चक्की = जाते, चालना = चालविणे, आसन = स्थिती किंवा मुद्रा.
भारतातील खेड्यांमध्ये सामान्यतः जात्यावर गहू, ज्वारी दळताना हात ज्या पद्धतीने हलवले जातात त्याची नक्कल या योगासनात केली जाते. हा शरीरासाठी एक मजेदार आणि उत्कृष्ट व्यायाम म्हणून उपयुक्त ठरतो.
चक्की चालनासन कसे करावे.
समोर पाय पसरून बसा. आपले हात एकमेकांत पकडा आणि आपल्या समोरच्या दिशेला खांद्याच्या उंचीवर आपले हात लांब करा.
दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या शरीराचा वरचा भाग समोरुन उजवीकडे हलवू लागा, ज्यायोगे तुमच्या शरीराची एक काल्पनिक वर्तुळाकार फेरी होईल.
पुढे आणि उजवीकडे जाताना श्वास घ्या आणि मागे आणि डावीकडे जाताना श्वास सोडा.
फिरत असताना खोल आणि सहज श्वास घेत रहा. तुम्हाला हात, पोट, मांडीचे सांधे आणि पाय यांत ताण जाणवतो का?
श्री श्री योग शिक्षकांकडून टीप: पाठीच्या खालच्या भागापासून वाकत पुढे झुका आणि तुमचे पाय स्थिर ठेवा. धड फिरत असल्याने पायांमध्ये थोडीशी हालचाल होणे स्वाभाविक आहे. पाठीबरोबर आपले हातही फिरतात.
एका दिशेने ५-१० फेऱ्या करा आणि नंतर विरुद्ध दिशेने पुन्हा करा. तुमचे गव्हाचे पीठ पोळ्या करण्यासाठी तयार आहे!
चक्की चालनासनाचे फायदे
सायटीका साठी एक चांगला प्रतिबंध.
पाठीच्या, पोटाच्या आणि हाताच्या स्नायूंना मजबुती देते.
छाती विस्तारते आणि मांडीचे सांधे मोकळे होतात.
स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या स्नायूंना मजबुती देते, म्हणून नियमितपणे सराव केल्यास मासिक पाळीतल्या वेदना रोखण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.
सातत्यपूर्ण सरावामुळे पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते.
प्रसूती नंतर वाढणारी पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे (तथापि, कृपया या योगासनाचा सराव करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या).
चक्की चालनासन कधी करु नये?
जर तुम्ही गरोदर असाल, रक्तदाब कमी असेल, स्लिप डिस्कमुळे पाठीच्या खालच्या भागात अत्यंत वेदना होत असतील किंवा डोकेदुखी किंवा मायग्रेन (अटॅक दरम्यान) तसेच अलीकडेच हर्निया इत्यादी साठी पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल, तर या आसनाचा सराव करु नका.
सर्व योग पोझेस मागील योगासन: शिशुआसन पुढील योगासन : वज्रासन










