सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर | Vighneshwar Temple, Ozar, Pune

देऊळ लेण्याद्रीपासून २० किमी आणि ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे गणपतीने विघ्नासुर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा असासुद्धा होतो.

श्री क्षेत्र विघ्नेश्वराची कथा

पुराणानुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळविण्यासाठी यज्ञ केला त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तिथे विध्वंस करण्यास आणि यज्ञ बंद पडण्यासाठी धाडले. विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकलीच शिवाय त्याने विश्वामध्ये अनेक विघ्ने निर्माण केली. म्हणून मग पृथ्वीतळावरील लोक ब्रम्हदेव आणि शंकर यांच्याकडे गेले. त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यास सांगितले.

समस्त लोकांनी गणपतीची अराधाना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती पराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतीर्ण झाला आणि विघ्नासुराबरोबर घनघोर युद्ध करून गणपतीने त्याचा पराभव केला. यामुळे लोक अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची स्थापना केली.

Vighneshwar ganapati

श्री क्षेत्र विघ्नेश्वर मंदिर आणि परिसर

या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनीसुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. देवळाच्या भिंतींवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. मंदिर २० फुट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल १० फुट लांब आहे. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. देवळात लहान लहान खोल्या आहेत. यांना ओवऱ्या म्हणतात. इथे बसून भक्त ध्यान करू शकतात.

पूजा आणि उत्सव

उपलब्ध माहितीनुसार दर्शनाची वेळ सकाळी ५ ते रात्री ११. अंगारकी चतुर्थीला सकाळी ४ पासून रात्री ११ पर्यंत. महाआरती सकाळी ७.३०, मध्यान्न आरती दुपारी १२ आणि शेजआरती रात्री १० वाजता असते. महाप्रसाद सकाळी १०, दुपारी १ आणि संध्याकाळी ७.३० ते १०.३०.

भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती यादिवशी उत्सव साजरे केले जातात. कार्तिक पौर्णिमेला दीपमाळांची रोषणाई बघण्यासारखी असते.

जवळची इतर दर्शनीय स्थळे

  • भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग. अंतर अंदाजे ७८ किमी
  • आर्वी हे उपग्रह केंद्र. अंतर अंदाजे १३ किमी
  • खोडद येथे आशिया खंडातील सर्वात मोठी आकाश दुर्बीण बसविलेली आहे. अंतर अंदाजे २१ किमी
  • संत ज्ञानेश्वर यांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले त्या रेड्याची समाधी आळे येथे आहे. अंतर अंदाजे २७ किमी

अष्टविनायक यात्रे बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

<<सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक                           आठवा गणपती - रांजणगावचा श्री महागणपती>>

 
Founded in 1981 by Sri Sri Ravi Shankar,The Art of Living is an educational and humanitarian movement engaged in stress-management and service initiatives.Read More