते.

 

पद्मासन (कमळाप्रमाणे आसन)
 

कमळाप्रमाणे हे आसन केल्याने मन शांत होते आणि डोकेदुखी शमते.

शवासन (प्रेताप्रमाणे आसन)

प्रेताप्रमाणे असणारे हे आसन गहन समाधीवस्थेत मिळणारी विश्रांती देऊन शरीराला तरतरी आणते.
तुमचा योगाचा दैनंदिन सराव या आसनामध्ये काही मिनिटे आडवे होऊन संपवावा.

 

अर्धशिशीच्या अॅटॅकमध्ये डोके असहनीय दुखते आणि त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर वाईट परिणाम होतो. तुमच्या परिस्थितीची कल्पना तुमच्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला आणि सहव्यावसायिकांना द्यावी. त्यामुळे त्यांचा नैतिक आणि भावनिक आधार तुम्हाला मिळेल. तसेच त्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि ते अधिक खुल्या मनाने तुमच्या परिस्थितीचा विचार करू लागतील. तसेच जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत तुमची औषधे बंद करू नका. योग हे तुमच्या अर्धशिशीचा अधिक चांगल्याप्रकारे प्रतिकार करण्याचे माध्यम आहे आणि त्याचा उपयोग औषधाला पर्यायी असा करू नये.

या सोप्या योगासनांचा सराव केल्याने अर्धशिशीच्या अॅटॅकचा प्रभाव कमी होईल आणि कदाचित तो कायमचा बंदसुद्धा होईल. म्हणूनच, चला सतरंजी अंथरा, दररोज थोडावेळ विश्रांत व्हा आणि अर्धशिशीला आपल्या आयुष्यातून कायमचे काढून टाका!

 

नियमित सरावाने शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि सोबत आरोग्याचा लाभ होतो पण हे औषधाला पर्यायी नाही. श्री श्री योग  प्रशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग शिकणे व त्याचा सराव करणे हे अतिशय महत्वाचे आहे. वैद्यकीय समस्या असल्यास, योगाचा सराव करायच्या आधी डॉक्टर आणि श्री श्री योग शिक्षक यांचा  सल्ला घ्यावा. तुमच्या जवळील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मध्ये श्री श्री योग शिबिराचा शोध घ्या. तुम्हाला शिबिरांसंदर्भात माहिती हवी आहे का किंवा तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत का? आम्हाला info@srisriyoga.in इथे लिहा