योगाच्या नवशिक्यांकरिता ११सूचना (Basic Tips to Get Started With Yoga in Marathi)

निसर्गरम्य पार्श्वभूमीवर एक व्यक्ती खाली डोके वर पाय करून योगा करीत आहे आणि ते चित्र पाहून आपण कित्येकदा स्वतःला म्हणतो, 'छे, योगा मला काही जमणार नाही.'  खाली दिलेल्या योगाच्या नवशिक्यांकरिता ११ वैशिष्ठ्यपूर्ण सूचना तुम्ही पाळल्यात तर तुमच्या योगा न करण्याच्या निर्णयावर तुम्ही पुनर्विचार कराल असे   योगा तुम्हाला देऊ करतो. त्या वाचा आणि पुढच्या वेळी निसर्गरम्य पार्श्वभूमीवर योगा करणारे तुम्हीच असाल !

१. नवशिक्यांकरिता योगा

एक नवशिके म्हणून आपल्याला बहुदा असे वाटते की योगा म्हणजे काहीतरी अवघड, हात-पाय वेडेवाकडे वळवायला लावणारी आसने आहेत. आणि कधीतरी तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकते की, 'मला तर पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करणेसुद्धा जमत नाही तर मी योगा कसा करणार?' योगा म्हणजे पायांना स्पर्श करणे किंवा तुमच्या उत्तरपूर्व दिशेला ९८ अंश वळणे नव्हे. तुमचा श्वास, शरीर आणि मन यांना एकत्र आणण्याची ती साधी प्रक्रिया आहे. आणि ती सोपी आणि सहज शक्य आहे.

,म्हणूनच जर तुम्ही मिस लवचिक किंवा मिस्टर ताणबहाद्दर नसाल, किंवा तुमची वयाच्या ४० व्या वर्षी योगा सुरु करीत आहात, किंवा तुमच्या कमरेचा वाढता घेर तुम्हाला तणाव देतो आहे , तर काही हरकत नाही. योगाचा सराव सुरु करण्याआधी फक्त या कल्पित कथांना सर्वप्रथम सोडचिठ्ठी द्या! तुम्हाला बघणारे केवळ तुम्ही स्वतःच आहात - तर निश्चिंत राहा. हा प्रवास आनंददायक आणि आरामशीर असेल.

२. जीवनाचे एक नवीन परिमाप

पात्रता असलेल्या योगा शिक्षकाकडून योगा शिकायला सुरुवात करणे हे सर्वात उत्तम आहे. योगा शिक्षक तुम्हाला प्रत्येक तंत्र योग्यरीतीने करण्याचे मार्गदर्शन करतील. याने तुम्हाला योगासने व्यवस्थित शिकण्यात मदत होईल आणि संभवनीय इजांना टाळता येईल. योगामधील काही तत्वज्ञान किंवा तंत्रे नवीन असू शकतील परंतु  खुल्या मनाने केल्यास योग्य राहील. त्यामुळे तुमचा दृष्टीकोन रुंदावेल आणि तुमचा योगाचा अनुभव अधिक संपन्न होईल.

३. विशेष तज्ञांची मदत घ्या

जर तुम्हाला काही वैद्यकीय खबरदारी घेण्यास सांगितले गेले असेल तर योगा सुरु करण्याआधी हे तुम्ही तुमच्या श्री श्री योगा शिक्षक यांना सांगावी. त्यामुळे तुमच्या सरावला अनुकूल अशी योगासने निवडण्यात शिक्षकांना मदत होईल आणि शिवाय कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गुंतागुंत किंवा इजा टाळता येतील.

४. सुटसुटीत कपडे घाला !

योगावर्गाला जाताना किंवा घरच्या घरी योगा  चा सराव करताना आरामदायी पेहराव घालावा.  तसेच बेल्ट लावणे आणि अति दागदागिने घालणे टाळावे कारण ते तुमच्या योगाच्या सरावात अडथळा निर्माण करू  शकतात.

५. एक नियमित योगी व्हा

पहाटे पहाटे योगाचा सराव करणे जरी उत्कृष्ठ असले तरी जोपर्यंत तुम्ही तुमच्या सरावात एकदम नियमित आहात तर तुम्ही दिवसातून कोणत्याही वेळी योगा केला तरी चालेल. जर तुमच्या वेळापत्रकात सकाळी योगा करणे बसत नसेल तर ती योगाचा सराव सोडून देण्याकरिता एक सबब बनू देऊ नका !

६. हलके रहा !

रिकाम्या पोटी सराव करावा. जेवणाच्या निदान २-३ तासांनंतर. तसेच दिवसभरात किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावे कारण त्यामुळे योगा करताना जी विषारी द्रव्ये शरीरात निर्माण होतात त्यांना बाहेर फेकण्यास पाण्याने मदत होते.

