पाच प्रकारचे प्रश्न (Five types of questions in Marathi)

श्री श्री रविशंकर :

एप्रिल २०१३

पृथ्वीतलावरच्या प्रत्येक शोधाच्या मागे असलेले स्फुल्लिंग म्हणजे जिज्ञासा,जाणून घेण्याची मनीषा. जेंव्हा ही जिज्ञासा बहिर्मुख असते तेव्हा , म्हणजे ‘हे काय आहे ? हे कसे झाले ?’ तेंव्हा ते विज्ञान असते. आणि जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा, म्हणजे, ‘मी कोण आहे ? मी इथे कशासाठी आहे ? मला नेमके काय पाहिजे आहे ?’ तेंव्हा ते अध्यात्म असते.

आपण दररोज संध्याकाळी अनौपचारिकपणे एकत्र येतो तेंव्हा काही वेळ भजने म्हणून झाली की हजर असलेल्या लोकांकडून मला काही प्रश्न विचारले जातात. गेल्या अनेक वर्षांमध्ये मला अनेकविध विषयांवर कोट्यावधी प्रश्न विचारले गेले असतील. विचारण्यायोग्य प्रश्नांची संख्या जरी खूप मोठी असली तरी प्रत्यक्षात फक्त पांच प्रकारचे प्रश्न असतात.

  1. शोकाकूल होऊन : बहुतेक वेळा लोक प्रश्न विचारतात ते शोकाकूल असताना. बहुतेकदा त्याचे स्वरूप असे असते की, “हे माझ्या बाबतीत कां घडले ?” “ मी असे काय केले म्हणून हे माझ्या वाट्याला आले ?” वगैरे. कुणी जर दु:खाने प्रश्न विचारत असलेले दिसले तर फक्त ऐकून घ्या. त्यांना फक्त कुणीतरी ऐकून घ्यायला हवे असते. त्यांना खरे तर उत्तर वगैरे नको असते.  
  2. रागाने :“मी काहीही चुकीचे केले नाही. मी बरोबर होतो. मग माझ्यावर कां आरोप केला जातोय ? असे कां होतेय ?” असे प्रश्न रागाच्या भरात निर्माण होतात. इथे देखील ते त्यांच्या भाव-भावनांच्या भोवऱ्यात अडकलेले असतात आणि असे प्रश्न विचारून ते स्वत:चे समर्थन करत असतात. जेव्हा कुणी अशा स्फोटक मनस्थितीत असते तेंव्हा तुम्ही काहीही उत्तर दिले तरी ते त्यांच्यात शिरत नाही. उलट त्यातून आणखी प्रश्न आणि समर्थने निर्माण होतात.
  3. लक्ष वेधून घेण्यासाठी : काही लोक प्रश्न विचारतात ते केवळ त्यांचे तिथले अस्तित्व इतरांना जाणवून देण्यासाठी. उत्तर मिळवण्यापेक्षा, प्रश्न विचारून इतरांचे लक्ष वेधून घेण्यातच त्यांना समाधान असते.
  4. परीक्षा घेण्यासाठी : काही जण समोरच्याला खरेच माहिती आहे की नाही याची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारतात. त्यांना उत्तर मनोमन आधीच माहित असते आणि त्यांच्या उत्तराशी ते उत्तर जुळते की नाही हे त्यांना ताडून बघायचे असते.
  5. मनापासून विचारणे : पाचव्या प्रकारचे प्रश्न अशाच लोकांकडून विचारले जातात ज्यांना मनापासून काही तरी जाणून घ्यायचे असते आणि ज्याला ते प्रश्न विचारात आहेत त्यांना ते माहित आहे आणि ते सांगतील यावर त्यांचा विश्वास असतो. फक्त अशा प्रकारच्या प्रश्नांनाच उत्तरे द्यावीत.

 

बहुतेक सर्व पौराणिक ग्रंथातून , मग ती भगवत गीता असो, योग वसिष्ठ असो, त्रिपुरा रहस्य असो की उपनिषद असो, त्याची सुरवात प्रश्नाने होते. हे प्रश्न केवळ उत्सुकता म्हणून विचारले गेलेले नाहीत तर अतिशय जवळीकीच्या भावनेतून विचारले गेलेले आहेत. उपनिषद म्हणजेच गुरुच्या जवळ,सन्निध बसणे, केवळ शारीरिकरित्या जवळ नाही तर मनाने गुरुच्या जवळ असल्याची जाणीव होणे. ज्ञान वर्धन होण्यासाठी आपलेपणाची भावना असलेले वातावरण असणे गरजेचे आहे. तुम्हाला जितके जास्त गुरुच्या सानिध्यात असल्याचे जाणवेल तितके तुमच्यात ज्ञान आपोआप उलगडू लागते.

या अस्तित्वाचा कण अन् कण प्रज्ञेने,बुद्धीने काठोकाठ भरलेला आहे. कधी अंकुरायचे हे बीजाला नेमके माहित असते आणि कधी उमलायचे हे फुलाला नेमके माहित असते. या सृष्टीमध्ये जे काही जीवन घडत आहे त्या सर्वातून असीम बुद्धिमत्ता प्रगट होत असते. तुमच्या आसपास सगळीकडे ही विलक्षण घटना घडत असलेली तुम्ही बघू लागता तेव्हा तुमचे सगळे प्रश्न अति विस्मयाच्या भावनेत विरघळून जाऊ लागतात. आणि (हेच आर्ट ऑफ लिव्हिंग) हीच जीवन जगण्याची कला आहे.

श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य  www.artofliving.org

Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri