शरीराच्या शुद्धीसाठी आम निवारण करणारा योग (Detox Yoga for Cleansing the Body in Marathi)

त्वचा, प्रदूषित हवा आणि भेसळयुक्त अनारोग्यकारक अन्न पदार्थांमुळे आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात आम / विषारी  द्रव्ये तयार होत असतात. त्याचबरोबर मूत्राशय, पित्ताशय आणि फुप्फुसे यांच्या मदतीने या विषारी  द्रव्यांचा निचरा होण्यासाठी आपल्या शरीराची रचना इतकी हुशारीने केलेली आहे. त्वचेतूनही घामाच्या रूपात या आमाचा निचरा होत असतो.

तरीही आपली अनारोग्यकारक जीवनशैली आणि चुकीचा आहार यांच्यामुळे हा निचरा होण्यास अडथळा येतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण शरीराचे कार्य नीट न चालण्यावर होतो. अशावेळी शरीराची आतून बाहेरून शुद्धी करण्याची (डी टॉक्सिफिकेशन) गरज निर्माण होते

डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या शरीराकडे बघा. वरचेवर दुखणे, त्वचेचा त्रास, अपचन आणि वेळे आधी वृद्धत्व अशा गोष्टी होत आहेत कां? याचे उत्तर ‘होय’ असेल तर तुम्हाला शरीरातील आमाचा / विषारी  द्रव्यांचा निचरा करून घेण्याची वेळ आली आहे. काही साध्या सोप्या योगासनांच्या मदतीने शरीराची शुद्धी करण्यासाठी काही युक्त्या.
थंडीच्या दिवसात जेव्हा लोक व्यायाम कमी करतात आणि पौष्टिक नसलेला आहार घेतात तेव्हा शरीरात मोठ्या प्रमाणात आम साठतो. फास्ट फूड आणि तळकट पदार्थ ज्यात साठलेला मेद असतो त्यात आम भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे हे पदार्थ मर्यादित स्वरुपात घ्यायला हवे.

कृत्रिम गोडवा आणणाऱ्या गोष्टी आणि अति शुध्द केलेली साखर घेणे टाळा कारण हे पचण्यास जड असते आणि रक्तातील साखरेच्या प्रमाणासाठी धोकादायक असते. पित्ताशयावर त्याचा भार पडतो आणि कालांतराने मधुमेह आणि स्थूलता येऊ शकते. गोड खायची इच्छा झाली तर साखर घातलेले रस आणि शीतपेये घेण्यापेक्षा ताजी फळे खा. जर तुम्हाला आमाचा निचरा आणि शरीर शुद्धी करायची असेल तर चहा, कॉफीचे प्रमाण कमी करा. मद्यपान आणि धुम्रपान यांच्यापासून दूर राहिलात तर आमाचा निचरा होण्यास मदत होईल.

शरीरातील आमाचा निचरा आकारण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या आहारात ताजी फळे आणि पालेभाज्या यांचा समावेश करणे. तंतुमय पदार्थ असलेले मुळा कोबी, आणि द्राक्षासारख्या फळांची आम सहजपणे निघून जाण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ‘क’ जीवनसत्व असलेल्या पदार्थामुळेही ग्लुटेथायोन या लिव्हर कंपाऊंडच्या  मदतीने आमाचा निचरा होण्यास मदत होते. रोज एक संत्रे डॉक्टरला दूर ठेवते असे इथे म्हणता येईल. तसेच अर्ध्या लिंबाचा रस कोमट पाण्यात घेणे ही देखील दिवसाची चांगली सुरवात होऊ शकेल.

ग्रीन टीमुळे ही शरीराची शुद्धी होते. थंडीच्या दिवसात तुम्ही ४ कप पर्यंत ग्रीन टी पिऊन सहजपणे पित्ताशयातील आमाचा निचरा करू शकता. गोल्डन सील, डेंडेलीअन आणि नीम यासारखे ग्रीन टी, घेऊ शकता. साध्या तांदुळा ऐवजी हातसडीचा तांदूळ आणि क्लोरोफिल असलेल्या भरपूर पालेभाज्या यामुळे रक्त शुद्धी होते. अश्याप्रकारे योग्य आहार निवडल्याने आम साठत नाही.

आमाचा निचरा करण्यासाठी योग हाही उत्तम मार्ग आहे. कारण त्यामुळे शरीरातील लॅक्टिक अॅसिड, कार्बन डाय ऑक्साईड आणि लिम्फॅटिक फ्लुइड निघून जातात. त्रिकोणासन, पश्चिमोत्तानासन आणि उष्ट्रासन  या आसनांमुळे बद्धकोष्ठ दूर होते. पवनमुक्तासनाने गॅस,पोटातील वायूचे त्रास कमी होतात. मत्स्यासनाने पोटातील स्नायूला मालिश होते. वाफेचे स्नान हा घामातून आमाचा निचरा करण्याचा आणखी एक मार्ग आहे.

शेवटचे आणि महत्वाचे – तुमच्या श्वासाच्या गतीला कमी लेखू नका. कपालभातीआणि भस्त्रिका  यासारखे प्राणायाम हे आमाचा निचरा करणारे आहेत. त्याने शरीर पुनरुज्जीवीत होते. सुदर्शन क्रिया हे आणखी एक प्रभावी असे लयीत श्वास घेण्याचे तंत्र आहे, ज्याने आमाचा निचरा होतो. सुदर्शन क्रिया, योग आणि ध्यान यांच्या नियमित साधनेने मन, शरीर निरोगी बनते, दम वाढतो, प्रतिकारशक्ती वाढते आणि कार्यक्षमता वाढते.

तुमच्या शरीराला योग्य पोषक आहार आणि झोप यापेक्षा आणखी काही गोष्टींची गरज आसते. त्या केल्या तर तुम्ही आजारांना दूर ठेऊ शकता, तुमची कार्यक्षमता वाढते आणि तुम्ही जीवनाचा आनंद उपभोगू शकता. तर, या काही साध्या सोप्या सूचना अमलात आणून जीवन आरोग्यकारक आणि आम मुक्त बनवा.

योगसाधनेमुळे शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण तरीही तो औषधास पर्याय नाही. प्रशिक्षित आणि तज्ज्ञ आणि प्रशिक्षित योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने शिकणे आणि  करणे महत्वाचे आहे. जर काही व्याधी असेल तर डॉक्टर आणि योग शिक्षक यांचा सल्ला घेतल्यानंतरच आसने करणे चांगले.