७. योगा करण्याआधी हलका व्यायाम करा

शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी हलका व्यायाम किंवा सूक्ष्म व्यायाम  केल्याने शरीर मोकळे होण्यात मदत होते आणि पुढे करणाऱ्या योगासनांकारिता शरीर तयार होते.

८. स्मितहास्याने तुमची सगळी कामे होतील

तुम्ही स्वतः फरक अनुभवा. चेहऱ्यावर मंद स्मितहास्य ठेवल्याने शरीर आणि मन शिथिल होते आणि तुम्हाला योगासने करण्यात आणखी मजा येते. शांत मन तुम्हाला तुमच्या शरीराच्या मर्यादेच्या पलीकडे घेऊन जाईल आणि तुमची योगासने करण्याची क्षमता नेहमीपेक्षा अधिक वाढेल.

९. टप्प्या टप्प्याने आपल्या मर्यादांना आव्हान द्या

प्राचीन योगा ग्रंथ, पतंजली योग सूत्रे , यामध्ये योगासनांची व्याख्या स्थिर सुखं आसनं अशाप्रकारे केलेली आहे. जितके तुम्ही सहजपणे करू शकता तेवढे करा आणि मग केवळ किंचित थोडेसे शरीर ताणा (शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी). श्वास हा संदर्भ बिंदू आहे हे लक्षात ठेवा – जेव्हा श्वास हलका आणि दीर्घ असतो तेव्हा स्नायू शिथिल होऊ लागतात, परंतु जेव्हा श्वास असंतुलित असेल तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःवर अति-ताण दिलेला आहे.

तुमच्या सुखद क्षेत्राच्या थोडे पलीकडे जाण्याने तुमचा योगाचा सराव रोचक होईल आणि जसजसे तुम्ही प्रगती करू लागाल आणि नवीन योगासने करू लागल तसे तुमच्या सरावाला आव्हानाची एक चमक प्राप्त होईल.

१०. तुमच्याप्रमाणेच प्रत्येक आसन हे अद्वितीय आहे

तुम्ही जेव्हा योगासनात असता तेव्हा त्याबद्दल संतुष्ट रहा आणि योगावर्गातील इतरांबरोबर त्याची तुलना करू नका. हे लक्षात ठेवा की प्रत्येक शरीराचा प्रकार हा अद्वितीय आहे आणि विविध लोक हे विविध पातळीवर प्रवीण असतात. काही एखादे आसन सहजपणे करू शकतील तर काहींना तिथे पोचायला थोडा अधिक काळ आणि अधिक सरावाची आवश्यकता भासेल. म्हणून जास्त विचार करू नका आणि स्वतःची दमछाक करून घेवू नका.

सरावाच्या सुरुवातीच्या काळात जर काही स्नायू आंबले आहेत असे अनुभवाला आले तर चिंता करू नका. पण वेदना होत असतील तर ताबडतोब तुमच्या शिक्षकाला कळवा. इथे मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही तुमच्या योगा सरावात नियमित असले पाहिजे आणि चिकाटी आणि सबुरी ठेवली पाहिजे. इतर कोणत्याही प्रणाली प्रमाणेच योगासनांची शरीराला सवय व्हायला थोडावेळ लागेल.

११. ताजेतवाने होण्याकरिता पूर्णपणे शिथिल व्हा !

जसा तुमचा योगासनांचा सराव संपत येईल तेव्हा लगेच उठून लगबग दिवसभराच्या कामाला लागण्याची घाई करू नका. थोडी मिनिटे योगा निद्रा घेणे हे फारच उत्तम राहील. कारण योगा निद्रा  ही शरीराला थंड करते आणि योगासनांच्या सरावाने निर्माण झालेल्या उर्जेचे मजबुतीकरण करते. योगाच्या व्यायामानंतर योग निद्रा ही मन आणि शरीराला संपूर्णपणे शिथिल करण्यात अतिशय फायदेकारक आहे.

 

जर तुम्ही तुमच्या योगाच्या सरावात नियमित रहाल तर तुम्हाला योगाचे सूक्ष्म आणि गहन फायदे अनुभवता येतील. योगा म्हणजे योगासने, प्राचीन चिरंतन तत्वज्ञान, प्राणायाम (श्वसनाची तंत्रे) आणि ध्यान यांनी वेढलेले आहे जे तुम्हाला शारीरिक पातळीच्या पलीकडे नेते एक गहन अध्यात्मिक अनुभव देतो.

स्वतःकरिता स्वतःचा बहुमुल्य वेळ द्या आणि त्याचे परिणाम दिसण्यासाठी थोडा धीर धरा, जे तुम्हाला अधिक लवचिक, निरोगी, शांत, कार्यक्षम आणि उत्साही बनवतील. योगींना सरावाकरिता शुभेच्छा !

 

हा लेख कमलेश बरवाल, श्री श्री योगा संचालक, यांनी पुरवलेल्या माहितीवर आधारित आहे.

Interested in yoga classes?